News Flash

Gudi Padwa 2017: आरोग्यदायी गुढी पाडवा- मयुरी देशमुख

नातेवाईकांची भेट घेण्याची इच्छा मयुरीने व्यक्त केली आहे.

मयुरी देशमुख

गुढी पाडवा अनेकांच्याच आवडीचा सण. सर्वांमध्येच या सणाबाबत एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. असाच उत्साह सध्या सर्वत्र दिसतोय. मराठी नववर्षाच्या निमित्ताने सध्या बाजारपेठांपासून ते अगदी मिठायांच्या दुकांनापर्यंत सर्व ठिकाणी तयारी शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. मालिकांचे सेट, कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट्स आणि प्रेक्षकांमध्येही गुढी पाडव्याचा उत्साह दिसतोय. या सर्व उत्साही वातावरणामध्ये टेलिव्हिजन कलाकारही काही मागे नाही. मराठमोळ्या पद्धतीने पाडवा साजरा करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेले बरेच कलाकार यंदाही पाडव्याचा सण थाटामाटात साजरा करण्याचा मनसुबा मनाशी बाळगून आहेत. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतील सर्वांची लाडकी ‘मनू’ म्हणजेच ‘मानसी’ची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री मयुरी देशमुख. गुढी पाडव्याच्या निमित्ताने लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना मयुरीने तिचा पाडव्याचा बेत सांगितला.

पाडव्याच्या निमित्ताने काही खास बेत आखला आहेस का? असे विचारले असता मयुरी म्हणाली, ‘माझं सासर नांदेडचं आहे. पण, कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे मी तेथे जाऊ शकत नाही. त्यामुळे आई-बाबांकडे जाऊनच मी यंदाचा पाडवा साजरा करण्याच्या बेतात आहे. त्यासोबतच गोडाधोडाचा काहीतरी पांरपारिक पदार्थही मी नक्कीच बनवणार आहे’. पाडव्याच्या निमित्ताने सुरु झालेल्या या गप्पांच्या ओघात मयुरीने तिची पाडव्याच्या तयारीची एक आठवण सांगितली. आठवणीपेक्षा पाडव्याच्या पूर्वतयारीची तिच्यावर पडलेली ही एक प्रकारची जबाबदारीच होती असं म्हणायला हरकत नाही. याविषयीच सांगताना मयुरी म्हणाली, ‘घरी म्हणजेच माहेरी गुढी उभारताना केल्या जाणाऱ्या सर्वच तयारीची जबाबदारी माझ्यावर असायची. सजावटीपासून सर्व काही मीच पाहायचे. त्यातही एक वेगळाच आनंद असायचा’. यंदाच्या पाडव्याला मयुरीचा आणखी एक मानस आहे. तो म्हणजे वर्षभरात कामाच्या व्यापामुळे ज्या नातेवाईकांची भेट घेता आलेली नाही अशा नातेवाईकांची भेट घेण्याची इच्छा मयुरीने व्यक्त केली आहे.

नववर्ष आणि संकल्प या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मग इथे तरी संकल्पाविषयी विसरुन कसं चालेल….नववर्षातील संकल्पाविषयी सांगताना मयुरी म्हणाली, यंदा मी आरोग्यासाठी संकल्प करणार आहे. आरोग्य, खाणं-पिणं या सर्वांवर मी जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने मयुरीची आणखी एक अपेक्षा आहे. जी अपेक्षा नवरोबांनी पूर्ण करावी असेच तिला वाटते. आपली आवडती साडी न सांगताच नवऱ्याचे स्वताची स्वत:च ओळखून पाडव्याच्या निमित्ताने भेट द्यावी अशी इच्छा मयुरीने व्यक्त केली आहे. त्यामुळे आता तिची ही इच्छा पूर्ण होते की नाही हे पाडव्याच्या दिवशी कळेलच.

शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2017 9:02 am

Web Title: khulta kali khulena fame actress mayuri deshmukh talking about gudi padwa 2017 celebration
Next Stories
1 Gudi padwa 2017: स्वप्नपूर्तीचा गुढी पाडवा – फुलवा खामकर
2 Gudi padwa 2017: ‘यंदाचा पाडवा गुंतवणुकीचा’
Just Now!
X