12 November 2019

News Flash

सामाजिक पर्यटनाची ‘अमृतयात्रा’

आनंदवन, हेमलकसा, माळशेज असो वा स्नेहालय. इथे प्रत्यक्ष गेल्याने पर्यटक विचारमग्न होतातच.

‘अमृतयात्रा’ हे स्थळांचं पर्यटन घडवत नाही, हे माणसांचं पर्यटन घडवतं. नतमस्तक व्हावं अशी माणसं, त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते खास यात्रा आयोजित करतात. आनंदवन, हेमलकसा, माळशेज असो वा स्नेहालय. इथे प्रत्यक्ष गेल्याने पर्यटक विचारमग्न होतातच. प्रत्येक यात्रेकरूला स्वत:चा शोध घ्यायला लावणाऱ्या नवीन काळे आणि स्नेहल काळे या दोघांनीही आपलं चाकोरीबद्ध आणि सुखात चाललेलं क्षेत्र सोडून सामाजिक पर्यटन करणारी पहिली संस्था काढण्याचं धाडस केलं. त्यांच्या ‘अमृतयात्रा’विषयी..

एक गोष्ट ऐकली होती.. एकदा एका जंगलाला आग लागली. ते पाहून सगळे प्राणी, पक्षी घाबरून रडत बसले. एक छोटासा हमिंग पक्षी मात्र इवल्याशा चोचीतून थेंब थेंब पाणी आणून जाळावर टाकत राहिला. कुणी तरी म्हणालं, ‘याने काय होणार?’ तो उत्तरला, यामुळे आग विझणार नाही हे मलाही ठाऊक आहे. पण प्रयत्न केल्याचं समाधान तर मिळेल..’ नवीन काळे व स्नेहल या युवा दाम्पत्याशी बोलताना आठवणीतली ही गोष्ट जागी झाली. माणसा-माणसांमधील हरवलेलं माणूसपण बघून, अस्वस्थ होत प्रेरणादायी पर्यटनाद्वारे समाजात बदल घडवू पाहणाऱ्या या जोडीची धडपडही त्या हमिंग पक्षाच्या जातकुळीतली. गेल्या चार वर्षांत पोरांपासून थोरांपर्यंत शेकडो पर्यटकांना भारतातील कर्मक्षेत्रांची वारी घडवून अंतर्मुख करणाऱ्या त्यांच्या ‘अमृतयात्रा’ या कंपनीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सामाजिक पर्यटन करणारी पहिली संस्था अशी मान्यता देऊन गौरवलंय.

खरं तर छान चाललं होतं दोघांचं. नवीनला शनिवार-रविवार सुट्टी देणारी उत्तम नोकरी होती. स्नेहलच्या ब्युटीपार्लरचाही जम बसला होता. डोक्यावर आई-वडिलांचं छत्र. घरात दुडदुडणारी पावलं.. सुखाचा प्याला लौकिकदृष्टय़ा काठोकाठ भरला होता. परंतु संवेदनशील नवीनचं मन या चाकोरीबद्ध जीवनात रमत नव्हतं. त्याच्या वडिलांनी, अनिल काळे यांनी निवृत्तीनंतर म्हणजे २००८ पासून एक मिशन म्हणून लोकांना ‘आनंदवना’त नेणं सुरू केलं होतं. ते पहाताना त्याच्या अंतर्मनाने कौल दिला.. हीच तुझी कर्मभूमी!

