10 December 2018

News Flash

डाल पकवानची मेजवानी

ऑक्टोबर २०१६ पासून अचानक माझ्या पत्नीच्या तळहात व तळपायांना बधिरपणा आला आहे.

डाल पकवानाचा हा पहिलाच प्रयोग असून मला तो जमल्याने आणि सौभाग्यवतींनी पसंतीची पावती दिल्याने मी मनोमन चांगलाच सुखावलो.

एकदा ठाणे सिंधी कॉलनीमध्ये एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमानंतर सिंधी बांधवांनी डाल-पकवानची न्याहरी दिली होती. मला तो पदार्थ खूप आवडला. मी पत्नीला सांगितले. ती म्हणाली, ‘‘आपण एक दिवस करू.’’ माझ्या पत्नीच्या एका मैत्रिणीकडून तिने त्याची रेसिपी आणली. मग ठरवलं पत्नीसाठी हाच पदार्थ करायचा आणि तिला खाऊ घालायचा..

माझ्या वडिलांना चमचमीत खाण्याची व करण्याचीही खूप आवड होती. त्यांनी केलेला कोणताही पदार्थ चविष्टच असायचा. ‘‘वा मस्त झालाय.!’’ असे मी म्हटले की म्हणायचे, ‘‘मग ५६ मसाले घातलेयत त्यात.!’’ बटाटेवडा ही त्यांची खासियत होती. जवस, खुरसणी, डाळी यांच्या चटण्या ते करत असत. अंडाकरी, भुर्जी, उपमा यातही त्यांचा हातखंडा होता. पण मी मात्र त्यावेळी कधीच काही बनवण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो.

माझी पत्नी शुभांगी सुगरण आहे. तिने रेसिपी स्पर्धेत अनेक बक्षिसे पटकावली आहेत. मी ३५ वर्षे बँकेत नोकरी करत होतो. सकाळी ९ वाजता घर सोडायचो ते रात्री १० नंतर घरी यायचो. त्यामुळे बायकोसाठी मी वेळ देऊ शकलो नाही. मी नोकरीत असताना किचनमध्ये कधीच लक्ष दिले नव्हते. पण दोन वर्षांपूर्वी मी बँकेतून निवृत्त झालो. आता बायकोला जास्तीत जास्त मदत करावी व तिच्याकडून स्वयंपाक शिकावा असा विचार करून नवीन नवीन गोष्टी शिकू लागलो. तिच्या दृष्टीने मी एकदम कच्चा विद्यार्थी होतो. कुठच्या वस्तू कुठे ठेवलेल्या असतात हेही मला माहीत नव्हते. साठवणीचे हिंग, हळद, मोहरी कुठे आहेत.. कॉर्न फ्लॉवर, नाचणीचे पीठ कुठे असतात हे सर्व आधी मला माहिती करून घ्यावे लागले. फ्रीजमध्ये काय असते, बाहेर काय असते हे धडे गिरवावे लागले. मग कांदा बारीक चिरणे, खोबरे खवून देणे, वेगवेगळ्या चटण्या करणे अशी वरवरची कामे मी करू लागलो. काही दिवसांतच चिरणे, किसणे, भाजणे, परतणे अशा कामात मी तरबेज झालो. कुठचाही पदार्थ करायचा तर त्यासाठीची पूर्व तयारी मी करू लागलो. तिच्या शेजारी ओटय़ापाशी उभे राहून तिच्या मार्गदर्शनाखाली माझी ‘पाक’गिरी सुरू झाली. ती पोळ्या लाटायची मी भाजू लागलो. चिकनसाठी कांदा खोबरे परतून मसाला वाटून देऊ  लागलो. रवा भाजणे, शेंगदाणे भाजून कुट करणे ही कामे मला जमू लागली.

