मला जास्तीतजास्त चार ते पाच जणांसाठी पदार्थ बनविण्याचा अनुभव होता. मायक्रोवेव्हपण नवीन आणि माणसंही जास्त.. चिकन लपेटा, पराठे आणि फ्राइड राइस असा मेनू ठरला. चिकन लपेटा बनविण्यासाठी चिकन मायक्रोवेव्हमध्ये शिजवायला घेतले, पण.. काय अंदाज चुकत होता ते काही कळत नव्हतं. पण चिकनचे तुकडे एकदमच कडक होत होते. शेवटी मायक्रोवेव्हमध्ये आणखी प्रयोग करण्याऐवजी मी वेगळाच प्रयोग करण्याचं ठरवलं..

तशी खाण्यापिण्याची मला फार आवड, शौक, म्हणा ना.. आई-वडील आणि भावंडांसोबत आमचं कुटुंब बंगळूरुला स्थायिक झालं होतं. त्यामुळे बंगळूरुलाच इंजिनीअरिंगचं शिक्षण संपल्यावर मी पनवेलला नोकरीनिमित्त आलो. मग रोज कंपनीमध्ये तीच तीच जेवणाची चव म्हणून संध्याकाळी रोज पनवेलच्या आजूबाजूमधील सर्व वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन रुचकर चवीचा शोध घेत होतो, पण समाधानकारक चव मिळेना. तेव्हा एकटाच होतो, म्हणून स्वत:च वेगवेगळ्या भाज्या तर कधी चिकन वगरे आणून फक्कड शाकाहारी, मांसाहारी पदार्थ घरीच बनविण्यास सुरुवात केली. मग काय सुट्टीच्या दिवशी नेहमीच वेगवेगळे पदार्थ बनवून शेजारी राहणाऱ्या मित्रांना द्यायला लागलो. मित्रपण माझ्या पाककृतींचे कौतुक करू लागले. तसा माझा आत्मविश्वास वाढत गेला आणि मग मी नवनवीन पदार्थ म्हणजेच व्हेज-नॉनव्हेज बिर्याणी, चिकन लपेटा, सूका चिकन, करी चिकन, पनीरचे पदार्थ वगरे घरीच बनवायला सुरुवात केली.

पुढे लग्न झालं, बायकोही होमसायन्स केलेलीच मिळाली. मी मनातून खूप खूश झालो, चला! आता आपल्याला छान नवनवीन रेसिपीज मिळणार, पण.. ‘अहो, होमसायन्समध्ये कमी अभ्यास करून जास्त गुण मिळविता येतात, म्हणून मी होमसायन्स घेतले, मला काही जास्त रेसिपीज करता येत नाही’, हे जेव्हा बायकोने सांगितलं, तेव्हा तर मी अवाक्च झालो. मग पुन्हा स्वत:च नवीन रुचकर चवीच्या शोधात माझे पाककृतींचे प्रयोग चालू झाले. मग बनविलेले पदार्थ बायकोला आणि मुलाला देऊ लागलो. त्यांच्याकडून फीड बॅक घेऊ लागलो. मुलगा गमतीने सर्वाना सांगायचा की, ममी आणि मी बाबांचे ‘गीनी पिग्स’ आहोत. कारण मी आता नेहमीच माझं ‘स्ट्रेस बस्टर’ म्हणजे नवनवीन पाककृती करायला लागलो. अर्थात बायकोनेही मला चांगली साथ दिली म्हणजे कुठलाही नवीन पदार्थ करण्याआधी जी तयारी असते म्हणजे कांदा, खोबरं भाजणे, आलं-लसूण पेस्ट बनवणे, नवीन पदार्थासाठी लागणारे सर्व साहित्य बाजूला काढणे, ते ती अगदी आनंदाने करते. मग मी इंटरनेटवरून डाउनलोड केलेल्या, मासिकात, वृत्तपत्रात, वाचलेल्या मला आवडलेल्या पाककृती बनविण्याचा सपाटाच चालू केला.

