कुणी काहीही म्हणो, अचानक उंदीर दिसला की पळता भुई थोडी होते. त्याचीही आणि आपलीही. (म्हणजे माझीही!) ‘अरे, उंदीर काय करतोय? उलटा तो आपल्यालाच घाबरून पळतो. एकदा स्वत:चा आकार बघ, त्याचा बघ.’ हे ऐकून जरी बरं वाटलं (फक्त ऐकूनच!) तरी प्रत्यक्षात तसं होत नाही. तो प्राणी इतका बिनडोक असतो, की मांजराशिवाय दुसऱ्या कुणाला घाबरून पळायचं हेसुद्धा त्याला कळत असेल असं वाटत नाही. कधी कधी तर तुम्ही त्याच्या अंगावर धावून गेलात की तो उलटा तुमच्या अंगावर धावून येतो. अंगावर अचानक उडी काय मारतो! पळण्यात मग त्याची आणि आमची चुरस लागते. गणपतीचं वाहन वगैरे कल्पना करण्याइतपत ठीक आहे. पण तेसुद्धा निव्वळ दोघांच्या आकारमानातून होणाऱ्या विनोदनिर्मितीकरता कल्पिलेली एक संकल्पनाच असली पाहिजे. नाही तर गणपतीसारखी एवढी बुद्धीची देवता असल्या बिनडोक, समोर दिसेल ते कुरतडणाऱ्या प्राण्याला वाहन म्हणून कशाला वापरेल? पण काहीही म्हणा, गणपतीबरोबर उंदीर दिसतो मात्र छान. पण फक्त मूर्तीमध्ये किंवा चित्रातच. ‘खालमुंडय़ा पाताळधुंडय़ा’ ही म्हण बहुधा त्याला बघूनच सुचली असणार. बरं, वस्तू खाऊन संपवल्या तर त्या कुणाच्या तरी उपयोगी आल्याचं समाधान तरी मिळेल. पण उगाच सगळ्या गोष्टी कुरतडून, घाण करून कचरा करायचा. म्हणजे कुणालाही उपयोगात येणारं काम करायचं नाही. सरकारी कारभारात यांचा वावर जास्त असतो असं म्हणतात. उदाहरणार्थ, सरकारी फायली कुरतडणे, सरकारी गोदामांतील धान्याचा नायनाट करणे, सरकारी वास्तूंमध्ये बिळं करणे, सरकारी इस्पितळात ठाण मांडून बसणे. पालिका/महानगरपालिकांसारख्या सरकारी ठिकाणी या उंदरांमुळे जनसामान्यांच्या उपयोगी न पडण्याची आणि त्यांचा मेंदू कुरतडण्याची सवय सरकारी कर्मचाऱ्यांना पण लागली आहे. तर अशा या पिटुकल्या चतुष्पाद प्राण्याने नुसत्या त्याच्या दर्शनाने आमच्या घरातल्या पाचजणांच्या आयुष्यातला अख्खा एक दिवस कुरतडला. अफजलखानला मारण्यासाठी शिवाजी महाराजांनी जशी तयारी केली असेल, जवळपास त्या पद्धतीची जय्यत तयारी त्या दोन इंच बाय दीड इंच प्राण्याला मारण्यासाठी आम्ही सर्वानी केली, यावर सांगूनही कुणाचा विश्वास बसणार नाही.

