21 September 2020

News Flash

एरर एरर एरर

आता तिसरा टप्पा सुरू. भाजणे. या वेळेपर्यंत मी लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचलो होतो.

शीतल (माझी पत्नी)ला फोन केला आणि झटपट पोळीची रेसिपी विचारून घेतली.

मी लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचलो होतो. कणीक मळणे आणि पोळी लाटणे यापेक्षा पोळी भाजणे हे सोपे काम होते. मी उत्साहाने गॅस पेटवला आणि तवा गरम करायला ठेवला. दोन मिनिटांनी माझ्या आयुष्यातल्या पहिल्या पोळीने पॅनवर आपली पाठ टेकली. एक मिनिट झाले. मी पोळीची पाठ बघितली तर ती अजून पिवळीच होती.. त्यावर काळे फोड नव्हते आले. माझ्या पोळीची भाजून घ्यायची तयारीच दिसत नव्हती. मी पॅन उचलून गॅस बघितला आणि फेलचा एरर मेसेज डोळ्यांपुढे चमकला..

नैरोबीत पाय ठेवल्यापासून खमंग, चविष्ट खाण्याशी माझा संबंध पूर्णपणे तुटल्यासारखा झाला होता. आज ब्रेड, उद्या मंडाझी (ब्रेड व केकचे अगोड कॉकटेल), परवा विकतची ३५ रुपयांची अर्धीकच्ची ब्राऊन चपाती (गव्हाची), तेरवा भात आणि उकडलेल्या अथवा कच्च्या भाज्या तर कधी अगदीच काही खायला नसेल तर एमटीआरच्या आंबट, पॅक्ड रेडीमेड भाज्या.

अशा अवघड काळात शेवटी नाइलाज झाला आणि मी गव्हाचे पीठ मॉलमधून आणले. ‘गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते.’ (माझ्या केसमध्ये, अ‍ॅक्शन). एका शनिवारी वेळ मिळाला आणि पोळी करायचा बेत पक्का केला (तयार भाज्या आणल्या होत्या, पण त्याबरोबर खायला पोळी नव्हती, म्हणून). शीतल (माझी पत्नी)ला फोन केला आणि झटपट पोळीची रेसिपी विचारून घेतली.

मुहूर्त उजाडला संध्याकाळी सहा वाजता. पोळी करताना काय काय साहित्य लागते ते मनात चारदा आठवले आणि त्याप्रमाणे कपामध्ये पाणी, तेलाची बाटली, तवा (इकडे पॅन), नुसते पीठ एका डब्यात वगैरे वगैरे तयारी केली. गव्हाच्या पिठाने पाण्याचा पहिला थेंब प्राशन केला ६.२० वाजता. पुढची १५ मिनिटे मी कणीक मळत होतो. शीतलने कणीक थोडी मळून झल्यावर तेल घालायला सांगितले होते, पण किती ते माहीत नव्हते. एका हाताने बाटलीतून तेल ओतण्याची करामत करता करता जरा जास्त तेल पडले आणि व्हायचे तेच झाले. कणीक सैल झाली.

मग एक छोटासा पॉज घेतला. लहानपणी आई पोळ्या करतानाचे दृश्य डोळ्यासमोर आणले आणि आश्चर्य म्हणजे ते आलेसुद्धा, अगदी स्पष्टपणे. ते चित्र असे होते. मोठय़ा परातीत कणीक मळ-मळ मळायची आणि मळून झल्यावर तो कणकेचा जरा घट्ट गोळा एका बाजूला करून ठेवायचा. मी माझ्या कणकेकडे बघितले. डोळ्यासमोरील चित्रासाखा जरा घट्ट गोळा होण्यासाठी अजून बरेच परिश्रम घ्यायचे बाकी होते. मी पोळ्या लाटताना त्यावर घालायचे पीठ त्या अर्ध मळलेल्या कणकेत घालायला सुरुवात केली. जास्त तेलामुळे कणीक सैल झाली होती. मी पीठ टाकत गेलो आणि हळूहळू डब्यातले सगळे पीठ कणकेने खुशीने स्वीकारले. आता जरा कणीक आईच्या कणकेसारखी घट्ट झाली होती. हुश्शऽऽऽ. अगदीच काही चित्रविचित्र प्रकार झाला नव्हता, आतापर्यंत तरी.

