काँग्रेसला सर्वाधिक जागा; सत्तेसाठी मगोप, गोवा फॉरवर्ड निर्णायक

गोव्यात कुणाचे राज्य येणार याचे उत्तर आता गोवा फॉरवर्ड व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांच्याकडे आहे. शनिवारी गोव्याच्या चाळीस जागांसाठी झालेल्या मतमोजणीत सर्वाधिक सतरा जागा काँग्रेसने जिंकल्या. तर सत्ताधारी भाजपला केवळ १३ जागा मिळाल्या. विशेष म्हणजे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा धक्कादायक पराभव झाला.

गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाई यांनी कुणाला पाठिंबा देणार याबाबत बोलण्याचे टाळले. मात्र काँग्रेसने अनेक ठिकाणी आमच्या उमेदवारांविरोधात काम केले. त्याचे विश्लेषण करू असे स्पष्ट केले. प्रतिष्ठेची पणजीची जागा भाजपने राखली आहे. भाजपच्या सिद्धार्थ कुंकळीकर यांनी युनायटेड गोवन्स पक्षाच्या बाबुश मोन्सेरात यांचा पराभव केला. फोंडामधून काँग्रेसचे रवी नाईक तर मडगावमध्ये दिगंबर नाईक विजयी झाले. वाळपेयीमध्ये काँग्रेसच्याच विश्वजीत राणे यांनी मोठय़ा मताधिक्याने विजय मिळवला. गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चिल आलेमाव यांनी विजय मिळवून पक्षाचे खाते उघडले. भाजपच्या अपयशाला संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचने घेतलेली मतेही कारणीभूत ठरली. काँग्रेसला मिळालेल्या १७ जागांपैकी या पक्षाने मांद्रे, थिवीम, सांताक्रूझ, सेंट आंद्रे, सिरोदा आणि कुणकोलीम या जागा भाजपकडून खेचून घेतल्या. गोवा काँग्रेसचे अध्यक्ष लुइझिनो फालेरो यांच्यासह पक्षाच्या प्रचाराची रणनीती ठरविणारे डॉ. ए. चेल्ला कुमार यांनी, योग्य उमेदवारांमुळे पक्षाची कामगिरी सुधारल्याचे सांगितले. गोव्यातील चर्चकडूनही काँग्रेसला चांगला पाठिंबा मिळाला. अखेर सायंकाळी डॉ. चेल्ला कुमार यांनी काँग्रेस गोव्यात सरकार स्थापन करीत असल्याचे जाहीर केले, पेर्णे येथील अपक्ष रोहन खौंते आमच्यासमवेत असल्याचे ते म्हणाले.

मगोप आणि गोवा सुरक्षा मंचच्या आघाडीतील  शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही.