बाजारपेठांमध्ये मागणी; आकर्षक दिसणाऱ्या गुढीची किंमत ३०० रुपयांपासून

जागेची कमतरता आणि ग्राहकांची गरज लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांपासून लहान गुढय़ांची मागणी वाढली आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन वसईच्या बाजारपेठांमध्येही सहा ते सात इंचाच्या लहान गुढय़ा विक्रीसाठी असत. मात्र त्यांचा आकार फारच लहान असल्याने त्याला पर्याय म्हणून आता त्यापेक्षा थोडय़ा मोठय़ा म्हणजे अडीच फुटांच्या गुढय़ा वसईच्या बाजारपेठेमध्ये दाखल झाल्या आहेत. विविध अलंकारांनी सजावलेल्या आणि आकर्षक दिसणाऱ्या या गुढय़ा ग्राहकांना पसंत पडल्या असून त्यांची मागणी वाढली आहे.

शहरी भागांमध्ये विकास आणि उंच इमारतीच्या नावाखाली घरासमोरील अंगण नाहीसे झाले. त्यामुळे घराच्या खिडकीवर किंवा गॅलरीत गुढी उभारली जाते. जागेची कमतरता लक्षात घेऊन वसईच्या बाजारात गेल्या दोन वर्षांपासून सहा इंचाच्या छोटय़ा गुढय़ा विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत.

त्याचबरोबर यंदा त्याहून थोडय़ा मोठय़ा अडीच फुटांच्या गुढय़ा वसईच्या बाजारात दाखल झाल्या असून त्याला ग्राहकवर्गाची अधिक पसंतीही मिळत आहे. या गुढय़ा तयार स्वरूपात असल्याने घरी नेऊन गुढीपाडव्याला फक्त विधिवत पूजा करता येणार आहे.

बाजारपेठा सजल्या

गुढीपाडव्यानिमित्त वसई-विरार, मीरा-भाईंदरमधील बाजारपेठा सजल्या आहेत. तयार स्वरूपातील गुढी नको असल्यास अशा ग्राहकांसाठी कमी उंचीचे बांबूही बाजारपेठेत उपलब्ध आहेत. रेशमी कापड, साखरेची माळ १० ते २० रुपये, पंचांग १०० ते १२० रुपये, बत्तासे २० ते २५ रुपये १०० ग्रॅम दरात उपलब्ध आहेत. साखरगाठी, धातूचा तांब्या, फुले, हळद, कुंकू, चंदन, चाफ्याच्या फुलांची माळ, आंब्याची डहाळी, कडुलिंब इत्यादी साहित्य बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. मंगळवारी गुढीपाडवा असल्याने शनिवार, रविवार बाजारपेठांमध्ये खूप गर्दी राहणार आहे.

बाजारपेठेत तयार गुढय़ा सहज मिळत असल्याने ग्राहकांची गुढी उभारताना निर्माण होणाऱ्या समस्यांतून सुटका झाली आहे. या गुढय़ांची उंची कमी असून, गुढी उभारणीसाठी लागणारे सर्व साहित्य त्याच्यासोबतच मिळत आहे.

– दीपक म्हात्रे, विक्रेते

गुढींची किंमत

  • १०० रुपये: ०६ इंच
  • २०० रुपये: ०१ फूट
  • ३०० रुपये: २.५ फूट