20 November 2019

News Flash

सज्जनम् अविरत वंदे!

डॉ. राम गोडबोले यांना कुठल्याही सामाजिक कार्याची वा कोणत्याही विशिष्ट विचारसरणीची पाश्र्वभूमी नाही.

एम. एस. डब्ल्यू. करून महिला संघटक म्हणून काम करणाऱ्या सुनीता आणि बस्तरला खडतर आव्हानांना सामोरं जायला निघालेले डॉ. राम गोडबोले यांनी लग्नगाठीबरोबरच एकत्र कार्यरत राहण्याची गाठ बांधली. गेली २६ वर्षे हे दोघेही बस्तरमधील आदिवासींचं आरोग्य, कुपोषण, शिक्षण, संस्कृती, व्यसनमुक्ती व आत्मसन्मान यांच्यासाठी झटत आहेत.

‘‘बस्तर प्रदेशातील बारसूर या गावी दवाखान्यात काम करत असताना एक आदिवासी तरुण माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘मेरे पिताजी बिमार है, उन्हें देखने आप आओगे?’ मी लगेच निघालो. इंद्रावती नदी पलीकडच्या जंगलात दोन तास चालत आत आत गेल्यावर त्याचं घर आलं. तिथं कळलं की, दोन महिन्यांपूर्वी घराचं छप्पर बांधताना पडल्यामुळे त्याच्या वडिलांना जी हातभर लांबीची जखम झाली होती त्यावर कोणताच इलाज झाला नव्हता. सतत वाहणाऱ्या रक्त-पू यामुळे हात सडण्याच्या मार्गावर होता. मी म्हटलं, ‘इतने दिन चुप क्यों बैठे?’ यावर उत्तर मिळालं, ‘डॉक्टर को बुलाने का तो मालूम नहीं कितना पैसा लेगा.. उपर से पेट्रोल/डिझेल का हिसाब अलग.. डोली से उठा के इतना दूर लाना भी मुश्किल..!’ ते असहाय शब्द माझ्या जिव्हारी लागले. बरोबर आलेल्या मुलाला ड्रेसिंगचं ट्रेनिंग, दहा दिवसांच्या गोळ्या आणि बॅण्डेजची सामुग्री देऊन परतताना माझा निश्चय  झाला होता.. या डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासींमधूनच आरोग्यरक्षक तयार करायचे, जे रुग्ण व डॉक्टर यांच्यातील दुवा बनतील. त्यांच्याद्वारे या वंचितांच्या मनात डॉक्टरबद्दल विश्वास निर्माण होईल..’’

वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून गेली २६ र्वष पत्नी सुनीतासह आदिवासींचं आरोग्य, कुपोषण, शिक्षण, संस्कृती, व्यसनमुक्ती व आत्मसन्मान यांसाठी झटणाऱ्या डॉ. राम गोडबोले यांच्या शब्दाशब्दांतून त्यांची तळमळ प्रकट होत होती. त्यांच्या अडीच दशकांच्या तपश्चर्येमुळे, कुठल्याही प्रश्नासाठी मांत्रिकाचे पाय धरणाऱ्या इथल्या आदिवासींची मानसिकता आता डॉक्टरवर विश्वास ठेवण्यापासून त्यांच्याकडून उपचार करून घेण्यापर्यंत बदलली आहे. परिणामी हजारो रुग्णांचे प्राण वाचले आहेत. नक्षलवाद्यांनी वेढलेल्या या दुर्गम परिसरात राहून इथल्या आदिवासींच्या जीवनात आरोग्याची पहाट फुलवणाऱ्या या जोडप्याचे समर्पण बघताना ‘सज्जनम् अविरत वंदे!’ हेच शब्द ओठांवर येतात.

डॉ. राम गोडबोले यांना कुठल्याही सामाजिक कार्याची वा कोणत्याही विशिष्ट विचारसरणीची पाश्र्वभूमी नाही. सातारा हे त्यांचं गाव आणि सज्जनगडावर त्यांची विशेष भक्ती. बी. ए. एम. एस ही पदवी घेताच त्यांची पावलं उपेक्षित जिवांची सेवा करण्यासाठी वनवासी कल्याणाश्रम संस्थेच्या नाशिक जिल्हय़ातील कनाशी या केंद्राकडे वळली. ४/५ वर्षांच्या अनुभवानंतर अधिक खडतर आव्हानांना सामोरं जाण्यासाठी त्यांच्यापुढे मेघालय व बस्तर असे दोन पर्याय ठेवण्यात आले. जंगलाचं वेड असल्याने राम यांनी बस्तरची निवड केली. पण नावगावही ठाऊक नसलेल्या, इतक्या दूरच्या भागात एकटय़ाला पाठवायला घरचे तयार होईनात, तेव्हा लग्नाचा विचार पुढे आला.