त्याचं असं झालं.. हा शत्रू एक दिवस आमच्या घरी आला. कसा आला, कळलं नाही; पण रोज रात्री-अपरात्री स्वयंपाकघराच्या ट्रॉलीज्मधून काहीतरी खुडबुड केल्याचा आवाज यायचा. एक दिवस आम्ही सगळ्या ट्रॉलीज् उघडून त्यातली भांडी, डबे बाहेर काढून अगदी डोळ्यात तेल का काय म्हणतात तसं घालून पाहिलं. बरं, घरातल्या एकटय़ा-दुकटय़ाने नाही, तर सर्वानी पाहिलं. पण नेमके महाशय कुठे गायब व्हायचे, ते कळायचंच नाही. सर्व भांडी, डबे नीट ठेवून ट्रॉलीज् बंद करून जरा कुठे सगळे जण अंथरुणावर आडवे झाले की परत खुडबुड सुरू! हा ट्रॉलीज् बाहेर काढून परत जिथल्या तिथे सगळं ठेवायचा उद्योग आम्ही एक-दोनदा करून बघितला. पण कुणालाच तो दिसला नाही. दुसऱ्या वेळी तर अजिबात आवाज न करता आम्ही हा सगळा कार्यक्रम पार पाडला. आपापसात पण आम्ही खुणांच्या भाषेत बोलत होतो. माझ्या भावाने तर त्याच्या एका डॉक्टर मित्राकडून छातीचे ठोके तपासायचं ते यंत्र स्टेथॅस्कोप का काय, तो पण आणला. पण त्याचं नक्की काय करायचं, ते कुणालाच कळेना. ‘म्हणजे नक्की कुठल्या ट्रॉलीतून खुडबुड ऐकू येतेय, हे स्टेथॅस्कोप ट्रॉलीवर लावून निश्चित करता येईल. उगाच सगळ्या ट्रॉल्या बाहेर काढायला नको..’ भावाने स्पष्टीकरण दिलं. आम्हाला वाटलं, अचानक जर तो दिसलाच, तर कुणाच्या छातीचे ठोके सगळ्यात जास्त पडताहेत ते मोजायला आणलंय की काय!

Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
how to find out job as a fresher
Job For Fresher : फ्रेशर म्हणून नोकरी कशी शोधायची? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स
How to Remove Hair from Your Upper Lip Naturally
Dark Upper Lips: आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही; या ४ घरगुती उपायांनी मिळवा सुटका
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

तर भावाच्या आयडियेप्रमाणे जास्त खुडबुड ऐकू येणारी ट्रॉली अगदी हळुवार बाहेर काढली. पण छे! दुसऱ्या ट्रॉल्यांमध्ये गेला असेल म्हणून परत सगळ्या गोष्टी बाहेर काढून नीट तपासणी करावीच लागली. यानिमित्ताने माझ्या भावावर सर्वानी अगदी यथेच्छ तोंडसुख घेतलं. यावेळी तर सगळे डबे पण उघडून बघितले. पण तो नीच नक्की कुठे गायब झाला, कळलंच नाही.

माझ्या डोक्यात एक विचार आला आणि मी तो जाहीर बोलूनही दाखवला. ‘समजा, तो दिसला, तर त्याला आपल्यापैकी मारणार कोण?’ त्यानंतर काही कोणी हा उद्योग करायच्या भानगडीत पडलं नाही. उंदीर मारायचं औषध टाकून बघितलं. सापळा लावून बघितला. पण छे! पुढचे चार दिवस अखंड खुडबुड चालूच होती. एव्हाना ही गोष्ट शेजारीपाजारीही पसरली होती. आमच्या एका शेजाऱ्याने सल्ला दिला की, खव्यात औषध घाला. उंदरांना खवा फार आवडतो म्हणे. म्हणून मग दुकानातून उत्तम प्रतीचा खवा आणून त्यात औषध घालून सर्व ट्रॉल्यांमध्ये टाकलं. आमच्या शेजारी एक भटजी राहायचे. त्यांनी तर सांगितलं की, गणपतीची आरती लावून ठेवा कॅसेट किंवा सीडीवर. म्हणजे ती ऐकून तो जाईल घरातून. मी मनात म्हणालो, ‘त्यापेक्षा तुमची ढेरी पुढे काढून, हाताची सोंड करून गणपतीसारखे तुम्हीच ट्रॉलीज्समोर बसा. म्हणजे मग तुम्हाला बघून तो बाहेर येईल आणि मग त्याच्यावरच बसून जा तुमच्या घरी.’ हा खरे तर मूर्खासारखा सल्ला होता; पण आमच्या वहिनींनी खरंच अथर्वशीर्षांची सीडी लावली.

