कालांतराने मुगाची खिचडी, कांदा बटाटा रस्सा, टोमॅटो ऑम्लेट अशा सोप्या सोप्या रेसिपींशी मैत्री झाली आणि छोटय़ा का होईना या यशाने आत्मविश्वास वाढला. आणि खऱ्या अर्थाने स्वयंपाकाशी ओळख सुरू झाली. मग काय व्हॉट्सअ‍ॅप, मेसेंजर, फेसबुक यांच्या साहय़ाने आई आणि बहिणीच्या रेसिपींमुळे स्वयंपाकाशी मैत्री वाढली. आता तर ऑफिसवरून आल्यावर शॉवर घ्यायचा, लॅपटॉपवर आर.डी.बर्मन यांची गाणी लावायची आणि ‘यूटय़ूब’च्या मदतीने जागतिक शेफस्च्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पदार्थ बनवायचे. दिवसभराचा थकवा आणि शीण घालवण्याची परफेक्ट थेरपी..

आजही मी आणि किचन हे दोन्ही शब्द जवळजवळ ठेवताना विचित्र वाटतं. कारण पाच एक वर्षांपूर्वी या दोन्ही शब्दांचा काहीच संबंध नव्हता. जेव्हा एमबीए करण्यासाठी डब्लिनला आलो तेव्हा आईच्या हातच्या चवीची किंमत आणि स्वयंपाकाचे गांभीर्य पहिल्यांदा कळले. पहिल्यापासून मला स्वयंपाकाची खूपशी आवड नसली तरी तिटकाराही नव्हता. आई नोकरी करीत असल्यामुळे चहा, मॅगी, सँडविचेस अशा जुजबी रेसिपींशी ओळख होती पण त्यापलीकडे कधीच मजल गेली नव्हती.

२०१४ मध्ये मी डब्लिनला आलो. अजूनही आठवते की सुरुवातीचे दिवस फारच संघर्षांचे होते. पहिल्यांदाच केलेले परदेशी वास्तव्य, त्यात पूर्ण वेळ कॉलेज, एमबीएसारखा पूर्ण दिवस व्यग्र ठेवणारा अकॅडमिक कोर्स. उणे १० ते १५ तापमानाची गोठवणारी थंडी आणि त्यात पोटभर घरगुती जेवण न मिळाल्यामुळे होणारी चिडचिड. खरं तर त्या चिडचिडीचे निदान व्हायला मला तब्बल एक महिना लागला. कारण सुरवातीचे दिवस आईने दिलेल्या इन्स्टंट उपमा, मुगाची खिचडी आणि नेलेल्या पुरणपोळी आणि दुधावर भागले. पण न्याहारीसाठी नेलेल्या पदार्थावर न्याहरी, दुपारचे आणि रात्रीचे जेवण किती दिवस भागणार? त्यामुळे अर्धपोटी राहिल्यामुळे दिवसभराची चिडचिड सुरू झाली. आणि कळत-नकळत ती चिडचिड अभ्यासावर, कामावर आणि माझ्या पूर्ण दिवसावर परिणाम करू लागली आणि तेव्हा ठरवलं की आता बस्स. आपल्याला जर परदेशीच राहावे लागणार असेल तर किती दिवस आपण या गोष्टींपासून पळायचे. आज नाही तर उद्या आपल्याला किचनमध्ये जावेच लागणार मग ते चिडचिड म्हणून का, आनंदाने जाऊ यात आणि त्या दिवशी झालेल्या साक्षात्काराने खऱ्या अर्थाने सुरू झाली माझी ‘किचन जर्नी’.

सुरुवातीला तर खूप छोटे मोठे अपघात झाले. कांदे चिरताना बोटे कापली, फोडण्या जळाल्या, धुराने डोळे लाल केले.. लसणाच्या पाकळ्या नाहीत पण बोटाची साले मात्र सोलली गेली, पण अशा छोटय़ा मोठय़ा अपघातांना भीक न घालता पुढे जायचे ठरवले. मग कालांतराने मुगाची खिचडी, कांदा बटाटा रस्सा, टोमॅटो ऑम्लेट अशा सोप्या सोप्या रेसिपींशी मैत्री झाली आणि छोटय़ा का होईना पण त्यांच्या यशाने आत्मविश्वास वाढला. आणि खऱ्या अर्थाने स्वयंपाकाशी ओळख सुरू झाली. मग काय व्हॉट्सअ‍ॅप, मेसेंजर, फेसबुक यांच्या साहय़ाने आई आणि बहिणीच्या रेसिपींमुळे स्वयंपाकाशी मैत्री वाढली. आता तर ऑफिसवरून आल्यावर शॉवर घ्यायचा, लॅपटॉपवर आर.डी.बर्मन यांची गाणी लावायची आणि यूटय़ूबच्या मदतीने जागतिक शेफस्च्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पदार्थ बनवायचे. दिवसभराचा थकवा आणि शीण घालवण्याची परफेक्ट थेरपी.

