13 December 2017

News Flash

गोदावरी भजी

एकदा मंडणगडलाच एका मित्राच्या घरी गेलो होतो, तेव्हा त्याने मला वांग्याची भाजी खायला दिली.

डॉ. सतीश कानविंदे | Updated: February 11, 2017 1:59 AM

मला कांदा भजी खूप आवडतात. गोदावरी सोसायटीत राहायला आल्यानंतर एकदा काही पाहुणे आले होते. त्यावेळी प्रयोग करून केलेली भजी पाहुण्यांना एवढी आवडली की त्यांनी त्या भज्यांना  ‘गोदावरी भजी’ असे नाव देऊन टाकले. त्या भज्यांचे मला वाटते पेटंटच घ्यावे लागेल, एवढी ती आमच्या नातेवाईकांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत.

माझी स्वयंपाकाची आवड खरं तर गरजेतून निर्माण झाली. १९७७ मध्ये एम.बी.बी.एस. झाल्यानंतर माझी मंडणगड (जिल्हा रत्नागिरी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली. खरं तर मला हॉटेलमधले पदार्थ खाणं फारसं आवडत नाही. अगदी नाईलाज झालाच तर इडली सांबार, वडा सांबार, डोसा, उत्तप्पा असे काहीतरी मी खातो. पण मंडणगडला गेल्यानंतर दोन्ही वेळचे जेवण मला हॉटेलमध्येच घ्यावे लागत होते. काही दिवसातच मला त्याचा वीट आला. आरोग्य केंद्रातील एक शिपाई जेवण चांगले करतो असे कोणीतरी मला सांगितले म्हणून एक महिना त्याच्या हातचे जेवण घेऊन पाहिले. स्वयंपाकासाठी बाई ठेवली, पण कोणाचेच जेवण मला आवडले नाही. शेवटी मी स्वत: जेवण करायचं ठरवून टाकलं. एकदा मुंबईला घरी आलो असताना आईकडून तुरडाळीची आमटी कशी करायची ते अगदी सविस्तर कागदावर लिहून घेतले आणि मंडणगडला आल्यानंतर पहिला प्रयोग केला आणि तो कमालीचा यशस्वी झाला. भात कसा करतात ते मी घरी बघितले होतेच. हळूहळू बटाटय़ाची भाजीही करायला शिकलो.

माझ्यासारखेच नोकरीनिमित्त मंडणगडला आलेले आणखीही काही जण होते. त्यांच्याकडून मी कांदेपोहे करायला शिकलो. नंतर शिरा, उपमा वगैरे पदार्थही मला करता येऊ  लागले. मुंबईत माझी मोठी बहीण तुरडाळीची भजी करायची आणि ती मला खूप आवडायची. तिच्याकडून मी ती भजी शिकून घेतली आणि त्यात माझ्या मनाने थोडा बदल करून त्या भज्यांना आणखी चविष्टपणा आणला. ती भजी आमच्या नातेवाईकांनाही खूप आवडू लागली. मंडणगडच्या आमच्या या बॅचलर्सच्या ग्रुपला अधूनमधून पार्टी करायचा मूड यायचा. त्यावेळी कोंबडी आणून ती साफ करण्यापासून चविष्ट चिकनमसाला करण्यापर्यंतची सर्व कामे आम्हीच करत असू. फक्त भाकऱ्या कोणाकडून तरी आणायचो. साहजिकच माझ्यात स्वयंपाकाची आवड निर्माण झाली आणि अर्थातच पुढे ती वाढवली. अगदी मासे आणून ते साफ करून तळणे वगैरेही मी सहज करतो. आता मी त्या बाबतीत स्वावलंबी झालो आहे असे म्हणायला हरकत नाही.