एक दिवस मोठय़ा हौसेने मायक्रोवेव्ह घेऊन आलो. त्यात काही पदार्थ करण्याचे प्रयोग केले. मायक्रोवेव्ह घेतल्यानंतर काही दिवसांनी आमच्याकडे माझे काही मित्र सहकुटुंब जेवायला येणार होते. सगळे मिळून आम्ही जवळजवळ चौदा -पंधरा जण जमलो. मला जास्तीतजास्त चार ते पाच जणांसाठी पदार्थ बनविण्याचा अनुभव होता. मायक्रोवेव्हही नवीन आणि माणसंही जास्त.. पण न घाबरता मी पटापट कामाला सुरुवात केली. चिकन लपेटा, पराठे आणि फ्राइड राइस असा मेनू ठरला. बायकोने पराठे आणि फ्राइड राइस बनवून ठेवले. मीपण चिकनला आलं-लसूण पेस्ट व इतर मसाला लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवले आणि थोडय़ा वेळाने चिकन लपेटा बनविण्यासाठी चिकन मायक्रोवेव्हमध्ये शिजवायला घेतले, मात्र.. काय अंदाज चुकत होता ते काही कळत नव्हतं. पण चिकनचे तुकडे एकदमच कडक होत होते. वेळेचा, उष्णतेचा अंदाज चुकत असेल असा विचार करून दुसरी प्लेटपण ट्राय केली. त्यातही चिकनचे तुकडे कडक झाले. बाहेर मित्रमंडळी नुसताच खमंग सुवास घेत गप्पा मारत होती, त्यांना पापड आणि सलाडवरच समाधान मानून घ्यावं लागत होतं. त्यांना चिकन काही मिळत नव्हतं. शेवटी मायक्रोवेव्हमध्ये आणखी प्रयोग करण्याऐवजी मी एक मोठं पातेलं माळ्यावरून काढलं. सुकं खोबरं, कांदा, आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरचीचा ठेचा तयार होताच. प्रथम मी एका बाजूला गॅसवर मोठय़ा फ्राइंग पॅनमध्ये भरपूर बटर घालून मॅरिनेट केलेले चिकन शिजवायला ठेवलं. दुसऱ्या बाजूला मोठय़ा पातेल्यात थोडं तेल घालून थोडेफार काजू आणि बदाम तळून घेऊन गार व्हायला ठेवले, नंतर तेलात मोहरी, जिरे घालून कांद्याची पेस्ट टाकली. थोडय़ा वेळाने आलं-लसणाची पेस्ट आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घातला. मग गार झालेल्या काजू -बदामाचीपण मिक्सरमध्ये पेस्ट केली, सुकं खोबरं आणि काजू बदाम पेस्ट मसाल्यात टाकली त्यावर भलं मोठं बटर सोडलं. थोडय़ा वेळाने मसाला तेल सोडू लागल्यावर अंदाजानेच लाल तिखट, हळद, धणे पूड, गरम मसाला आणि चिकन मसाला घातला. तोवर फ्राइंग पॅनमधील चिकन शिजले होते. ते त्या मोठय़ा पातेल्यात घातले. सुगंध तर अगदी मस्तच सुटला होता. थोडं उकळलेलं पाणी घातलं आणि स्वत:च टेस्ट करून बघितली. वा! वाऽऽऽ चव तर अगदी खासच झाली होती. थोडं मीठ घालून कोथिंबीर वरून भुरभरली आणि गॅस बंद केला आणि दिवाणखान्यातील मित्रमंडळींना चिकन लपेटाऐवजी र्तीदार बटर चिकन तयार असल्याची वर्दी दिली. आधीच सर्वाना जबरदस्त भूक लागली होती, त्यात थोडा उशीरही झाला होता. पण बटर चिकनची चव बघून सगळ्यांनी मान्य केले की, अशी र्तीदार बटर चिकन करी त्यांनी यापूर्वी खाल्लीच नव्हती. अर्थात माझी इतक्या वर्षांची मेहनत कामी आली होती. आता या गोष्टीला बरीच वष्रे झालीत. पण अजूनही माझे वेगवेगळ्या भाज्यांवर, पनीरवर, चिकनवर प्रयोग सुरूच असतात. मी आता बऱ्याच

प्रकारच्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने बनविण्यात ‘एक्सपर्ट’ झालो आहे अशी बायको, मुलगा, शेजारी आणि मित्रमंडळी दाद देतात त्यातच काय ते आलं!

दिनेश अनासाने

dinesh464anasane@rediffmail.com