आता जरी मी चांगला कुक झालो असलो तरी मला नेहमी आठवण होते ती माझ्या फसलेल्या पहिल्या पदार्थाची. ती म्हणजे कढी. कढी करण्याचा पहिलाच प्रयत्न होता. आईकडून रेसिपी घेतली, सगळे साहित्य तयार करून पूर्ण जोशात कढी करायला सुरुवात केली. फोडणी झाली, मग बेसन पीठ कालवले पण ते कशात ताकाऐवजी पाण्यात आणि सुरू झाली खरी गंमत. झालेल्या फोडणीत बेसन घातलेले पाणी टाकले आणि वाट पाहात बसलो. त्या पाण्याला म्हणजेच माझ्यासाठी असणाऱ्या कढीला उकळ्या फुटल्या. पण.. पण.. कोणत्याही अँगलने पदार्थ कढीसारखा दिसेना. नुसतीच ढेकळं ढेकळं वर यायला लागली. मला वाटलं पाणी कमी पडलं असेल म्हणून आणखी पाणी ओतत राहिलो, पण कढी काही केल्या तयार होईना, नुसत्याच मोठमोठय़ा गुठळ्या म्हणजेच ढेकळं. काहीच सुचेना.. हताश होऊन तोंड फिरवलं आणि एकदम साक्षात्कारच झाला. तोंड फिरवलं आणि बाजूला ठेवलेलं ताक दिसलं. आणि लक्षात आला केलेला मूर्खपणा. मग काय स्वत:वरच खूप हसू आणि रडू यायला लागलं. हसू अशासाठी की आयुष्यात पहिल्यांदाच मी ताकाशिवाय केलेल्या कढीचा प्रयत्न आणि रडू अशासाठी की कडकडून लागलेल्या भुकेचा न होणारा बंदोबस्त. मग काय त्यालाच नव्याने हळदीची आणि कांद्याची फोडणी देऊन, थोडंसं आटवून त्याच ‘कढी’चं पिठलं म्हणून आस्वाद घेतला. अशा रीतीने फसलेल्या का होईना पण ‘कढी’च्या नादात मला पिठल्याचा शोध लागला.

पण ते होते सुरुवातीचे दिवस, आता बऱ्यापैकी स्वयंपाकाचे ज्ञान संपादन केलं आहे. थालीपीठ, साबुदाण्याची खिचडीपासून, छोले, राजमा ते अगदी पेनने पास्ता, बुरितोस, मॅश पोटॅटो, रीसोत्तो असे पाश्चात्त्य पदार्थ बनवण्यापर्यंत मजल गेली आहे. इथे परदेशी मित्रांना आपले पदार्थ खाऊ  घालण्यात वेगळीच मजा आहे. खासकरून माझ्या एका आयरिश आणि मेक्सिकन मित्राला आपली फोडणीची पोळी विशेष आवडते. खरा तर सर्व मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात शिळ्या पोळ्यांपासून न्याहारीसाठी बनविला जाणारा हा साधा पदार्थ. पण इथे त्यालाही खास मागणी, त्यात डब्लिनमध्ये कायमच थंडी असल्यामुळे काही वेळातच ती पोळी कडक होऊन कुरकुरीत आणि जास्त खमंग लागते, त्यामुळे फोडणीच्या पोळीचे इथे स्पायसी पिक्वाँट क्रिस्प्स असे नामकरण झाले आहे आणि ‘योगर्ट’बरोबर या सो कॉल्ड क्रिस्पवर यथेच्छ ताव मारला जातो.

असो कितीही तयारीचा झालो असलो तरीही अजूनही आई आणि बहिणीच्या हाताची सर काही माझ्या हातच्या पदार्थाना येऊ  शकलेली नाही. ती चव अजूनही आठवत राहते. पण मागील वेळेस जेव्हा सुट्टीला पुण्याला घरी आलो होतो तेव्हा त्या दोघींना माझ्या हातची मटार उसळ, मॅश पोटॅटो खायला घातले आणि त्यांच्याकडून पसंतीची पावतीही मिळवली.

आता खऱ्या अर्थाने स्वयंपाकाशी गट्टी झालीये. परदेशात राहून स्वत:शीच झालेली एक वेगळी ओळख आणि खऱ्या अर्थाने मिळालेला स्ट्रेस बस्टर. बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपी शिकायच्या आहेत अजून. बघू किती किती आणि कसे जमते.

परेश कुलकर्णी

prshkulkarni@gmail.com