पण एक दिवस माझ्या बायकोने पहाटे त्याला खवा खात असताना बघितलं असं सांगितलं आणि सर्वानी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्या दिवशी आम्ही उरलेल्या खव्याचे गुलाबजाम करून खाल्ले. पण परत रात्री खुडबुड सुरूच! मला तर उंदीर दिसल्याचे भास व्हायला लागले. एवढासा टीचभर उंदीर, पण त्याने आम्हा सगळ्यांची झोप उडवली होती.. नव्हे, कुरतडली होती.

पाचवा दिवस असावा. दुपारची वेळ. जवळजवळ स्वयंपाक होतच आला होता. काहीतरी काढायला म्हणून वहिनीने ट्रॉली उघडली आणि तो गनिम टुणकन् उडी मारून बाहेर आला आणि सिंकमध्ये पडला. वहिनी एवढय़ा मोठय़ांदा ओरडली, की सर्वानी स्वसुरक्षेसाठी जे काही मिळेल ते हातात घेऊन सुरक्षित जागा पकडली. त्यावेळी फक्त मी, वहिनी आणि भावाचा मुलगा चिम्या घरात होतो. मी पाय वर घेऊन सोफ्यावर बसलो. चिम्या घराबाहेर पळाला आणि वहिनी खुर्चीवर उभी राहिली. स्वसुरक्षिततेचे हत्यार म्हणून तिच्या हातात पडवळ आलं होतं. यथावकाश चिम्या हळूच घरात आला. मी पाय जमिनीवर ठेवले. वहिनी अजून खुर्चीवरच उभी होती. काही काळ आम्ही फक्त हताशपणे एकमेकांकडे बघत होतो. तेवढय़ात भाजीवाल्याची आरोळी ऐकू आली. प्रत्येकाच्या मनात एकच विचार आला- भाजीवाला! वहिनी खुर्चीवरून पटकन् उतरून भाजीवाल्याला बोलवायला गेली आणि आमच्या सर्वाचा रक्षणकर्त्यां भाजीवाल्याच्या हातात झाडू देऊनच त्याला घरात घेऊन आली. परत एकदा वहिनी खुर्चीवर, मी सोफ्यावर पाय वर घेऊन आणि चिम्या दरवाजाबाहेरून घरात डोकवत उभा राहिला. आम्ही मोठय़ा अपेक्षेने त्या भाजीवाल्याकडे बघायला लागलो. पण तो ‘कुठंय उंदीर?’ म्हणाला आणि आमचा एवढा मोठा अपेक्षाभंग झाला! आहे त्या जागेवरूनच त्या भाजीवाल्याला आम्ही तिघंही सूचना द्यायला लागलो. पण कुठे गेला आता तो? या प्रश्नाने सर्वाची चिडचिड वाढायला लागली. थोडय़ा वेळात शोधकार्य संपुष्टात आलं आणि तो भाजीवाला निघून गेला. चाग्ांला शूर माणूस भेटला होता, तर नेमक्या त्या हलकट उंदराने दगा दिला.