तेव्हा सुनीता (पुराणिक) एम. एस. डब्ल्यू. करून वनवासी कल्याणश्रमाच्या कर्जत तालुक्यातील जांभिवली केंद्रात महिला संघटक म्हणून काम करत होती. विद्यार्थी परिषदेतून घडलेल्या या मुलीचाही पण होता की, ‘लग्न अशाच व्यक्तीबरोबर करीन, ज्याने आयुष्य सेवेसाठी वाहून घेतलेलं असेल..’ एकाच ध्येयाने झपाटलेले हे दोन जीव एकत्र आले आणि निबिड अरण्यातील बारसूर केंद्रातून एकत्रित सेवेचा त्यांचा पहिला अध्याय सुरू झाला.

बस्तर म्हणजे रामायणातील दंडकारण्याचा प्रदेश. ३९००० चौ. कि. मी. एवढय़ा प्रचंड क्षेत्रफळाचा हा भूभाग छत्तीसगडमध्ये समावेश झाल्यापासून सात जिल्हय़ांत विभागला गेलाय. गोडबोले दाम्पत्य ज्या ठिकाणी कार्यरत आहे ते बारसूर केंद्र दंतेवाडा या नक्षलग्रस्त जिल्हय़ात आहे, परंतु चांगल्या कामाला इथे भीती नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं.

हं, तर नवीन लग्न होऊन दूरवर जंगलात संसार थाटायला निघालेल्या या जोडप्याच्या सामानात काय होतं.. एक बॅग भांडय़ांची, दुसरी पुस्तकांची, एक कपडय़ांचं गाठोडं आणि बाकी पोती व खोकी भरून औषधंच औषधं. तिथला दवाखाना म्हणजे एक मातीची खोली. हे येणार कळल्यावर यांच्यासाठी शेजारी आणखी एक तशीच खोली उभी केली गेली. पावसाळ्यात या मातीच्या जमिनीवर झोपताना आधी प्लॅस्टिक त्यावर सिमेंटच्या रिकाम्या गोणी व नंतर सतरंजी असा बिछाना तयार करावा लागे. वीज नव्हतीच. नैसर्गिक विधींसाठी आडोसा होता हेच खूप. आजूबाजूला जंगली श्वापदांचा वावर असणार हे गृहीतच होतं. केंद्रावर राहणाऱ्या ८/१० आदिवासी मुलींची सोबत तेवढी होती.

सरकारी दवाखान्यांची परिस्थिती तर अधिकच भयंकर. दवाखाना उघडा असेल तर डॉक्टरचा पत्ता नाही. हजर असलाच तर नशेत तर्रऽऽऽ. औषधांचा तुटवडा कायमचा. खासगी डॉक्टर्सकडून वाट्टेल तशी लूट. अशा परिस्थितीत तिथल्या अशिक्षित भाबडय़ा आदिवासींचा विश्वास मिळवणं ही पहिली गरज होती.

इथे येण्यास कोणी तयार नसल्याने दीड र्वष बंद असलेला बारसूर केंद्राचा दवाखाना गोडबोले डॉक्टरांच्या आगमनाने उघडला. पूर्वानुभवावरून आदिवासी रुग्ण, मांत्रिकाचे सर्व उपाय थकल्यावरच आपल्याकडे येणार याची डॉ. रामना कल्पना असल्यामुळे त्यांनी आधीच काही नियम ठरवले. पहिली गोष्ट रुग्णाचं नाव-गाव लिहिण्यात वेळ घालवण्यापूर्वी त्याची तपासणी करायची आणि मुख्य म्हणजे पैशाची भाषा करायची नाही. पुढे ही जेव्हा केंद्रावर अ‍ॅम्ब्युलन्स आली तेव्हा ती डिझेल भरून ड्रायव्हरसकट नेहमी तयार असे/असते. अत्यवस्थ रुग्णाला सलाइन लावूनच १०० कि. मी. वरील एकुलत्या एक रुग्णालयात (जगदलपूर मिल्स) स्वत: घेऊन जाणं आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणं हा डॉ. गोडबोल्यांच्या दिनक्रमाचा एक भाग बनला.

