मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वात भाजप सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे. एकूण २१ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र भाजपने राज्यपालांकडे सुपूर्द केले आहे. राज्यपालांकडून सत्तास्थापनेचे निमंत्रण आल्यावर शपथविधी होईल असे मनोहर पर्रिकरांनी म्हटले.

मनोहर पर्रिकर जर मुख्यमंत्री होणार असतील तरच आम्ही पाठिंबा देऊ असे गोवा फॉरवर्ड पक्ष आणि मगोपने जाहीर केले. त्यामुळे राज्याच्या हितासाठी पर्रिकरांना केंद्रातून राज्यात यावे लागले अशी माहिती नितीन गडकरींनी दिली. मनोहर पर्रिकरांनी अद्याप संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

आपल्या संरक्षण मंत्रीपदाच्या कारकीर्दीमध्ये आपल्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही याचा आपणास आनंद वाटतो असे पर्रिकर म्हणाले. सुरुवातीला संरक्षण मंत्री म्हणून काम करणे कठीण गेल्याचेही ते म्हणाले.

पर्रिकरांच्या नेतृत्वात २१ आमदारांचे पत्र आज गोव्याच्या राज्यपालांना देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाकडे १३ आमदार आहेत. मगोप, फॉरवर्ड पार्टी यांचे प्रत्येकी तीन आमदार आणि दोन अपक्षांचा पाठिंबा घेऊन भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करणार आहे. मनोहर पर्रिकर नियमाप्रमाणे लवकरच आपला राजीनामा देतील असे गडकरींनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले. मनोहर पर्रिकरांसारखा मोठा नेता दिल्लीतून पुन्हा गोव्यात येत आहे. त्यांची कमी नेहमी जाणवत राहील असे गडकरींनी म्हटले. परंतु राज्याच्या विकासासाठी ते परत येत आहेत. पर्रिकर मुख्यमंत्री व्हावे ही सर्व नेत्यांची आणि येथील जनतेची इच्छा होती, असे गडकरींनी म्हटले.

गोवा फॉरवर्ड पार्टीचे नेते विजय सरदेसाई यांनी मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वात भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली सत्ता स्थापनेच्या एका महिन्याच्या आत आम्ही समान धोरणांवर आमच्या कार्यक्रमाची आखणी करू असे ते म्हणाले. याआधी, ‘महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष’ म्हणजेच ‘मगोप’ भाजपला पाठिंबा देणार असल्याचं मगोपचे नेते सुदीन ढवळीकर यांनी जाहीर केले आहे. मगोपला ३ जागा मिळाल्या आहेत. या व्यतिरिक्त दोन अपक्षांनी पाठिंबा दिला आहे

गोव्यामध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून १७ जागांसह आघाडीवर आहे परंतु भाजपच्या या खेळीमुळे ते निष्प्रभ ठरले आहेत. भारतीय जनता पक्षाने मिठाई वाटतात त्याप्रमाणे मंत्रीपदाचे वाटप केल्याची बोचरी टीका काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केली. भारतीय जनता पक्षाला कौल मिळालेला नसताना ते ज्या हालचाली करत आहेत त्या अयोग्य आहेत असे त्यांनी म्हटले.