18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

‘प्रॉन्स इन ग्रीन मसाला इज रेडी..’

ताजी कोलंबी, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले, लसूण, ओला नारळ, पुदिना सगळे पद्धतशीर आणले

विवेक आडे | Updated: January 28, 2017 1:40 AM

खोबऱ्याचा चोथा मसाल्यातच टाकून मिक्सरमध्ये छान हिरवीगार पेस्ट बनवली. कोलंबी अर्धा तास चांगली मुरली होती. कढई गॅसवर ठेवली. तेल टाकून मसाल्यात कोलंबी खमंग परतली. पाण्याचा एक हबका मारून झाकण ठेवले. एक दणदणीत वाफ आल्यावर मीठ , नारळाचं दूध घालून गॅस मंद करून ठेवून दिला. इकडे ही पाककृती सुरू असतानाच आमच्या मित्रांनी पत्त्याचा डावही मांडला आणि..

खूप वर्षांनी जुने मित्र घरी आले होते. आम्ही सुरतला स्थायिक झाल्यानंतर ते प्रथमच चंद्रपूरहून सुरत बघायला आले होते. त्यांच्यासाठी खास काही तरी बनवायचे ठरवले. काय करावे यावर बराच खल सुरू झाला. मांसाहारी म्हटल्यावर घरातील महिला नाक मुरडू लागल्या. मी त्यांना म्हटले, ‘‘तुम्ही नका खाऊ, तुमचे तुम्ही वेगळे करून घ्या.’’ अखेर मांसाहारी जेवणाची मागणी करणाऱ्यांची मेजॉरिटी झाली म्हणून कोलंबी बनवायची ठरले. आम्ही दोन मित्र कोलंबी व सगळे सामान घेऊन आलो.

ताजी कोलंबी, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले, लसूण, ओला नारळ, पुदिना सगळे पद्धतशीर आणले. कोलंबी धुवून स्वच्छ केली. मित्रांनाही कामाला लावले. एक जण लसूण सोलू लागला, एक जण हिरवा मसाला तयार करू लागला. कोलंबीला थोडे मीठ, किंचित हळद व लिंबाचा रस चोळून ठेवले. मग आलं, लसूण हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, धणे-जिरे घेतले. कांदा जरा भाजून घेतला, ओले खोबरे वाटून त्याचे दूध काढले. खोबऱ्याचा चोथा त्या मसाल्यातच टाकून मिक्सरमध्ये छान हिरवीगार पेस्ट बनवली. कोलंबी अर्धा तास चांगली मुरली होती. कढई गॅसवर ठेवली. तेल टाकले. जिरे-मोहरी तडतडल्यानंतर हिरवा मसाला घालून खमंग परतले. मग कोलंबी टाकून परतले. पाण्याचा एक हबका मारून झाकण ठेवले. एक दणदणीत वाफ आल्यावर मीठ घातले आणि नारळाचे दूध घालून थोडं शिजण्यासाठी गॅस मंद करून ठेवून दिला. इकडे ही पाककृती सुरू असतानाच आमच्या मित्रांनी पत्त्याचा डावही मांडला होता. आमचा पत्त्यांचा डाव रंगात आला होता. तिकडे महिला मंडळाने आधीच नॉनव्हेज करायला नकार दिल्याने त्याही सगळ्या स्वयंपाकघराच्या बाहेर होत्या.

आम्ही पत्त्यांच्या रंगलेल्या डावात इतके मशगूल झालो होतो की गॅसवर कोलंबीची कढई आहे हे पूर्णपणे विसरूनच गेलो होतो. बायको ओरडली, ‘‘अहो गॅसवर काय आहे ते बघा, जळका वास येतोय.’’ ताडकन उठून  स्वयंपाकघराकडे धाव घेतली. जाऊन पाहिले तो कोलंबीतला मसाला पूर्ण कोरडा झाला होता. तशीच कढई खाली उतरवली आणि आधी चव पाहिली. हुश्शऽऽऽ चव मस्तच होती. कोलंबी परफेक्ट शिजली होती, फक्त रस्सा करायच्या ऐवजी ती ड्राय झाली होती.

मग काय एका पांढऱ्या शुभ्र प्लेटमध्ये ती काढली. वर ओल्या नारळाचा चव पसरला. डिश सगळ्यांसमोर नेली आणि मोठय़ा ऐटीत म्हटले, ‘‘प्रॉन्स इन ग्रीन मसाला इज रेडी..’’ सगळ्यांनी चव बघून म्हटले, ‘‘वा झक्कास!’’ मित्र तर खूश झालेच पण नॉनव्हेज करायला नाक मुरडणारं सगळंच्या सगळं महिला मंडळही ‘प्रॉन्स इन ग्रीन..’वर तुटून पडलं अन् बघता बघता सगळी डिश खल्लास!

तेव्हापासून ‘प्रॉन्स इन ग्रीन मसाला’ ही माझी हातखंडा पाककृती बनली आहे.

विवेक आडे minaxi.own@gmail.com 

वाचकहो, तुम्ही पाठवलेल्या भरघोस प्रतिसादासाठी धन्यवाद. अशाच काही चमचमीत अनुभवांचे हे सदर खास पुरुष वाचकांसाठी. आम्हाला पाठवा तुमचे स्वयंपाकघरातील अनुभव- चविष्ट, चमचमीत, तिखट,गोड, आंबट अगदी तेलकटसुद्धा.  ‘घड(व)लेले पदार्थ’ या सदरासाठी

आमचा पत्ता –  लोकसत्ता, चतुरंग, ईएल – १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४०० ७१०.

विवेक आडे

ई-मेल – chaturang@expressindia.com

किंवा chaturangnew@gmail.com

First Published on January 28, 2017 1:40 am

Web Title: prawns in green masala