मनाने कितीही ठरवलं तरी एका मध्यमवर्गीय घरातल्या मुलाला तडकाफडकी नोकरी सोडणं थोडंच शक्य असतं? अनाहूत सल्ल्याचा भडिमार सुरू झाला. अनेक प्रश्नांचा बागुलबुवा समोर उभा करण्यात आला. सुरुवातीला नवीनची आई, हेमा काळे यादेखील साशंक होत्या. परंतु नवीनचं म्हणणं, ‘‘नोकरी सोडणं हे माझ्यासाठी धाडस नव्हतंच. उलट जे काम आवडत नाही तेच आयुष्यभर करत राहणं हेच अधिक धाडसाचं होतं.’’ राजीनामा देण्याआधी त्याने पत्नीला, स्नेहलला एकच प्रश्न विचारला, ‘सामाजिक पर्यटनावर तुझा विश्वास आहे का?’ यावर तिचं उत्तर होतं.. ‘माझा तुझ्यावर विश्वास आहे..’ पुढे पाऊल टाकण्यासाठी एवढं बळ पुरेसं होतं. आई-वडिलांचा आशीर्वादाचा हात पाठीवर होताच.

दिशा निश्चित झाल्यावर दोघांनी मिळून काही दंडक ठरवले. यातील पहिला नियम म्हणजे हे सामाजिक पर्यटन असलं तरी ते व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून करायचं तरच ते बराच काळ निभावून नेता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे प्रतिसाद मिळाला नाही तरी जे  लक्ष्य ठरवलंय त्यापासून दूर जायचं नाही. म्हणजे धार्मिक स्थळांच्या यात्रा करायच्या नाहीत.

नोकरीच्या पाशातून मुक्त झाल्यावर नवीन महाराष्ट्रभर फिरला. अनेकांना भेटला आणि त्याने पर्यटनासाठी चार आधुनिक ‘तीर्थक्षेत्रं’ निश्चित केली. आनंदवन-हेमलकसा-सोमनाथ, राळेगणसिद्धी-स्नेहालय-सावली-विज्ञानाश्रम, मेळघाटदर्शन व जळगावमधील गांधीतीर्थ-अजंठा लेणी. या ठिकाणांमध्ये आता शिक्षणाविषयी नवी दृष्टी देणाऱ्या जयपूरच्या बेअरफूट कॉलेजचाही समावेश झालाय. एकाच वर्षांने स्नेहलनेही जे करायचं ते जोडीने असं ठरवून आपलं चांगलं चालणारं पार्लर बंद केलं आणि तीही अमृतयात्रेच्या दिंडीत सामील झाली.

नवीन म्हणतो, ‘‘अमृतयात्रा हे स्थळांचं पर्यटन घडवत नाही, हे माणसांचं पर्यटन घडवतं. नतमस्तक व्हावं अशी माणसं, त्यांचं कार्य आम्ही दाखवतो. खरं तर हा प्रवास आहे स्वत:च्याच शोधाचा..’’

हा वेगळा विषय पर्यटकांच्या मनात रुजण्यासाठी प्रत्येक टूरच्या आधी बैठक घेतली जाते. विशेषत: शाळकरी मुलांचे गट घेऊन जाताना पालकांचे प्रश्न न संपणारे असतात. नंतर हेच पालक मुलांचा सहलीला जातानाचा मूड व परतानाची मन:स्थिती पाहून चकित होतात. यासंदर्भातील नवीनचे अनुभव खूपच बोलके आहेत. अलीकडेच शिक्षकांनी भरीस पडल्याने एस.आय.ई.एस. महाविद्यालयाची १५/१६ मुलं अमृतयात्राबरोबर ‘राळेगणसिद्धी- स्नेहालय’ला गेली होती. ‘स्नेहालय’चे गिरीश कुलकर्णी या मुलांबरोबर बोलले. जाताना गाण्याच्या भेंडय़ा, जोक्स.. अशी धमाल करणारी ही मुलं येताना ही ठिकाणं आणखी शंभर जणांपर्यंत कशी पोहोचवता येतील यावर हिरिरीने चर्चा करत होती.

त्याआधी ५० शाळकरी मुलांना घेऊन केलेल्या चार रात्रींच्या – हेमलकसा ट्रिपच्या वेळी तर नवीनने या शहरी मुलांना तिथल्या आदिवासी मुलांबरोबर चार/ चारचा ग्रुप करून एकत्र ठेवलं. हा अनुभव बरंच काही शिकवून जाणारा होता.

