04 March 2021

News Flash

Gudhi Padwa 2018 : ही शान फेट्याची…

मराठी फेटा, पंजाबी फेटा, मारवाडी फेटा असे फेट्यांचे खूप प्रकार आहेत.

गुढीपाडव्याचा दिवसच नव्या आरंभाचा.

गुढी पाडवा हा सण आणि पारंपरिकता या दोन गोष्टी हातात हात घालून असतात. नऊवारी साडी, नथ, चंद्रकोर, कुर्ता, धोती या वेशात अनेक तरुण तरुणी हौशेने शोभायात्रांमध्ये सहभागी होतात. गुढीपाडव्याच्या शोभायात्रांमध्ये डोक्याला फेटे बांधलेली मंडळीही खूप असतात. फक्त भगवे किंवा गुलाबी फेटेच नाही तर वेगवेगळ्या रंगांचे, स्टाइलचे फेटे आता पाहायला मिळतात. सध्या फेट्यांची नवनवीन स्टाइलही बाजारात आली आहे. गेल्या ६ वर्षांपासून फेटे बांधण्यात तरबेज असलेले शैलेश काळे फेट्यांच्या विविध प्रकाराबद्दल अधिक माहिती देतात.

मराठी फेटा, पंजाबी फेटा, मारवाडी फेटा असे फेट्यांचे खूप प्रकार आहेत. फेट्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कपड्यातही आता खूप बदल झालाय. आधी केवळ कॉटनच्या कपड्याला स्टार्च करून फेटा बांधला जायचा. मात्र आता साडीच्या फेट्याचा ट्रेण्ड आहे. सुरुवातीला केशरी किंवा गुलाबी रंगाचा साधा फेटाच सर्वत्र बांधला जायचा. मग ते लग्न कार्य असो किंवा शोभायात्रा. पण आता यातही अनेक बदल झालेले दिसतात. जरीची बॉर्डर असलेल्या किंवा अगदी पारंपरिक काठा-पदराच्या सहावारी किंवा नऊवारी साड्यांचा फेटा अनेक जण बांधतात. त्याचबरोबर ‘बांधणी फेटा’ हा देखील प्रसिद्ध होतो आहे. लाला, हिरव्या, पिवळ्या किंवा मिश्र रंगसंगतीतला बांधणी फेटा एक भारी लूक देऊ शकतो. एकदम ‘रांगडा’ लूक हवा असेल तर कोल्हापुरी स्टाइलच्या फेट्याला पर्याय नाही. मोठा डौलदार तुरा आणि लांबलचक शेमला ही या फेट्याची खासियत आहे. कोल्हापुरी स्टाइलने बांधलेला फेट्याला आजही तेवढीच मागणी आहे.

नेहमीच्या फेट्याला मोत्यांची किंवा लेसची बॉर्डर लावून सजवले तरीही ते सुरेख दिसतात. तसेच फेट्याला ब्रुचही वापरता येऊ शकते. बाजारात साधा एक फेटा ४० रुपये किंमतीने बांधून दिला जातो तर काठा-पदराच्या साड्यांचा फेटा हा सुमारे ५०० ते ५५० रुपयांप्रमाणे बांधून दिला जातो. यावरुनच सहावारी किंवा नऊवारी फेट्यांना किती मागणी आहे ते कळते. मग तुम्ही उद्या कोणता फेटा घालायला पसंती देणार बांधणीचा किंवा नऊवारीचा?

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 1:55 pm

Web Title: gudhi padwa 2018 beautiful marathi fete style
Next Stories
1 Gudhi Padwa 2018 : गुढी कशी उभारावी?
2 Gudhi Padwa 2018: तयारी शोभायात्रांची
3 जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्व!
Just Now!
X