गोव्यातली आपली सत्ता राखण्यासाठी भाजपने जोरदार तयारी चालवलेली असतानाच आता ‘महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष’ म्हणजेच ‘मगोप’ भाजपला पाठिंबा देणार असल्याचं मगोपचे नेते सुदीन ढवळीकर यांनी जाहीर केलंय.

गोव्यामध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून १७ जागांसह आघाडीवर आहे भाजपने आपल्या १३ जागांसोबत इतरांची साथ घेत सत्तेसाठी प्रयत्न चालू ठेवले आहेत. मगोपला ३ जागा मिळाल्या आहेत.

केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासाठी गोव्यातली भजपची सत्ता प्रतिष्ठेची बाब आहे. यंदाच्या निवडणुकीत गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांता पार्सेकर यांचा पराभव झाल्यामुले तिथल्या भाजप सरकारच्या प्रतिमेला धक्क लागला आहे.

गोव्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसनेही इतर पक्षांच्या साथीने सरकारस्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचे बडे नेते दिग्विजय सिंह यांनी याविषयीची काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. गोवा फाॅरवर्ड पक्षाने आपण कुणाला पाठिंबा देणार आहोत याविषयीची भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. मगोप प्रमाणेच गोवा फाॅरवर्डला तीन जागा मिळाल्या आहेत. आता मगोप ने भाजपने पाठिंबा दिल्यामुळे गोवा फाॅरवर्ड तसंच अन्य तीन आमदार कोणाला पाठिंबा देणार यावर गोव्यातली सत्तासमीकरणं अवलंबून राहणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराचा पाठिंबाही आता महत्त्वाचा ठरणार आहे.

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसने पंजाबमध्ये आणि गोव्यात चांगली कामगिरी केली आहे.  पंजाबची सत्ता एकहाती काँग्रेसच्या हातात आहे तर गोव्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस आघाडीवर आहे. गोवा विधानसभेत ४० जागा असून २१ चा जादुई आकडा गाठण्यासाठी काँग्रेस आणि भाजप या दोघांकडूनही प्रयत्नांची शिकस्त केली जाण्याची चिन्हं आहेत. गोव्यातल्या सत्तेचा प्रश्न भाजप आणि काँग्रेस दोघांनाही प्रतिष्ठेचा झाला आहे