शेवटी आता आपणच काहीतरी हालचाल करायला पाहिजे म्हणून आम्ही चिम्याला मांजर शोधायला पाठवलं. नेहमी अगदी आमच्या दाराशी बसलेली असते. येता-जाता पायात येते. नेमकी आत्ताच कुठे गेली मरायला ही मांजर? चिम्या हात हलवतच परत आला. बराच वेळ उंदीर दिसला नाही म्हणून आम्ही जेवून घ्यायचं ठरवलं. आणि आम्ही जेवायला बसणार तेवढय़ात तो ट्रॉलीमधून बाहेर आला. चिम्याने आपल्या हातातलं भांडं त्याच्या दिशेने फेकून मारलं. त्याने तो अजूनच सैरभैर झाला आणि इकडे तिकडे धावायला लागला. कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता आम्ही परत आमच्या सुरक्षिततेच्या जागा पकडल्या. सुखाने दोन घास खाऊही देत नाहीये हा नराधम! नेमका स्वयंपाकघरातच कशाला कडमडलाय, कळत नाही. बापरे! दहा-बारा सेकंदच असतील, पण तोंडचं पाणी पळालं सर्वाच्या. मी जरा आठवून बघितलं. माझा एक मित्र सर्पमित्र होता. पण त्याच्यासारखा कुणी उंदीरमित्र नव्हता. आता सर्पमित्राला उंदीर पकडायला बोलवायचं म्हणजे सेनापतीला दळण दळायला बोलावल्यासारखं होतं. पण म्हटलं, बघू तरी फोन करून! तर तो नेमका बाहेरगावी गेला होता. (खरंच तो गेला होता की उंदराचं ऐकून खोटंच सांगितलं, हे कळायला मार्ग नव्हता.) माझ्या सासऱ्यांनी पूर्वी एक पाल मारली होती. म्हणजे ते उंदीर मारू शकतील असा मी एक अंदाज केला. पण त्यांना बोलवायचं कसं? बायकोला फोन करावा तर ते अवघड जागेचं दुखणं होऊन बसलं असतं. म्हणजे ‘उंदीर मारायला बोलवलंस माझ्या वडिलांना. अमुकतमुक कार्यक्रमासाठी नाही बोलवता आलं..’ वगैरे मला या टीचभर उंदरासाठी आयुष्यभर ऐकून घ्यावं लागलं असतं. त्यामुळे त्या शक्यतेवर मी पूर्ण फुली मारली. आता? तेवढय़ात चिम्याची एक मैत्रीण घरी आली. तिने म्हणे उंदीर पाळला होता. आमच्या आशा पल्लवित झाल्या. ‘याला घेऊन जा आणि पाळ..’ असं मी म्हणणारच होतो तेवढय़ात ती बालिका उद्गारली, ‘मी जो उंदीर पाळला होता तो पांढरा होता. हा असला नाही. शी! आय हेट रॅटस्..’ असं म्हणून आमच्या आशा तिने उधळून लावल्या. एक-दोन तिच्या आयुष्यातले उंदराचे किस्से तिने सांगितले आणि ती निघून गेली.

एव्हाना संध्याकाळ झाली होती. माझ्या बायकोने फोन करून परस्पर माहेरी जात असल्याचं सांगितलं होतं. माझा भाऊ घरी आला. त्याला उंदराविषयी सांगितल्यावर तो जो आतल्या खोलीची कडी लावून आत बसला; उंदीर बाहेर आला तरी तो आला नाही. उंदीर बाहेर आला, पण त्याची हालचाल मंदावली होती. बहुधा त्याने औषध खाल्लं असावं. त्यानंतर अशा अडगळीच्या ठिकाणी त्याची हालचाल थंडावली, की जिथून त्याला हाताने उचलून काढण्याशिवाय पर्यायच नव्हता. आमच्याकडे पूर्वी काम करत असलेल्या बाई त्यांनी घेतलेले पैसे देण्यासाठी आल्या. त्यांना सगळी हकीकत सांगितल्यावर ‘येवढंच व्हय?’ असं म्हणून त्यांनी हाताने त्याला बाहेर काढलं आणि प्लास्टिकच्या पिशवीत टाकून घेऊन गेल्या. त्यांचा मोबाइल नंबर आम्ही प्रत्येकाने आपापल्या मोबाइलमध्ये सेव्ह केला. खणा-नारळाने ओटी भरावी असं काम त्यांनी केलं होतं. शेवटी संध्याकाळी सहा वाजता त्या उंदीर प्रकरणावर पडदा पडला. त्या रात्री खुडबुड नव्हती की काही नव्हतं. सर्वत्र शांतता होती. तरीही का कुणास ठाऊक, झोप येत नव्हती. त्या पिटुकल्याच्या सहवासाची सवय झाली होती बहुतेक.

निखिल रत्नपारखी – nratna1212@gmail.com