गोव्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. यामध्ये काँग्रेसने पहिला क्रमांक पटकावला असला तरी, काँग्रेस बहुमतापासून दूर आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधातील नाराजीचा फटका भाजपला बसला आहे. तर काँग्रेसला भाजपविरोधातील नाराजीचा फायदा मिळाला आहे.

आम आदमी पक्षाचा झंझावात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंच, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि शिवसेनेमुळे मतांमध्ये होणारे विभाजन अशा स्थितीत गोवामधील सत्ता कायम राखण्याचे आव्हान भाजपसमोर होते. काँग्रेसला गोव्यात गटबाजीचा फटका बसला. मात्र तरीही गोव्यात काँग्रेस हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. एक्झिट पोल्समध्ये भाजपच राज्यात पुन्हा सत्तेत येईल, असे भाकीत वर्तविण्यात आले होते. मात्र एक्झिट पोल्सचे अंदाज चुकीचे ठरले

भारतीय जनता पक्ष २०१२ पासून गोव्यात सत्तेत होता. गोवा विधानसभेत ४० जागा असून २०१२ च्या निवडणुकीत भाजपचे २१ आमदार निवडून आले होते. तर काँग्रेसचे ९, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे ३,  गोवा विकास पार्टीचे २ तर पाच अपक्ष आमदार निवडून आले होते. भाजपच्या एकूण २१ आमदारांपैकी त्यापैकी पाच कॅथलिक आमदार होते. तर दोन भाजपपुरस्कृत अपक्ष आमदार कॅथलिक होते. तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसवरील खाण घोटाळ्याचे आरोप, काँग्रेसमधील घराणेशाही आणि भ्रष्टाचारामुळे कंटाळलेल्या मतदारांनी भाजपला साथ दिली होती. ख्रिश्चन समाजातील ९ टक्के मते भाजपला मिळाली होती. मनोहर पर्रिकर यांच्यासारखा सर्वमान्य चेहरा भाजपकडे होता आणि याचा
पक्षाला फायदा झाला होता.  तसेच भाजपने महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षासोबत युतीही केली होती.

केंद्रात आणि गोव्यातही सत्तासूत्रे हाती असूनही भाजपला गोवा विधानसभा निवडणुकीत खूप संघर्ष करावा लागला. २०१२ च्या निवडणुकीत खाण घोटाळ्यातील आरोपींना तुरुंगात डांबण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. विरोधी बाकावर असताना मनोहर पर्रिकर यांनी भ्रष्टाचारावर सडकून टीका केली होती. मात्र सत्तेवर आल्यावर भाजपला आश्वासन पूर्ण करता आले नाही. मनोहर पर्रिकर दिल्तीत दाखल झाल्यावर लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. पण पार्सेकर यांनाही चमकदार कामगिरी करण्यात अपयश आले. दयानंद सामाजिक योजनेत ज्येष्ठ नागरिकांबरोबरच अपंगांना दरमहा साडेचार हजार रुपये भत्ता, लाडली लक्ष्मी, गृह आधार अशा समाजपयोगी योजनांचा फायदा सरकारला होईल असा दावा भाजपचे नेते करत होते. मात्र हे सर्वच दावे पोकळ ठरले.

यंदाच्या निवडणुकीत भाजपने चाळीसपैकी ३६ जागा, काँग्रेस ३७ तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष-शिवसेना-गोवा सुरक्षा मंच युती ३६ जागा लढवल्या. या वेळी प्रथमच आम आदमी पक्षाने गोवा विधानसभेची निवडणूक लढवली. एकूण ३९ उमेदवार ‘आप’ने उभे केले होते. मात्र आपची गोव्यात धूळधाण उडाली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, गोवा विकास पक्ष, गोवा सुराज पक्ष या पक्षांनीदेखील उमेदवार रिंगणात उतरवले होते. बारापेक्षा जास्त राजकीय पक्ष रिंगणात असले तरी, भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना बहुतेक मतदारसंघांमध्ये होता. काही मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती होत्या. भाजपची मदार मनोहर पर्रिकर यांच्यावर होती. सत्ता आल्यास मनोहर पर्रिकर पुन्हा गोव्यात परतण्याची चर्चाही रंगली होती. मात्र याचा कोणताही फायदा भाजपला झाला नाही.

 