मग मी परत डबा पिठाने भरला कारण आता पोळीच्या प्रयोगाच्या दुसऱ्या भागामध्ये प्रवेश होणार होता. कणकेने बरबटलेला हात स्वच्छ धुतला आणि पोळी लाटायला घेतली. दोन दिवस आधीच मी मॉलमधून लाकडी पोळपाट विकत घेतले होते. (इकडे अ‍ॅल्युमिनियमचे किंवा स्टीलचे पोळपाट मिळत नाही.) पोळपाटावर थोडे पीठ पसरले. परत आईच्या पोळ्या डोळ्यासमोर आणल्या. मग लक्षात आले की, आईच्या पोळपाटाच्या मध्यावर पीठ असायचे आणि त्यावर मग कणकेचा गोळा ठेवायची. चला, परत पोळपाटभर पसरलेले पीठ मध्यभागी गोळा केले. एक छानसा कणकेचा गोळा पोळपाटावरच्या पिठावर ठेवला आणि पोळी लाटायला सुरुवात केली. आता बघू भारताचा नकाशा होतोय की, पसरणारा अमीबा की, अजून काही. लाटायला लागल्याबरोबर कणिक सैरभैर पाळायला लागली, बहुतेक तेल जास्त झालं असणार. मग माझे लाटणेही कणकेच्या मागे लागले. उभी लाटली, आडवी लाटली, कडांना सपाट केले, त्यावर आणखी पीठ ओतले आणि अखेर पोळीने आकार घ्यायली सुरुवात केला. नशिबाने आणि आईच्या कृपेने पोळी, पोळी म्हणण्यासारखी एकदाची लाटली गेली. हुश्शऽऽऽ. दुसरा टप्पा पूर्ण झाला.

आता तिसरा टप्पा सुरू. भाजणे. या वेळेपर्यंत मी लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचलो होतो. कणीक मळणे आणि पोळी लाटणे यापेक्षा पोळी भाजणे हे सोपे काम होते. मी उत्साहाने गॅस पेटवला आणि तवा गरम करायला ठेवला. दोन मिनिटांनी माझ्या आयुष्यातल्या पहिल्या पोळीने पॅनवर आपली पाठ टेकली. गॅस मोठ्ठा केला होता, जेणेकरून पोळी मस्त खरपूस भाजली जाईल. आता फक्त पोळी उलटी करायची, पोटावर भाजायची आणि खुसखुशीत पोळी खायला मी तयार!

एक मिनिट झाले. मी पोळीची पाठ बघितली तर ती अजून पिवळीच होती. त्यावर काळे फोड नव्हते आले. अजून एक मिनिट थांबलो तरीही तेच. माझ्या पोळीची भाजून घ्यायची तयारीच दिसत नव्हती. मी पॅन उचलून गॅस बघितला आणि फेल फेल फेल! चा एरर मेसेज डोळ्यांपुढे चमकला. गॅसने मान टाकली होती आणि टाकता टाकता माझ्या पोळीला सुरुंग लावला होता. निळी ज्योत मंदपणे माझ्याकडे बघून हसत होती आणि हसता हसता निवलीसुद्धा. तरीच माझी पोळी भाजली जात नव्हती! नकळत माझ्या मुखातूनही हसू बाहेर पडले.

आता काय करायचे? पोळी तर अर्धीकच्ची राहिली होती. तेवढय़ात समोरच्या ओव्हनकडे लक्ष गेले आणि डोक्यात वीज चमकली. ताबडतोब पोळी ओव्हनमध्ये स्थलांतरित केली आणि दोन मिनिटांचा टाइमर लावला. न राहवून मी ओव्हनच्या काचेतून आत डोकावले तर पोळी शांतपणे गोल गोल फिरत होती आणि काही ठिकाणहून टुम्म फुगायला लागली होती. मी विचार केला, चला पोळी नाही तर फुलका तरी खायला मिळेल. दोन मिनिटे झाली आणि मी आनंदाने ओव्हनचे दार उघडले. मी माझ्या आयुष्यातली स्वत: केलेली पहिली मऊमऊ  पोळी हातात घ्यायला उत्सुक होतो. प्लेट बाहेर काढली आणि अलगदपणे दोन्ही हातांनी पोळी उचलली.

परत हसू फुटले. ओव्हनने माझ्या स्वप्नातल्या मऊ  पोळीचे चक्क खाकऱ्यात रूपांतर करून टाकले होते! हरकत नाही. खूप काही बिघडलं नव्हतं. तत्क्षणी मी त्या कुरकुरीत खाकऱ्याचा आनंद उपभोगला. पोळी हातात आली नव्हती पण यापुढे आपल्याला पोळी करता येईल हा मोलाचा आत्मविश्वास नक्कीच हाताला लागला होता. पुढच्याच प्रयत्नात मनासारखी, तोंडात घालवेल अशी मऊ  पोळीही जमली आणि स्वयंपाकघराचे छत ठेंगणे वाटू लागले.

आता वेध लागले होते चविष्ट भाजीचे!

धवल रामतीर्थकर dhavallr@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 1:50 am

Web Title: food story by dhaval ramtirthkar
Next Stories
1 शीण घालवण्याची परफेक्ट थेरपी
2 ऑपरेशन थिएटरबाहेरची चिंतामग्नता..
3 चिकन लपेटा ते तर्रीदार बटर चिकन करी
Just Now!
X