गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडची जबाबदारी या तीन नेत्यांकडे

आज (शनिवार) असलेल्या पाच राज्यांच्या निकालांमध्ये महाराष्ट्रातील तीन नेत्यांची प्रतिष्ठा दडली आहे. केंद्रीय रस्ते महामार्गमंत्री नितीन गडकरी, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू ही ती नावे. मतदानोत्तर चाचण्यांनुसार या तीनही नेत्यांची प्रतिष्ठा जपली जाण्याची एकंदरीत चिन्हे आहेत.

गडकरी यांच्याकडे गोव्याची, जावडेकर यांच्याकडे मणिपूरची आणि जाजू यांच्याकडे उत्तराखंडची जबाबदारी आहे. गोव्यामध्ये आपचे आव्हान लक्षात घेऊन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मदतीला थेट गडकरींना पाठविले होते. गडकरींच्या सक्रिय सहभागाने तिथे पक्षाला चांगलीच जुळवाजुळव करता आल्याचे मानले जाते. मतदानोत्तर चाचण्यांनुसार, गोव्यामध्ये भाजपला संधी असल्याचे चित्र आहे.

जाजू हे दिल्लीबरोबरच उत्तराखंडचे पक्ष प्रभारी. मुख्यमंत्री व काँग्रेसचे लोकप्रिय नेते असलेल्या हरीश रावत यांच्याशी दोन हात करून राज्य हिसकावण्याची अवघड जबाबदारी त्यांच्यावर आहे.

विशेषत: उत्तर प्रदेशातील निकालाबाबत खात्री नसल्याने किमान उत्तराखंड तरी जिंकण्याचा चंगच भाजपने बांधला आहे. तिथे मोदींनी आक्रमक प्रचार केला आहे. जाजूंव्यतिरिक्त जे. पी. नड्डा आणि धर्मेद्र प्रधान या दोन केंद्रीय मंत्र्यांनी व्यवस्थापन सांभाळले. आतापर्यंत नेहमी काँटे की टक्करचा इतिहास असलेल्या या राज्यामध्ये भाजपला सर्वाधिक संधी असल्याचे चित्र चाचण्यांतून उमटले आहे.

मणिपूर जिंकून ईशान्य भारतातील पाळेमुळे घट्ट करण्याची भाजपची इच्छा आहे. त्याची जबाबदारी जावडेकरांकडे आहे. जावडेकरांबरोबरच पक्षाचे प्रभावी सरचिटणीस राम माधवदेखील मणिपूरमध्ये लक्ष घालत आहेत. चाचण्यांमधून भाजपला बरोबरीची संधी असल्याचा अंदाज व्यक्त झाला आहे. यश मिळाल्यास ईशान्येतील आठपैकी चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता असेल.

या तीन राज्यांव्यतिरिक्त उत्तर प्रदेश व पंजाब ही दोन राज्ये उरतात. उत्तर प्रदेशची थेट सूत्रे अमित शहा, प्रभारी ओ. पी. माथूर आणि सहप्रभारी सुनील बन्सल यांच्याकडे होती. तर धाकटा भाऊ असलेल्या पंजाबची सूत्रे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री विजय सांपला आणि प्रभारी प्रभात झा यांच्याकडे होती. पंजाबात भाजप फक्त २३ जागा लढवीत आहे.

अमित शहा यांची भय्याजी जोशी यांच्याशी चर्चा

मुंबई : भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी अचानकपणे मुंबईत येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची शुक्रवारी भेट घेतली. उत्तर प्रदेशसह काही राज्यांचे निवडणूक निकाल शनिवारी जाहीर होत असताना शहा यांनी भय्याजी जोशी यांच्याशी विचारविनिमय केला. त्यानंतर ते लगेच नवी दिल्लीला रवाना झाले.

उत्तर प्रदेशसह काही राज्यांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. भाजपला स्वबळावर सत्ता मिळेल किंवा किमान सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष भाजप ठरेल, असेच या चाचण्यांचे निष्कर्ष आहेत. या पाश्र्वभूमीवर भाजपची रणनीती काय असावी आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्याशी समझोता करावा लागल्यास काय व्यूहरचना असली पाहिजे आदी बाबींवर चर्चा झाल्याचे समजते. यासंदर्भात संघाची भूमिका अमित शहा यांनी जाणून घेतली. मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार हे शहा यांच्यासमवेत होते. पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली.