गुढी पाडव्याला आता फक्त एकच दिवस उरला आहे. अनेकांच्या घरी एव्हाना गुढी पाडव्याच्या तयारीची लगबग सुरु झाली असेल. गुढी उभारण्यापासून ते घर सजवण्यापर्यंत सगळ्याचीच तयारी करायची असेल. गोडाचं जेवण काय करायचं, शोभायात्रेला कधी जायचं असे प्रश्न मनात यायला लागले असतील. पण यादिवशी आपली कलाकार मंडळी काय करत आहेत ते जाणून घेण्याची उत्सुकताही अनेकांमध्ये असते. अभिनेत्री श्रेया बुगडेही यावर्षी तिचा गुढी पाडवा वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहे. जाणून घेऊया ती गुढी पाडवा कशा पद्धतीने साजरा करणार आहे ते…

‘चला हवा येऊ द्या’चे चित्रिकरण सोमवार आणि मंगळवारी असतं. जेव्हा आमची तारीख ठरली तेव्हा आम्हाला माहीत होतं की मंगळवारी गुढी पाडवा आहे. पण संपूर्ण टीमने नवीन वर्षाचं स्वागत काम करुन आणि हसून करायचं ठरवलं त्यामुळे गुढी पाडव्याच्या दिवशी आम्ही सगळे काम करणार आहोत. आम्हा प्रत्येकासाठीच चला येऊ द्याची टीम हे एक दुसरं कुटुंबच आहे.

माझ्या सासरी आणि माहेरी दोन्हीकडे गुढी उभारली जाते. पण सासरी जाणं यावेळी मला शक्य नाही त्यामुळे मी माहेरी जाऊनच गुढी उभारणा आहे. आईला चांगले गोडाचे पदार्थ करायला सांगून ते ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमसाठीही घेऊन जाण्याचा माझा बेत आहे.

बोरीवलीला अभिनव नगरमध्ये बंगल्यांची कॉलनी आहे. तिथले सगळे रहिवासी त्यांची अशी शोभायात्रा काढतात. लहानपणी मी या शोभायात्रांमध्ये आवर्जून सहभागी व्हायचे. फेटे घालून, हातात ढोल, झेंडे घेऊन लहान लहान मुलं पुढे असायची आणि त्यांचे आई बाबा मागे असायचे. आता कामामुळे मला शोभा यात्रांना जाता येत नाही. लहानपणीचे ते दिवस मी अशा सणांना फार मिस करते.

यावर्षी मी एक संकल्प करणार आहे जो मला पूर्ण करायचा आहे. कामाच्या वेळा ठरलेल्या नसल्यामुळे कुटुंबाला हवा तेवढा वेळ देता येत नाही. महाराष्ट्र दौऱ्यामुळे तर आम्ही अधिकवेळ बाहेरच होतो. जेव्हा सुट्टी असते तेव्हा कोणतेही वेगळे बेत आखायचे नाहीत. इतर गोष्टींमध्ये फक्त कुटुंबाला वेळ देणं हीच एक गोष्ट राहून जाते बाकी सर्व या ना त्या मार्गाने पूर्ण होत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ कुटुंबाला देण्याचा माझा यावर्षीचा संकल्प आहे.

शब्दांकन- मधुरा नेरुरकर

madhura.nerurkar@indianexpress.com