२०१२ मधील गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल
१. मांद्रे – लक्ष्मीकांत पार्सेकर  (भाजप)
२. पेडणे – राजेंद्र अर्लेकर – (भाजप)
३. डिचोली – नरेश सावल (अपक्ष)
४. थिवी – किरण कांडोळकर (भाजप)
५. म्हापसा- फ्रान्सिस डिसूझा (भाजप)
६. शिवोली – दयानंद मांद्रेकर (भाजप)
७. साळगाव- दिलीप परुळेकर (भाजप)
८. कळंगूट- मायकल व्हिन्सेट लोबो (भाजप)
९. पर्वरी- रोहन खवटे (अपक्ष)
१०. हळदोणे – ग्लेन टिकलो (भाजप)
११. पणजी – मनोहर पर्रिकर (भाजप)
मनोहर पर्रिकर संरक्षणमंत्री झाल्याने २०१५ मध्ये पणजीत पोटनिवडणूक –
सिद्धार्थ कुंकळीकर विजयी (भाजप)
१२. ताळगाव – जेनिफर मॉन्सेराट (काँग्रेस)
१३. सांताक्रूझ – अतानासिओ मॉन्सेराट (काँग्रेस)
१४. सांत आंद्रे – विष्णू वाघ (भाजप)
१५. कुंभारजुवे – पांडूरंग मडकईकर (भाजप)
१६. मये – अनंत शेट (भाजप)
१७. साखळी – प्रमोद सावंत (भाजप)
१८. पर्ये – प्रतापसिंह राणे (काँग्रेस)
१९. वाळपई – विश्वजित राणे (काँग्रेस)
२०. प्रियोळ – पांडूरंग ढवळीकर (महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी)
२१. फोंडा – लवू मामलेदार (महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी)
२२. शिरोडा – महादेव नाईक (भाजप)
२३. मडकई – रामकृष्ण ढवळीकर (महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी)
२४. मुरगाव – मिलिंद नाईक (भाजप)
२५. वास्को द गामा – कार्लुस आल्मेदा (भाजप)
२६. दाबोळी – मावीन गुदिन्हो (काँग्रेस)
२७. कुठ्ठाळी – माथानी साल्ढाणा (भाजप)
२८. नुवे – फ्रान्सिस्को पाशेको (गोवा विकास पार्टी)
२९. कुडतरी – आलेक्स रिजीनाल्द लॉरेन्सो (काँग्रेस)
३०. फातोर्डा – विजय सरदेसाई (अपक्ष)
३१. मडगाव- दिगंबर कामत (काँग्रेस)
३२. बाणावली – कॅटॅनो आर सिल्वा (गोवा विकास पक्ष)
३३. नावेली –  आवेर्तान फुर्तादो (अपक्ष)
३४. कुंकळ्ळी – सुभाष नाईक (भाजप)
३५. वेळ्ळी – बेजामिंन सिल्वा (अपक्ष)
३६. केपे – चंद्रकांत कवलेकर (काँग्रेस)
३७. कुडचडे – निलेश कॅब्रल (भाजप)
३८. सावर्डे – गणेश गावकर (भाजप)
३९. सांगे – सुभाष फळदेसाई (भाजप)
४०. काणकोण – रमेश तवडकर (भाजप)

ओपिनियन पोलचा कल काय होता ?
गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी सी व्होटरने फेब्रुवारीमध्ये केलेल्या जनमत चाचणीत भाजपची सत्ता जाणार असे भाकित वर्तवण्यात आले होते. काँग्रेसला २१ तर आपला २ जागांवर आणि अन्य पक्षांना ९ जागांवर विजय मिळू शकेल असा अंदाज वर्तवला होता. जानेवारी २०१७ मध्ये द वीक आणि हंसा यांनी केलेल्या जनमत चाचणीत भाजप बहुमताजवळ पोहोचेल असे भाकित वर्तवले होते. भाजपमध्ये १७ ते १९, काँग्रेसला ११ ते १३, आपला २ते ४ जागांवर विजय मिळू शकतील, असा अंदाज या चाचणीत वर्तवण्यात आला होता. अॅक्सिस – इंडिया टुडेच्या जानेवारी २०१७ मधील जनमत चाचणीत भाजपला २० ते २४ जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर काँग्रेसला १३ ते १५, तर आपला २ ते ४ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. कौटील्यने ऑगस्ट २०१६ मध्ये गोव्यात घेतलेल्या जनमत चाचणीत भाजपला १७ – २१ जागांवर विजय मिळेल, असे भाकित वर्तवण्यात आले होते. तर काँग्रेसला ७, आपला १४ आणि अन्य पक्षांना आठ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

एक्झिट पोल काय सांगतात?

पाच राज्यांसाठी मतदान पार पडल्यानंतर आता विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली. गोव्यात पुन्हा एकदा कमळ फुलण्याची दाट शक्यता असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला. मात्र ४० आमदार असलेल्या गोवा विधानसभेत बहुमताचा आकडा गाठणे भाजपला कठीण होत असल्याचे बहुतांश एक्झिट पोलमधील आकड्यांवरुन समोर आले आहे. मात्र भाजपच गोव्यातील सर्वात मोठा पक्ष असेल, हे सर्वच एक्झिट पोलमधून समोर आले आहे.

इंडिया टुडे-अॅक्सिस पोलने भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली. भाजपला ४० पैकी १८ ते २२ जागा मिळतील, असा अंदाज इंडिया टुडे-अॅक्सिसने वर्तवला होता. तर काँग्रेसला ९ ते १३ जागांवर समाधान मानावे लागेल, असे इंडिया टुडे-माय अॅक्सिसने म्हटले होते. यासोबत आम आदमी पक्षाला ० ते २ जागांवर तर इतरांना ५ ते ९ जागांवर यश मिळेल, असा अंदाज इंडिया टुडे-अॅक्सिस पोलने वर्तवला होता.

इंडिया टिव्हीच्या एक्झिट पोलने भाजपला गोव्यात सत्तास्थापनेची सर्वाधिक संधी असल्याचे म्हटले होते. इंडिया टिव्हीच्या एक्झिट पोलने गोव्यात भाजपला १५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता. तर काँग्रेसला १०, आम आदमी पक्षाला ७ तर इतरांना ८ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. भाजपला इतरांच्या साथीने सरकार स्थापन करता येईल, असा अंदाज इंडिया टिव्हीने वर्तवला होता.

एबीपी वृत्तवाहिनीने भाजपला गोव्यात १८ ते २२ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता. तर काँग्रेसला ९ ते १३ तर आम आदमी पक्षाला केवळ ० ते २ जागांवर यश मिळेल, असा अंदाज एबीपीकडून वर्तवण्यात आला होता.

टाईम्स नाऊ आणि सी व्होटर्सने भाजपला गोव्यात १५ ते २१ जागांवर यश मिळवण्याचा अंदाज वर्तवला होता. तर काँग्रेस १२ ते १८ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असेल, असे टाईम्स नाऊ आणि सी व्होटर्सच्या एक्झिट पोलने म्हटले होते. तर आम आदमी पक्षाला ० ते ४ जागांवर यश मिळेल, असे या एक्झिट पोलने म्हटले होते.