तो बसस्टॉपवर उभा आहे. अस्वस्थ, सारखी चुळबुळ सुरू आहे. बसस्टॉपवर उभं राहिलं आणि हवी असलेली बस वेळेवर आली नाही की घालमेल होते. चार-पाच बसेस एकाच जागी थांबतात असा तो बसस्टँड, लांबच लांब रांगांचा. सदोदित माणसांनी गजबजलेला.. त्याच्यामागून किती तरी वेळाने आलेली माणसं, पाहिजे असलेली बस मिळून मार्गस्थ झालीयत. तो मात्र सारखा घडय़ाळाच्या काटय़ाकडे पाहतोय. वेळ अकारण फुकट चाललाय नि जिवाची कासाविशी होतेय.

एखादी बस आली की त्याच्यामागे नंबर असलेले प्रवासी लगबगीने पुढे येतात, सर्वानाच बसमध्ये जागा थोडीच मिळते! कंडक्टरने टिंगटिंग केलं की बस वेग घेऊन पसार होते. मग, मागून पुढे आलेले बस प्रतीक्षक तिथेच पुढे गर्दी करून उभे राहतात. कोण कुठच्या बससाठी उभं आहे याचा पत्ताच लागत नाही, नि इथेच शब्दाशब्दीला सुरुवात होते. तो जास्त चिडतो, कारण खूप खोळंबा झाल्यामुळे तो त्रासलेला असतो.

हिंदी-मराठीचे मिश्रण करीत तो भांडणाच्या सुरात बोलायला लागतो- ‘‘ओ मिस्टर, ओ सिस्टर, जरा दुसरों का भी सोचो! अपने नंबर पर पीछे जा कर खडे रहो ना. मी इथं पावनाघंटा खडा आहे- या लोकांची कमाल ना!’’

दुसरा त्याच्या सुरात सूर मिसळून पुस्ती जोडतो- ‘‘अभी ये तरीकाच बन गयेला है. बस आयेगी, ये लोग घुस जायेंगे! हम फालतू खडे के खडे!’’

आपल्याशी सहमत असलेला कुणी दुसरा आहे हे जाणवताच त्याला आणखी स्फुरण चढतं- ‘‘म्हणजे अहो, लाईन लावयाची कशाला ना!’’

मग उद्गारवाचकांची सरबत्ती सुरू होते.

एक आवाज- ‘‘अरे बस कर ना बक बक, हम नही जाते तेरे आगे, समझे!’’

‘‘बात इतनी सी और लेक्चर इतना लंबा!’’

‘‘प्रोफेसर लगता है!’’

‘‘छोड यार. प्रोफेसर होगा तो भी क्या- उधर कॉलेज मे कोई लेक्चर सुनता है भला! तो इधर आया लेक्चरबाजी चलाने!’’

अशी हिंदी बहरात आली असताना, एक लडिवाळ आवाज आला, ‘‘हो ना, अहो साधी गोष्ट आहे- पुढे उभे राहय़लो तरी आम्हाला हवी असलेली बस येईल तेव्हाच आम्ही आत शिरणार ना. आम्हीही एज्युकेटेड आहोत म्हटलं.’’

रांगेतल्या दुसऱ्या एका बाईला वाटलं, एवढी संधी चालून आल्ये, आपण तरी का गप्प बसावं! भाषणाचे सूत्र आपल्याकडे हवे तसे वळवीत ती किन्नरकंठी बोलायला लागते-‘‘रांग सोडून पुढे घुसता ते तुम्ही पुरुष.. आम्ही बायका नुसत्या चुटपुटत टकमक बघत राहतो. तुम्ही पुरुष, काय, एक इंच जाग मिळाली तरी लटकत जाता.’’

तिसरी तिला साथ देते- ‘‘तर हो, इकडे धक्के मारणाऱ्यांपासून सांभाळायचे, इकडे ती पर्स, ते गळ्यातलं- बाई गं बाई!’’

