गोव्यात काँग्रेसचे उमेदवार क्लॅफासो डायस यांनी निसटता विजय मिळवला आहे. मात्र विशेष बाब म्हणजे क्लॅफासो डायस यांना मतमोजणीनंतर पराभूत घोषित करण्यात आले होते. क्लॅफासो डायस यांचा ५० मतांनी पराभव झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र फेरमतमोजणीत क्लॅफासो यांनी विजय मिळवला. क्लॅफासो डायस यांनी जोकिम अलेमाओ यांचा पराभव केला. जोकिम अलेमाओ कुनकोलिम मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.

कुनकोलिम मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार क्लॅफासो डायस आणि अपक्ष उमेदवार जोकिम अलेमाओ यांच्यात अटीतटीची लढत झाली. मतमोजणीनंतर अपक्ष उमेदवार जोकिम अलेमाओ यांना ५० मतांनी विजयी घोषित करण्यात आले. मात्र क्लॅफासो डायस यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यानंतर फेरमतमोजणीला सुरुवात झाली आणि निवडणुकीचा निकाल बदलला. आधी पराभूत घोषित करण्यात आलेल्या क्लॅफासो डायस यांना फेरमतमोजणीनंतर विजयी घोषित करण्यात आले. क्लॅफासो डायस यांनी १४९ मतांनी विजय मिळवला.

गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये बहुमतासाठी जोरदार संघर्ष सुरू आहे. सत्ताधारी पक्षाविरोधात असलेल्या नाराजीचा फटका भाजपला बसला आहे. मात्र तरीही काँग्रेस आणि भाजपमध्ये बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मांद्रे मतदारसंघातून पराभवाचा धक्का बसला आहे.