12 December 2018

News Flash

‘सही’ डिश

मी शेफ, आमच्या घराचा, आमच्या कुटुंबाचा. शेफ हनिश!

मी शेफ, आमच्या घराचा, आमच्या कुटुंबाचा. शेफ हनिश! स्वयंपाकात रमायला, सुऱ्या-काटय़ांशी मत्री करायला मला मनापासून आवडतं. स्वत: विचार करून केलेली एखादी डिश जेव्हा ‘सही’ बनते, तेव्हा मनातलं हसू चेहऱ्यावर येतं.

मला ही आवड कधी व कशी निर्माण झाली आठवत नाही. माझी खाण्याची आवड हे कदाचित तिचं मूळ असावं. आई सांगते, अगदी लहान असतानाही साध्या वरणातले हळद-मिठाचं चुकलेलं प्रमाण मला समजायचं आणि भाजणीच्या थालीपिठात काय-काय ढकललंय हेही मी अचूक ओळखायचो. माझी आजी ‘सुपर शेफ’. तिच्या पुरणपोळीसारखी पोळी बनवणं केवळ अशक्य. आईला एकच डिश वेगवेगळ्या प्रकाराने करायची हौस. हे गुण त्या दोघींकडून आले असावेत.

माझी खाण्याची आवड अगदी लहानपणापासूनची. विश्वास बसणार नाही इतक्या लहानपणीच्या आठवणी माझ्याकडे आहेत. माझे बाबा र्मचट नेव्हीमध्ये काम करायचे. १९९० मध्ये मी आठ महिन्यांचा असताना प्रथम बोटीवर गेलो तेव्हा तिथला कूक होता सेशेल्स या देशामधला. परदेशी पदार्थाची ओळख आणि नॉन-व्हेज पदार्थाशी मत्री तिथेच सुरू झाली. दोन वर्षांचा असताना इटलीमधील पिझेरीयामध्ये खाल्लेल्या पिझ्झाची चव अजून जिभेवर आहे. मी चवथीत असताना पहिल्यांदा चहा केला. साखर, चहा पावडर माझ्या मते बरोबर होती. पण एक घोट घेऊन पाहिला तर चहा कडवट लागत होता. मग थोडं दूध वाढव, थोडी साखर वाढव असा करत एक कपाचा दोन कप चहा झाला. नेहमीसारखा नव्हता पण ‘पिणेबल’ होता. असंच एकदा खिचडी केली. चव ठीक होती पण खिरीसारखी पातळ झाली. पाणी जास्त झालं, असं आई म्हणाली. गमतीने बाबा म्हणाले, ‘‘स्ट्रॉ दे खिचडीसाठी.’’

त्यानंतर केलेला वेगळा पदार्थ म्हणजे ‘कॅरामल कस्टर्ड. कॅरामल पहिल्यांदा कडक झालं, भांडय़ाला चिकटलेलं निघेच ना. परत केल्यावर मात्र छान जमलं. एकदा सागरदादा मलेशियाहून सुट्टीसाठी आला होता. त्याने आणि वाहिनीने अगदी तारीफ करत खाल्लं म्हणून खूश झालो. असंच एकदा, तेव्हा मी दहावीत असेन, आई-बाबा घरात नव्हते. तीस अंडय़ांचा ट्रे घरात असायचा. मग काय ऑम्लेट पार्टी करायची ठरवली. सगळ्या मित्रांना बोलावलं. इतके मित्र आणि इतकी अंडी हाताशी असताना वेगवेगळे प्रयोग करणं तो बनता ही था. मग कांदा-टोमॅटोबरोबर सॉसेजेस, चीज, पनीर वापरून प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारचं ऑम्लेट केलं. अंडय़ाचा ट्रे खाली झाला, पण मित्रांची मनंही फुल्लं झाली.

असाच घडलेला फ्युजन फूडचा एक प्रकार म्हणजे ऑम्लेट डोसा. तव्यावर डोसा पसरायचा, त्यावर ऑम्लेटसाठी तयार केलेले अंडय़ाचं मिश्रण पसरवायचं. तेल सोडून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजलेला ऑम्लेट डोसा भन्नाट लागतो. अशीच अजून घडलेली फ्युजन डिश- सॉसेज् मंचुरियन. लांब कापलेला कांदा, सिमला मिरची, सोयासॉस, व्हिनेगर, चिलीसॉस घालून मंचुरियन ग्रेवी बनवायची आणि त्यात तळलेले सॉसेजेसचे तुकडे टाकायचे. मस्त दिसते, लागतेही मस्त. आधुनिक पदार्थाबरोबरच पारंपरिक पदार्थ बनवायलाही मला आवडतात. उदा. कांदे-पोहे – भरपूर कांदे, छान भिजवलेले पोहे, जरा जास्त शेंगदाणे मीठ, भरपूर खोबरं, कोथिंबीर आणि लिंबू – हे समोर आलं की तुमच्या दिवसाची सुरुवात छान झालीच म्हणून समजा.

भाताबरोबर खाण्यासाठी गोवन फिश करी, मीट बॉल करी करायला मजा येते. बिर्याणीसाठी तयारी खूप करावी लागते. पण रमतगमत, मजा घेत केलेल्या बिर्याणीचा दम उघडल्यावर दरवळणारा सुवास कष्ट विसरायला लावतो.

मला संगीत आवडतं. गिटार, जेंबे, सिंथेसायजर वाजवणं हा माझा छंद!

स्वयंपाकातही एक लय, ताल आहे. भाकरी थापताना मला ही लय सापडली. मी पेशाने मरीन इंजिनीयर आहे. कुकिंग हे कौशल्य मला छंद म्हणून जोपासायचे आहे. आपल्या आयुष्यात आपल्या छंदाला एक स्पेशल जागा असते यावर माझा विश्वास आहे.

वाचकांसाठी ही माझी खास रेसिपी : कोकाकोला चिकन

बोनलेस चिकन धुऊन त्याला मीठ, मिरपूड आणि सोयसॉस चोळून तासभर ठेवा (तिखट हवे असल्यास अगदी थोडं आलं-लसूण पेस्ट आणि लाल तिखट घाला.) तेल तापल्यावर चिकन त्याच्यात टाकून झाकण ठेऊन शिजवावे, अंदाजे ५-७ मिनिटे. त्यानंतर थोडा थोडा कोकाकोला टाकून हलवत राहा. चिकनला कोकचे कव्हर होते, चकचकीतपणा येतो, कॅरामलची चव येते.

हनीश रहाणे

hanishrahane@gmail.com

(सदर समाप्त)

First Published on December 30, 2017 12:05 am

Web Title: marathi articles in chaturang on indian cuisine part 3