हळूहळू एक एक नवीन पदार्थ मी शिकलो व करू लागलो. ‘तुला मी एक्स्पर्ट करते की नाही बघ!’ असा विडा माझ्या पत्नीने जणू उचलला होता. ‘पुढे तुझे काही अडले नाही पाहिजे..’ असे ती म्हणायची. मी बनवलेल्या पदार्थाची यादी हळूहळू वाढत चालली. गाजर हलवा, बीट हलवा, फ्राइड राइस, रगडा पॅटिस, मन्चुरिअन, दुधीचा कोफ्ता अशा एकेक पायऱ्या मी चढत गेलो.

ऑक्टोबर २०१६ पासून अचानक माझ्या पत्नीच्या तळहात व तळपायांना बधिरपणा आला आहे. तिला कोणतेच काम करता येईनासे झाले. मग मलाच ‘किचन किंग’ व्हावे लागले. तिने मला तयार केले असल्यामुळेच आज मी स्वयंपाकघरातील सारी कामे करू शकतो. डॉक्टरांनी तिला कोहळा खायला सांगितला आहे. मग मी तिच्यासाठी कोहळापाक बनवला. या वर्षी होळीला मी पुरणसुद्धा बनवले.

एकदा ठाणे पूर्व भागात सिंधी कॉलनीमध्ये एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमानंतर सिंधी बांधवांनी डाल-पकवानची न्याहरी दिली होती. मला तो पदार्थ खूप आवडला. मी पत्नीला सांगितले. ती म्हणाली, ‘‘आपण एक दिवस करू.’’ माझ्या पत्नीच्या एका मैत्रिणीकडून तिने त्याची रेसिपी आणली. मग ठरवलं पत्नीसाठी हाच पदार्थ करायचा आणि तिला खाऊ घालायचा.

पकवान बनवण्यासाठी मी मैदा घेतला पाव किलो, तेल दोन चमचे, मीठ, जिरेपूड, अख्खे जिरे असे साहित्य घेतले. मैद्यामध्ये इतर साहित्य घालून घट्ट भिजवून घेतले. मैद्याचा मळलेला गोळा अर्धा तास भिजण्यासाठी झाकून ठेवला. तो भिजेपर्यंत डाळ बनवण्याची तयारी सुरू केली. डाळ बनवण्यासाठी दोन वाटी चणा डाळ, एक वाटी मूग डाळ, जिरे, जिरेपूड हे साहित्य घेतले. अर्थात दोन्ही डाळी रात्रीच भिजत घातल्या होत्या. फक्त पकवानाचे पीठ भिजवल्यावर त्या कुकरला लावून घेतल्या. त्या शिजवतानाच त्यात जिरे, जिरेपूड घातली. ही डाळ घट्टसर शिजवून त्यात मीठ आणि कोथिंबीर घातली. डाळ तयार झाल्यावर पकवान बनवण्यासाठी पीठाचे लहान लहान गोळे करून मोठाल्या पातळ पुऱ्या लाटल्या. कढईमध्ये त्या लालसर तळून घेतल्या.. झाले डाल पकवान तयार! त्यावर टाकण्यासाठी पुदिना, कैरी, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सर्व पदार्थ एकत्र करून पातळ चटणी तयार केली. सव्‍‌र्ह करताना बाऊलमध्ये तयार केलेली डाळ घालून त्यावर चटणी घालून त्यावर बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर पेरली आणि पकवान बरोबर सव्‍‌र्ह केला. (अगदी सिंधी कॉलनीत खाल्ला होता त्याप्रमाणे लागला तो.)आता मला काळजी होती की माझी मास्टर शेफ त्याला किती गुण देते याची. तिने डाल पकवानाचा पहिला घास तोंडात टाकला आणि डाव्या हाताने मस्तच झाल्याची खूण केली. डाल पकवानाचा हा पहिलाच प्रयोग असून मला तो जमल्याने आणि सौभाग्यवतींनी पसंतीची पावती दिल्याने मी मनोमन चांगलाच सुखावलो.

संजीव फडके- phadkesanjeev1956@gmail.com

First Published on August 26, 2017 2:24 am

Web Title: sanjeev phadke article on sindhi dal pakwan