आप, मगोप आघाडीच्या कामगिरीकडे लक्ष

प्रचारातील आरोप-प्रत्यारोप तसेच गोव्यात राजकीय पटलावर नव्याने आलेला आप व मगोप-गोवा सुरक्षा मंच व शिवसेना यांच्या आघाडीच्या कामगिरीबाबत उत्सुकता असताना राज्यातील ४० जागांसाठी शनिवारी दि. ४ रोजी मतदान होत आहे.

राज्यात अकरा लाखांवर मतदार असून, १६४२ मतदान केंद्रे आहेत. या मतदानातून पाच माजी मुख्यमंत्र्यांचे भवितव्य निश्चित होईल. सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस यांच्यात राज्यात सत्तेसाठी चुरस आहे. त्यातच संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना पुन्हा राज्यात परतणार काय याभोवतीच प्रचार केंद्रित झाला होता. गेल्या वेळी भाजपची महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी आघाडी होती. या वेळी भाजप स्वबळावर ३७  ठिकाणी काँग्रेस ३८ तर आप ३९ जागा लढवीत आहे.

गेल्या वेळचे एकूण मतदान ८२.२ टक्के

पणजीत या वेळी लक्षवेधी लढत आहे. भाजपने सिद्धार्थ कुंकळीकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. ते संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्याविरोधात बाबुश मोन्सेरात यांचे आव्हान आहे. बाबुश यांनी पणजी महापालिका निवडणुकीत भाजप व काँग्रेस दोघांनाही धक्का दिला होता.

मांद्रे  मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा हा मतदारसंघ असल्याने विशेष लक्ष आहे. येथून काँग्रेसकडून माजी आमदार दयानंद सोपटे यांनी त्यांना आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे सोपटे पूर्वी भाजपमध्ये होते.

प्रियोळ  मगोपचे नेते दीपक ढवळीकर यांच्यापुढे अपक्ष गोविंद गावडे यांचे आव्हान आहे. गावडे हे उद्योजक असून, या मतदारसंघात खाण कामगारांची मते मोठय़ा संख्येने आहेत.

फोंडा या मतदारसंघातून गेल्या वेळी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे लवू मामलेदार यांनी धक्कादायक विजय नोंदवला होता. यंदा त्यांच्यासमोर पुन्हा एकदा काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री रवी नाईक हे आहेत.

काणकोण भाजपचे विजय पै-खोत व अपक्ष रमेश तवडकर यांच्यात चुरशीचा सामना येथे आहे. विशेष म्हणजे तवडकर हे मंत्री होते. या वेळी भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली. तर पै हे माजी आमदार आहेत.

प्रचाराची वैशिष्टय़े

  • प्रचारात भाजपने विकासाच्या मुद्दय़ावर भर दिला या मध्ये विविध सामाजिक सुरक्षा योजना तसेच पायाभूत सुविधा क्षेत्रात झालेल्या कामांच्या जोरावर पुन्हा कौल मागितला आहे.
  • तर काँग्रेसने सत्ताधाऱ्यांनी जी आश्वासने दिली ती पाळली नसल्याचा आरोप प्रचारात केला. राज्यातील निवडणुकीत नव्याने उतरलेल्या आम आदमी पक्षाने भ्रष्टाचार रोखण्यासाठी तीन महिन्यांत उपाययोजना करू अशी घोषणा दिली. माजी अधिकारी इलविस गोम्स यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून त्यांनी जाहीर केले
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर सुभाष वेलिंगकर यांची ताकद या निवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध होणार आहे. त्यांच्या गोवा सुरक्षा मंचने मगोप व शिवसेनेशी आघाडी केली आहे.

untitled-17