या जीवदान मोहिमेबरोबर आदिवासी महिलांमध्ये जागृती आणण्यासाठी सुनीताने कंबर कसली. जागृती.. मुलांच्या शिक्षणासाठी, घराच्या आरोग्यासाठी, जंगलातून कष्टाने गोळा केलेली वनसंपत्ती विकताना जे शोषण होतं त्याचा प्रतिकार करण्यासाठी. सुनीताच्या तोंडून तेव्हाची परिस्थिती ऐकताना अंगावर काटा येतो. म्हणाली, ‘‘हा सर्व प्रदेश घनदाट अरण्याचा. मोहाची फुलं, मध, डिंक, आवळा, चिंच अशा अनेक वनसंपत्तीचं माहेरघर. इथल्या आदिवासी महिला वणवण फिरून गोळा केलेला हा रानमेवा जेव्हा बाजारात विकायला आणतात तेव्हा त्यांच्याशी जो व्यवहार होतो तो तिडीक आणणारा. त्या बायकांच्या डोक्यावरच्या टोपल्या खेचण्यासाठी व्यापाऱ्यांची नुसती स्पर्धा लागलेली. आपलं काम झालं की तिच्या हातावर पाच रुपये टेकवून तिला  हाकलून लावायचं. हे बघितल्यावर मी या बायकांच्या बाजूला उभी राहू लागले. ‘‘बिल्कुल हाथ नहीं लगाने का.. उसे पहले सब माल लगाने दो, फिर जिसको बेचना है उसे बेचने दो।’’ माझ्या टिपेच्या आवाजातील आपलेपणा त्या स्त्रियांना जाणवत गेला. पुढे जसजशी त्यांची भाषा येऊ लागली तसतसं आमच्यातील नातंही आकार घेऊ लागलं.

सुनीता काय काय सांगत होती.. सुरवातीला आम्ही जिथे जाऊ तिथे वाद ठरलेला. बसमध्ये पुढे जागा रिकामी असली तरी आदिवासींनी मागेच बसायचं हा नियम. आम्ही आवाज उठवायचो.. ‘वो नहीं उठेगा। आपका क्या कानून है दिखाव..’ आमच्या हस्तक्षेपाने त्या अरेरावी करणाऱ्याचा आवाज खाली यायचा. आणखी एक इथल्या औषधांच्या दुकानांच्या आत त्या दुकानदाराचा स्वत:चा अवैध दवाखाना. अशिक्षित आदिवासींच्या गळ्यात त्यांना आवश्यक नसणारी औषधं/ इंजक्शन, बिनदिक्कत मारण्याची सवय हाडीमाशी खिळलेली. या सर्वातून त्यांना न्याय मिळवून द्यायचा हेच आमचं ध्येयं. तेव्हाही आणि आत्ताही.

अशा प्रकारे उपेक्षितांशी नाळ जुळत असतानाच २००२ मध्ये कौटुंबिक कारणांसाठी त्यांना महाराष्ट्रात परत यावं लागलं. पण वनवासींची सेवा करण्याचा आपला वसा त्यांनी इथे सुरू ठेवला. ठाणे जिल्हय़ातील विक्रमगड केंद्रावर डॉक्टरांनी केंद्रप्रमुख ही जबाबदारी स्वीकारली व त्याबरोबर आरोग्यरक्षक योजनेची धुराही खांद्यावर घेतली. सुनीतानेही वनवासी कल्याणाश्रमाच्या महिला विभागाची सूत्रं हाती घेतली. परंतु या दोघांचा जीव बस्तरच्या पहाडीमधील आदिवासींमध्ये गुंतला होता. ही ओढच त्यांना इथे पुन्हा घेऊन आली. २०१० पासून दंतेवाडा जिल्हय़ातील बारसूरमध्येच दाम्पत्याची दुसरी इनिंग सुरू झाली.

मधल्या काळात बरीच उलथापालथ झाली होती. छत्तीसगडची निर्मिती झाल्यामुळे गावागावांना जोडणारे पक्के रस्ते झाले. त्यामुळे रस्त्यालगतच्या गावांना आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधा उपलब्ध झाल्या. म्हणून डॉक्टरांनी प्रत्यक्ष दवाखाना न चालवता, जंगलातील गावागावांत जाऊन आरोग्य शिबिरं घेण्याचा धडाका लावला. दर महिन्याला दोन ते तीन कॅम्प, त्यात आढळलेल्या रुग्णांचा ते बरे होईपर्यंत पाठपुरावा आणि त्याला जोडून जनजागृती हा त्यांचा सध्याचा जीवनक्रम.

कुपोषणावर मात करण्यासाठी गोडबोले पती-पत्नीने पंचायतीने नियुक्त केलेल्या मितानीनना (आरोग्य मैत्रीण) हाताशी धरलं. त्यांचे ग्रुप करून त्यांना पोहे, नाचणी, मका, तांदूळ अशा स्थानिक अन्नधान्यांपासून करता येणाऱ्या पौष्टिक पाककृती शिकवल्या. त्या त्यांना खाऊ घातल्या. सोबत कोरडा शिधा दिला आणि आपापल्या गावांतील स्त्रियांना हे पदार्थ शिकवण्याची जबाबदारी सोपवली. याबरोबर साथीचे रोग होऊ नयेत म्हणून व झाले तर कोणती काळजी घ्यायची ते जगण्यातील उदाहरणे देऊन समजावलं. त्यांच्याबरोबर ४५ आरोग्यरक्षकांची बॅचही आपापल्या गावच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यासाठी तयार झालीय.