हास्याची एक लकेर उठते- एक खुसपुस-

‘‘या बायका म्हणजे हुशारी दाखवायला म्हणून जे बोलतात ना, त्यांतून स्वत:चा मूर्खपणाच दुप्पट प्रकट करतात!’’

‘‘एक्झ्ॉक्टली- च्यायला दागिने घालून येतातच कशाला!’’

‘‘नाही यार, दागिने घालून आपण चांगलं दिसतो असा गैरसमज असतो त्यांचा!’’

इतक्यात एक वृद्ध बाई बोलायला सुरुवात करते- ‘‘तुमच्या आयबेनला तमे लोगो ऐशाच बोलते काय! नाय म्हंजी बात तमारी साची- पैसा नाय, पैसा नाय बोंब मारायची, अे पहेनलेला कपडा अने जेवर बघूनशी घ्या. जमाना है बाबा. आमच्या बुढ्ढी लोगच्या सुनते कौन! खरी वात ना!’’

‘‘अहो, आजी आमच्यावर ताशेरे झाडताय, ते जरा पुढे या! ती बघा तुमची बस येत्ये.’’ दोन बसेस लागोपाठ येतात. थोडीशी गर्दी कमी होते. टाइमपासही संपतो. तो तसाच उभा. त्रस्त, कंटाळलेला. मागे वळून पाहतो, तो दोघं तिघंच लाइनीत. त्याला कमाल वाटते, तो घडय़ाळाकडे पाहतोय. रात्रीचे नऊ वाजायला आलेत. त्याचा अस्वस्थपणा ओळखून मागचा म्हणतो, ‘‘अहो एवढं भरताड तर गेलं. आता बाचाबाची तरी होणार नाही. कुठची बस पाहिजेले तुम्हाला!’’ त्याच्या मागचा एक जण उद्गारतो, ‘‘आता नऊनंतर पाहा. आता दुसराच त्रास सुरू होईल. आता डेपोच्या बसेस काढतील. आणि दुसऱ्या शॉर्ट रूट! या बसेसपायी अगदी कंटाळून गेलोय.’’

तो म्हणतो, ‘‘या त्रासाची मला आता सवयच झालीय. मला मीराबझारची बस हवीय, या रूटचा खरंच भरवसा नाहीये. एवढी रांग लागते, भांडणं होतात, शब्दाशब्दी होते पण इच्छित बस आली की रेटारेटी करत माणसं नजरेआड होतात. पण या रूटची कटकट सर्वात जास्त आहे. मी बेस्टला थोडी का पत्रं लिहिली. सुधारणा म्हणाल तर शून्य! दररोज टॅक्सी करणं परवडणार का आहे! होतं काय, इतका वेळ रखडल्यानंतर स्टेशनपर्यंत तंगडतोड करायची, त्या खचाखच गाडीतून लटकत जायचं. तोही वैतागच!’’

‘‘होय हो, डॅम दॅट रेल जर्नी. फार धोकादायक होत चाललाय दिवसेंदिवस. दाराजवळ बॅग हातात घेऊन उभं राहिलं, तर कुणी लाइनवरचा भामटा काठीचा फटका मारून बॅग खाली पाडणार. चेन खेचून गाडी थांबेस्तवर तो साला चोर काय थांबेल काय! उगाच वेस्ट ऑफ टाइम.  दुसरं एक आहेच, कधी समोरच्या खांबावर डोकं आपटून कपाळमोक्ष होईल हू नोज!’’

‘‘बरोबर बोललात. गाडीत चांगले टायवाले, चकाचक बुटवाले, इस्त्रीदार संभावित आपल्या आसपास असतात. पेपर दुमडून, शेजारी चांगला माणूस आहे या विश्वासावर निश्चिंत वाचत राहावे, नि घरी गेल्यावर पत्ता लागतो पाकीट गायब!’’

‘‘अगदी बरोबर भाऊ, चोर चोरासारखे दिसत नाहीत. आता तुमच्या माझ्यासारखा ड्रेस असलेल्याला कुणी चोर म्हणायला धजेल! म्हणजे बघा ना आपल्या मागून कुणी चोर चोर म्हणत धावेल?’’

