24 November 2017

News Flash

शपथ घेताना पर्रिकर ‘मुख्यमंत्री’ शब्द विसरले; गडकरी आले धावून..

शपथविधीतही गडकरी पर्रिकरांच्या मदतीला

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: March 14, 2017 7:13 PM

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर

मनोहर पर्रिकरांनी गोव्याचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कोकणी भाषेत पर्रिकरांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी पर्रिकरांनी शपथ दिली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. मात्र शपथ घेताना मनोहर पर्रिकर ‘मुख्यमंत्री’ हा महत्त्वाचा शब्द विसरले. यानंतर मनोहर पर्रिकरांच्या मदतीला नितीन गडकरी धावून आले. गडकरींनी लगेच उठून ‘तुम्ही फक्त मंत्रिपदाची शपथ घेतली आहे,’ असे सांगितले. यामुळे पर्रिकरांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री हा शब्द वापरुन पुन्हा एकदा शपथ घेतली.

गोव्यात भाजपचे सरकार स्थापन करण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा वाटा आहे. भाजप राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असताना आणि काँग्रेसला सत्ता स्थापनेची सर्वाधिक संधी असतानाही नितीन गडकरींनी पडद्यामागून सर्व सूत्रे हलवली. त्यामुळे काँग्रेसच्या तोंडचा घास हिरावला गेला आणि मनोहर पर्रिकरांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला. विशेष म्हणजे मनोहर पर्रिकरांना मुख्यमंत्री करण्यात पडद्यापाडून महत्त्वाची भूमिका बजावलेले नितीन गडकरी शपथविधी समारंभातही पर्रिकरांच्या मदतीला धावून आले. शपथ घेताना ‘मुख्यमंत्री’ हा महत्त्वाचा शब्द विसरल्याची आठवण गडकरींनी पर्रिकरांना करुन दिली.

गोव्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन व्हावे, यासाठी नितीन गडकरींनी निकालानंतर जातीने लक्ष घातले. गोव्यातील सत्ता स्थापनेची सर्व सूत्रे नितीन गडकरींनी सांभाळली. त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागताच रात्रीच नितीन गडकरी गोव्यात दाखल झाले. यानंतर त्यांनी छोट्या पक्षांशी संवाद साधला. गडकरी यांनी छोट्या पक्षांशी संवाद साधल्याने भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला. ‘मनोहर पर्रिकरांना मुख्यमंत्री म्हणून आणल्यावरच भाजपला पाठिंबा देऊ,’ अशी भूमिका मित्रपक्षांनी घेतल्यानंतर नितीन गडकरी यांनी पंतप्रधान मोदींशी बातचीत करुन योग्य मार्ग काढला. मित्रपक्षांची मागणी मान्य करत नितीन गडकरी यांनी गोव्यात भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला.
मनोहर पर्रिकरांना गोव्याचे मुख्यमंत्री करण्यात नितीन गडकरींनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. त्यामुळेच मनोहर पर्रिकरांच्या शपथविधीला गडकरी आवर्जून उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना मुख्यमंत्री हा शब्दच पर्रिकर विसरले. तेव्हा गडकरींनी लगेच ही बाब पर्रिकरांच्या लक्षात आणून दिली आणि त्यांना ‘मुख्यमंत्री’ करण्याची जबाबदारी शेवटच्या क्षणापर्यंत पार पाडली.

पर्रिकर शपथ घेताना मुख्यमंत्री हा शब्द विसरल्याची आठवण गडकरींनी करुन दिली. त्यामुळे गडकरींनी पर्रिकरांना शब्दशः मुख्यमंत्री बनवलं, असं म्हणता येईल. कारण गोव्यातील सत्ता स्थापनेचे सर्व सुत्र गडकरींनी हाताळले आहेत. निकालाच्या दिवशी रात्रीच गडकरी गोव्याला रवाना झाले. त्यानंतर त्यांनी मित्रपक्षांशी यशस्वीपणे बोलणी करुन बहुमताचा आकडा गाठला. मित्रपक्षांची पर्रिकरांना गोव्यात आणण्याची मागणीही गडकरींनी मान्य केली.

 

First Published on March 14, 2017 6:26 pm

Web Title: manohar parrikar makes mistake during oath ceremony forgot cm word