इथे पाच-सहा वर्षांची मुलंदेखील गुटखा/पान खाताना सर्रास दिसतात. त्यांना व्यसनांपासून वाचवण्यासाठी, अवयव निकामी कसे होतात, ते खेळाद्वारे सांगणारा नवा उपक्रम त्यांनी चालू केलाय. शाळाशाळांमधून चालणाऱ्या अशा प्रबोधनासाठी पुण्याच्या ‘तथापि ट्रस्ट’ने साधनं पाठवलीयत. पुण्याच्याच ‘कृतज्ञता ट्रस्ट’ने औषधं, इंजेक्शन्स आणि सोलर लॅम्प्स पुरवण्याची जबाबदारी घेतलीय. ज्ञानप्रबोधिनीही पाठीशी आहेच.

गोडबोले दाम्पत्याचं झपाटलेपणही त्यांच्या चार आदिवासी सहकाऱ्यांमध्येही (अंती, चितू, मोंडो व नारायण) पुरेपूर भिनलंय. आपल्या अशिक्षित बांधवांना न्याय मिळवून द्यायचा, नुसता सल्ला नाही, ही डॉक्टरांची शिकवण त्यांच्या कृतीतून दिसते. म्हणूनच जंगलातून कितीही अंतर तुडवायला आणि प्रसंगी एखाद्याला जाब विचारायला हे शिलेदार मागे-पुढे बघत नाहीत.

गेल्या तीन वर्षांपासून डॉ. राम गोडबोलेंना डॉ. करमाळकर या हृदयरोतज्ज्ञाच्या समर्थ हातांची साथ मिळालीय. हे डॉक्टर हैदराबादहून प्रत्येक महिन्यातील तीन दिवस येतात. त्या वेळी लावण्यात येणाऱ्या शिबिरासाठी आरोग्यरक्षक रुग्णांना शोधून शोधून आणतात. दिवसभर तपासण्या झाल्यावर आवश्यकतेनुसार इतर मोठय़ा तपासण्या व उपचारांसाठी जगदलपूर वा रायपूरचं हॉस्पिटल ही पुढची जबाबदारी व पाठपुरावा याला डॉ. गोडबोल्यांशिवाय पर्याय नाही.

५५/५६ च्या घरात असलेल्या गोडबोले दाम्पत्यावर सध्या पालकत्वाची एक नवी जबबदारी पडलीय. हे हवंहवंसं पालकत्व आहे. इथे मदतीला येणाऱ्या तरुण मुला-मुलींचं. कौस्तुभ देशपांडे व प्रणीत सिंहा हे पुण्याच्या आयसरचे विद्यार्थी डिसेंबर २०१२ मध्ये इथल्या शाळांमध्ये विज्ञान आधारित खेळणी दाखवण्यासाठी १५ दिवसांची सवड काढून आले. तेव्हापासून प्रणीतची पावलं मागे वळलीच नाहीत. शिक्षणविषयक इतर उपक्रमांसाठी गेल्या दोन वर्षांपासून इथे ठाण मांडून बसलेली अकलूजची ज्योती पटाले (इंजिनीयर) आणि सुनीताताईंना मितानीन प्रकल्पात वर्षभर साहाय्य करणारी नाशिकची आहारतज्ज्ञ गौरी वझे या मुलीचं योगदान अभिमान वाटावं असंच.

ध्येयपूर्तीसाठी अविरत काम हेच जीवन मानणाऱ्या या दाम्पत्याच्या आपल्या देशबांधवांकडून दोनच अपेक्षा आहेत. एक तुमच्या आयुष्यातील किमान १५ दिवस द्यावेत. सुट्टय़ांमध्ये काही तरी वेगळं करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं इथे स्वागत आहे आणि दुसरं जंगलाच्या आतील गावात, तिथल्या तिथे रोगनिदान करता येईल अशा मोबाइल डायग्नोस्टिक लॅब या पोर्टेबल, बॅटरी ऑपरेटेड मशीनसाठी अर्थसाहाय्य. तुम्ही कोणता पर्याय निवडताय?

संपर्क – सुनीता गोडबोले

०९७५३७०७०७७ /०९४२२२३१९६७

मेल आयडी – godbolesuneeta@gmail.com

waglesampada@gmail.com

First Published on December 17, 2016 1:37 am

Web Title: dr ram godbole wife sunita working for more than 26 years in naxal affected dantewada
Just Now!
X