एकदा मी आणि एका मित्राने साबुदाण्याची खिचडी करायचे ठरवले. खिचडी कशी करतात हे आम्हाला माहीत नव्हतेच. फोडणीसाठी तेल, मिरची, जिरे, मीठ या गोष्टी लागतात आणि साबुदाणे आधी भिजवून घ्यायचे असतात एवढेच आम्हाला माहीत होते. आम्ही फोडणी तयार केली आणि पाण्यात टाकलेले साबुदाणे पाण्यातून काढून तसेच त्यात टाकले आणि काहीतरी चुकल्याचे आमच्या लक्षात आले. त्यावेळी त्या साबुदाण्याचा जो लगदा तयार झाला तो अजून विसरलेलो नाही. ती खिचडी टाकून देण्याच्या लायकीचीच होती. पण त्यानंतर मात्र आम्ही साबुदाण्याची खिचडी पद्धतशीर शिकून घेतलीच. आता एकदम चविष्ट आणि मोकळी खिचडी मी करू शकतो.

एकदा मंडणगडलाच एका मित्राच्या घरी गेलो होतो, तेव्हा त्याने मला वांग्याची भाजी खायला दिली. मला ती आवडल्यानं साहजिकच त्याची कृती विचारली. त्यावर त्याने मसाल्याचे पदार्थ असलेला डबा उघडून दाखवला आणि म्हणाला, ‘‘यातलं सगळं थोडं थोडं घातलंय.’’ मी तोही प्रयोग करून पाहिला आणि इतकंच काय, माझ्या मुंबईच्या नातेवाईकांनाही सांगितला. ते सगळेच जण आता तशी भाजी करतात.

माझ्या पद्धतीने केलेले बटाटय़ाचे पॅटिस असो की टोमॅटो आम्लेट सगळ्यांना आवडतं. कधी नेहमीच्या जेवणाचा कंटाळा आला तर बटाटय़ाचे पॅटिस किंवा टोमॅटो आम्लेट आणि त्याबरोबर टोमॅटो सॉस आणि ब्रेड हा आमचा रात्रीच्या जेवणाचा मेनू असतो. त्याचबरोबर तांदळाच्या पिठात कांदा, मिरची, कोथिंबीर, मीठ घालून काढलेले पोळे हेही अधूनमधून असतात.

२००६ मध्ये मी फ्रँकफर्ट (जर्मनी) येथे मुलाकडे गेलो होतो. तिथल्या एक महिन्याच्या वास्तव्यात घरी असायचो तेव्हा मीच जेवण करायचो. बाहेर फिरायला गेलो तर काय खायचे हा माझ्यापुढे प्रश्न असायचा

आणि कधी एकदा घरी जातो असे मला व्हायचे. तिथे असताना माझ्या मुलाने आपल्या जर्मन मित्रांना घरी जेवायला बोलावले होते. मी त्यावेळी स्टार्टर म्हणून वर उल्लेखलेले बटाटय़ाचे पॅटिस आणि मेन कोर्सला मालवणी पद्धतीचे चिकन आणि आंबोळ्या असा बेत ठेवला होता. सगळ्यांनीच ते आवडीने खाल्लेले पाहून समाधान म्हणजे काय असतं याचा साक्षात्कार झाला.

मला कांदा भजी खूप आवडतात. २०११ मध्ये गोदावरी सोसायटीत राहायला आल्यानंतर एकदा काही पाहुणे आले होते. त्यावेळी असाच प्रयोग करून केलेली भजी पाहुण्यांना एवढी आवडली की त्यांनी त्या भज्यांना ‘गोदावरी भजी’ असे नाव देऊन टाकले. त्या भज्यांचे मला वाटते मला पेटंटच घ्यावे लागेल, एवढी ती आमच्या नातेवाईकांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत.

संधी मिळेल तेव्हा मी माझ्या आवडीचे बरेच पदार्थ करण्याचा प्रयत्न करतो. पण माझी पत्नी मला ते करू देत नाही. कारण म्हणे नंतरचा पसारा आवरणे तिला त्रासदायक असते. अर्थात तिचा हा आरोप मला मान्य नाही. (मला वाटतं सगळ्याच बायकोंची ही तक्रार असते.) पुढेमागे वैद्यकीय व्यवसाय सोडून एक छोटेसे हॉटेल टाकावे आणि आपली पाककलेची हौस भागवावी, असं मात्र बऱ्याच वेळा मनात येतं.

डॉ. सतीश कानविंदे sakanvinde@gmail.com

First Published on February 11, 2017 1:59 am

Web Title: experimental onion bhaji made in godavari society