‘‘त्यापेक्षा हा वेळखाऊ बसचा प्रवास पत्कारला. जरा सेफ वाटतं.’’

‘‘तसं मात्र समजू नका राव. आता आपण दोघं तिघं आहोत म्हणून ठीक आहे. पण रात्रीच्या वेळी एकटय़ा दुकटय़ाने बसस्टॉपवर तिष्ठत राहणं धोक्याचं झालंय.’’

‘‘ते आहे म्हणा, पण तरी चोरीचा धोका कमी. माणसं येत असतात, जात असतात. एखादाच मनुष्य जास्त वेळ रेंगाळताना पाहिला की आपण सावध असतोच.’’

‘‘वा, म्हणजे आज मी खूपच रेंगाळलोय. माझ्यावर नजर ठेवून आहात तर तुम्ही!’’

‘‘ओह नो, आज आपण तिघंही रखडलोय. एकमेकांच्या सोबतीनं उभं राहिलोय. वेळ कंटाळवाणा होऊ नये म्हणून ओळख असल्यासारखे बोलतोय, याचाच अर्थ एक मेकाच्या सज्जनपणाबद्दल मनांत खात्री आहे.’’

इतक्यात एक बस येते. तिसरा मनुष्य- ‘‘अच्छा, बाय, मी तरी सुटलो,’’ म्हणत बसमध्ये चढतो.

उरतात दोघे. मीराबाजारची बस हवी असणारा म्हणतो, ‘‘आज फारच तंगलो. उद्या बीईएसटीत धडकतो. इतकी बिनभरवशाची बससर्विस बंद करा म्हणावं! दुसरी एखादी फ्रिक्वेन्सी  असलेली बस डायव्हर्ट करून या रूटवर लावा! इकडे भाडी वाढवायची. वर अधिभार द्यायचा. पण बससेवेत सुधारणा! माजल्येत लेकाचे!’’

‘‘रियली ट्र, पण आता तुम्ही काय ठरवताय? आता येणाऱ्यापैकी निम्म्या बसेस शॉर्टरूट धावणार. अहो, माझी मुलगी माझी वाट पाहत जागत राहते हो. बायकोदेखील चिडचिड करते!’’

‘‘आमच्या घरी हेच पिक्चर! आमच्या घरी तर जुळ्याचं दुखणं! एकाच खेपेत हम दोनों को, हमारे दोनो का लाभ. संकल्प आणि सिद्धी!’’

‘‘क्या बात है. नावं छान ठेवलीयत. कसले संकल्प योजल्येत! किती सिद्धीला गेल्येत. जस्ट गमतीत विचारतोय!’’

‘‘वा, संकल्प सिद्धीस गेल्येत ना, त्याची वाच्यता करता उपयोगी नाही. या गोष्टी दुसऱ्याच्या नजरेस आल्या की मर्म संपलं त्यातलं!’’

‘‘ओह! म्हणजे मी तो दुसरा!’’

‘‘डोन्ट टेक इट दॅट वे. पंचावन्न मिनिटांत आपण एकमेकांच्या किती जवळ आलोय!’’

‘‘बरं, मी काय म्हणतो. आता वाट नको बघू या. टॅक्सी शेअर करू या. मला टिम्बर फॅक्टरीजवळ सोडा. बिल निम्म निम्म.’’

‘‘बिल सोडा हो. सोबत महत्त्वाची. स्टेट्स एक, राहणी एक, विवंचना एक. एवढं जमल्यावर समजा मी दिलं बिल तर हरक त काय! परत अशीच भेट झाली. असाच खोळंबा झाला तर तुम्ही द्या बिल!’’

‘‘ओह.. व्हेरी नाइस ऑफ यू. अहो मिस्टर, पण तुमचे पैसे वाचलेत आज!’’