सहलीला जेव्हा मुली असतात तेव्हा स्नेहल बरोबर जाते. अन्यथा संस्थेच्या सर्व व्यावहारिक गोष्टींची जबाबदारी तिच्यावर. नवीन म्हणतो, ‘‘आम्हा दोघांचं काम मेंदूच्या दोन भागांप्रमाणे चालतं. मी उजव्या मेंदूप्रमाणे स्वप्न बघणारा.. नव्या नव्या कल्पनांत रमणारा. तर स्नेहल डाव्या मेंदूप्रमाणे चिकित्सक. माझ्या स्वप्नांतील सत्यता पडताळून पाहणारी.. गरज असेल तेव्हा मला जमिनीवर आणणारी.. अशा आमच्या पूरक व्यक्तिमत्त्वांमुळे ‘अमृतयात्रा’चा तोल व्यवस्थित सांभाळला जातो..’’

विचारांमधील बदल ही एक हळूहळू घडणारी प्रक्रिया. परंतु त्या दिशेने उचललेलं एखादं पाऊलही तो (बदल) घडवू पाहणाऱ्याची उमेद वाढवतं. नाशिकच्या दीपलक्ष्मी ढोले या अमृतयात्रेबरोबर आनंदवनला गेल्या तेव्हा चारही दिवस त्यांचे डोळे पाणवलेले होते. त्यानंतर काही महिन्यांनी नवीन दुसरा गट घेऊन तिथे गेला तेव्हा त्या त्याला तिथे भेटल्या. तिथल्या मूक-बधिर मुलींना पर्स बनवायचं प्रशिक्षण देण्यासाठी त्या पुन्हा आनंदवनामध्ये १० दिवस राहायला आल्या होत्या. नवीन म्हणाला, ‘‘प्रत्येक जण काही योगी, त्यागी, विरागी होऊ शकत नाही, पण निदान केवळ भोगी राहू नये यासाठी अशा ठिकाणांना भेट देणं गरजेचं. इथलं मानवतेचं कार्य प्रत्यक्ष पाहिल्यावर देण्याची भावना जागृत होते. आपल्या भोवतालचं जग आनंदी करण्यासाठी आपणास केवढा वाव आहे याची जाणीव होते, हेही नसे थोडके..’’

वर उल्लेखलेल्या स्थळांव्यतिरिक्त अमृतयात्राच्या काही हटके ट्रिप्सदेखील आहेत. एक दिवसाची मुंबई ही त्यापैकीच एक. मुंबईतील सात किल्ले, कान्हेरी केव्हज, धारावीतील ३० एकरांचं नेचर पार्क.. अशी ठिकाणं त्यांच्या इतिहास-भूगोलासह समजून घेताना आणि गेट वे ते राजाभाई टॉवर हा दीड-दोन तासांच्या (एरवी ५/१० मिनिटांत संपणारा) हेरिटेज वॉक एन्जॉय करताना आपलीच मुंबई आपल्याला वेगळी वाटायला लागते. सोशल सराऊंडिंग कॉन्शसनेस या पर्यटन प्रकारात विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत व रेकॉर्डिग स्टुडियोपासून नॅशनल डिफेन्स अ‍ॅकाडमीपर्यंत अनेक व्यक्ती व संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्राच्या जागी नेऊन भेटवण्यात येतं.

स्नेहल म्हणाली, ‘‘प्रामाणिक व जीव झोकून काम करणारे सहकारी ही आमची जमेची बाजू. आम्ही सर्व मिळून कामाचा एवढा आनंद घेतोय की दमण्यातदेखील रमणं असतं हे आम्हाला नव्याने कळतंय. घरातही तेच. प्रवाशांसाठी चिवडा-लाडूचं किट भरायला आठ वर्षांच्या अमृतापासून ६८ वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वच तत्पर असतात..’’

