News Flash

Gudhi Padwa 2017: आव्हानं पेलण्यासाठी सक्षम करणारा पाडवा- अनुजा साठे

अनेकांसाठी गुढी पाडव्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

अनुजा साठे

मराठी समुदायासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे गुढी पाडवा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा या गुढी पाडव्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणासाठी हा पाडवा आनंदाची उधळण करणारा सण ठरतो, तर कोणासाठी तो नव्या कामांच्या शुभारंभासाठीची प्रेरणा ठरतो. अशा या मराठमोळ्या सणानिमित्त अभिनेत्री अनुजा साठे-गोखलेने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना ती पाडव्याचा सण कसा साजरा करणार आहे यावरुन पडदा उचलला.

पाडव्याविषयी सांगताना अनुजा म्हणाली, ‘यंदा मी कामातून सुटी घेणार नाहीये. गुढी पाडव्याचं म्हणाल तर सेटवर आम्ही काही मराठी कलाकार आहोत. त्यामुळे गुढी उभारण्याचा कार्यक्रम सेटवर नक्कीच असेल. पाडव्याच्या निमित्ताने सुटी मिळालीच तर मग माझी स्वारी पुण्याला रवाना होईल. माझं सासर आणि माहेर पुण्यातच असल्यामुळे मग मी घरातल्यांसोबत पाडवा साजरा करेन’.

गुढी पाडवा म्हटलं की सेलिब्रेशसोबतच आवर्जून उल्लेख केला जातो तो म्हणजे नववर्ष संकल्पांचा. याविषयी सांगताना अनुजा म्हणाली, ‘संकल्पांचं म्हणाल तर मी रोज नवनवीन आव्हानं पेलत असते. त्यामुळे यंदाच्या वर्षीही माझ्याकडून चांगलं काम व्हावं, आव्हानं पेलण्यासाठी मी सक्षम रहावं हीच एक इच्छा आहे. कारण, येणाऱ्या वर्षात मला अधिकाधिक चांगलं काम करुन यश संपादन करायचं आहे.’ पाडव्याच्या निमित्ताने विविध ठिकणी निघणाऱ्या शोभायात्रांविषयी सांगताना अनुजा म्हणाली, ‘शोभायात्रांमधून आपली संस्कृती झळकते. ही खरंच एक कौतुकास्पद बाब आहे. मी एका वर्षी गिरगावातील शोभायात्रेत सहभागी झाले होते. तो माहोल, उत्साह सारं काही फार छान असतं. पण, माझं स्वत:चं मत धान्यात घ्यायचं झालं तर अशा खास दिवशी कुटुंबासमवेत, आपल्या माणसांसमवेत काही क्षण व्यतित करण्यास मी जास्त प्राधान्य देईन.’

‘पेशवा बाजीराव’ या मालिकेच्या निमित्ताने अनुजा सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेचे एकंदर कथानक आणि मराठमोळी पार्श्वभूमी पाहता, गुढी पाडव्याचा उत्साह आणि एक खास वळण मालिकेतून प्रेक्षकांना पाहता येणार आहे, असे अनुजाने सांगितले. त्यामुळे आता पाडव्याच्याच वातावरणाची हवा सध्या सर्वत्र वाहत आहे, असे म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2017 11:16 am

Web Title: peshwa bajirao fame marathi actress anuja sathe gokhle on talking about gudi padwa 2017 celebration
Next Stories
1 Gudi Padwa 2017: आरोग्यदायी गुढी पाडवा- मयुरी देशमुख
2 Gudi padwa 2017: स्वप्नपूर्तीचा गुढी पाडवा – फुलवा खामकर
3 Gudi padwa 2017: ‘यंदाचा पाडवा गुंतवणुकीचा’
Just Now!
X