‘‘म्हणजे तो तिसरा थोडय़ा वेळापूर्वी निसटला तो लोफर होता की काय?’’

‘‘नो, नो.. सर! आपली प्रियतमा. ती नकटी बस येताना दिसत्ये!’’

‘‘ओह, अगदी खरं. ही मीराबाजाराची बस नकटी म्हणालात अगदी पटलं. नकटीचं विघ्न आणते म्हणतात ना!’’

‘‘ओह, क्या बात है! बसदेवता प्रसन्न होते. ती शॉर्ट रूट नसू दे म्हणजे मिळवलं!’’

बस पुढय़ात येते.

दोघे बसमध्ये चढतात.

पहिला तावडीत सापडतो तो कंडक्टर- ‘‘काय भाऊ एवढय़ा वेळात आम्ही लंडनला पोहोचलो असतो, पैसे घेऊन लोकांना सतावताय. कार्यक्षमतेच्या नावाने ओम् भम् भम्!’’

‘‘माझ्याशी तानातानी करण्यात काय मतलब? मी नोकर माणूस. तुम्ही मॅनजमेंटला कंप्लेंट करा! तरी सांगतो. अहो एकीला बिगडी हुई लेबल लागलं. दुसरीला ड्रायव्हर नाही! तुम्ही आमच्या नावाने बोंबलता! ही लास्ट बस आहे. नशीब समजा!’’

‘‘अहो पण हे रोजचंच चाललंय. इथं दम निघतो आमचा! ’’

‘‘मी कुठं नाय म्हणतो- तुम्ही वरच्या साहेब लोकान्ला भेटा.’’

– बस सुरू होते.

टिंबर फॅक्टरीजवळ उतरता उतरता, प्रेमाचे निरोप होतात.

‘‘ओळख ठेवा. फिर मिलेंगे!’’

‘‘हो हो तर. मी जाम बोअर झालो होतो. तुम्ही होतात. मनमोकळे बोलणारे निघालात. जरा बरं वाटलं.’’

‘‘अच्छा बाय!’’

बस पुढे जाते. तो भराभर थोडे अंतर चालून एका गल्लीत शिरतो. खोलीचे कुलूप काढतो. दिवा लावतो व पुन्हा खोलीचे दार अन् खिडकी बंद करतो. मनाशी पुटपुटतो, संकल्प-सिद्धीवाल्या, आता फिर मिलेंगे कशाला! एकही मुलाकात काफी है. पहचान हुई. बात बन गयी. खतम्! खिशातून जड पाकीट बाहेर काढतो.

आतून भराभरा कागदाचे कपटे बाहेर येतात. तो चिडतो, संतापतो. अरे ये बात! आता पुन्हा भेटलंच पाहिजे. पँटच्या मागच्या खिशातून स्वत:चे पाकीट काढतो-उघडतो. पाकीट साफ रिकामे!

साला, जबरदस्त कारागीर निकला. बगलमे बैठकर, मीठी मीठी बाते करते करते संकल्प की सिद्धी करके आगे निकल पडा! कंडक्टर के साथ इतनी लंबी चौडी बाते करते करते बदमाशने!

आजपर्यंत या एरियात असं कधी घडलं नव्हतं. शेवटची बस और पाकीट फू ल. दोनशे-तीनशेला मरण नाही. साले की ही चाल! अरे मेरे पर सवाई निकला. अभी देखनाच पडेगा!

सिगरेटचे झुरके ओढत तो भिंतीला पाय लावून आडवा होतो. मनात शब्दांच्या लाह्य फुटतच असतात.

अरे यार! तुझे देख लुँगा रे! परत भेटलाच पाहिजे. मेरेसे सवाई बनने का हिसाब अभी तेरेकू  देनाच पडेगा साले! बाहेर रात्र चढत असते. तो दिवा बंद करतो. आणि तो, आपल्या मनातल्या चांदण्यातल्या प्रकाशात उद्याच्या बेताची जुळवाजुळव करीत असतो.

सुमन फडके – response.lokprabha@expressindia.com