चांगल्या माणसांना भेटणं, त्यांच्याकडून प्रेरणा घेणं या संस्काराची मुळं जाऊन पोहोचतात नवीनच्या बालपणी त्याच्या आई-वडिलांनी सुरू केलेल्या गोकुळाष्टमी उत्सवापाशी. १९८४ मध्ये गिरगावच्या गंगाराम खत्री वाडीतील १० बाय १०च्या दोन खोल्यांत सुरू झालेला हा उत्सव आता वाढत्या प्रतिसादापायी पाल्र्याच्या डहाणूकर कॉलेजमध्ये स्थलांतरीत झालाय. दर वर्षी एका नामवंत लेखकाला/ कलाकाराला ऐकण्याची संधी हे या दिवसाचं वैशिष्टय़. प्रा. प्रभुराम जोशी (रुईया कॉलेजचे माजी प्राचार्य), कुलगुरू राम जोशी, शंकर वैद्य, प्रतिमा कुलकर्णी, डॉ. स्नेहलता देशमुख,  रवींद्र पिंगे, प्रवीण दवणे.. आदी दिग्गजांनी ही गोकुळाष्टमी श्रवणीय केलीय. तसेच गेल्या १० वर्षांपासून या वेळी समाजासाठी काम करणाऱ्या पण उजेडात न आलेल्या एका व्यक्तीला ‘प्रभुराम जोशी स्मरण पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येतं. आपल्या पगारातून एस.टी. सुशोभित करणारा मनमाड एस. टी. डेपोचा ड्रायव्हर शेख, केवळ एका पोस्ट कार्डावर लक्षणीय बदल घडवून आणणारे चंद्रकांत लिमये..असे अनेक मोहरे या निमित्ताने लोकांसमोर आलेत.

या संकल्पनेला वेगळा आयाम देत नवीनने २०१४ पासून ‘स्वयं’ नावाचा आणखी एक उपक्रम सुरू केलाय. अमेरिकेतील ‘टेड टॉक्स’ या कार्यक्रमावर आधारलेल्या या एकदिवसीय उत्सवात वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्तुंग स्थानावर पोहोचलेल्या सहा व्यक्ती आपल्या कामाविषयी २० मिनिटांचं सादरीकरण करतात. त्यानंतर डॉ. उदय निरगुडकर प्रत्येकाशी संवाद साधतात. स्नेहल म्हणाली, ‘‘ही संकल्पना लोकांच्या गळी उतरायला वेळ लागला. आर्थिक नुकसान झालं. पण आम्हाला एक समीकरण पक्क ठाऊक होतं की दारू विकायची ठरवली तर लोक आपल्या दारात येतील पण दूध विकायचं असेल तर आपल्यालाच दारोदार जावं लागेल. त्यानुसार आम्ही नेटाने प्रयत्न केले. ज्यामुळे आज पुणे, नगर, रत्नागिरीपासून अनेक जण या कार्यक्रमासाठी अगोदरच तिकीट काढून हजर राहतात.’’

इतर छंद.. या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी पुन्हा स्नेहलच पुढे सरसावली. म्हणाली, ‘‘जीवनाचा आनंद कसा घ्यावा ते नवीनकडून शिकावं. तो जितकं उत्तम गातो तेवढंच प्रभावी बोलतो. लिहिणं हा तर त्याचा श्वास आहे..’’ मी मान डोलवली. त्याच्या तीन पुस्तकांपैकी ‘काही तरी नवीन’ हे पुस्तक मी वाचलंय. त्याच्या लेखातून भेटणारा.. भिडणारा तो आपल्यातलाच वाटतो. चुकांचं भान असणारा.. आशावाद जपणारा.. उद्याची स्वप्नं पाहणारा. मात्र मनमुराद फिरण्याचं आणि गप्पांनी रात्र-रात्र जागवण्याचं व्यसन दोघांनाही आहे. साहजिकच आमच्याही गप्पा चांगल्याच रंगल्या. मनात नवी उमेद जागवणाऱ्या या जोडीबरोबर साधलेला दोन / अडीच तासांचा संवाद हेच माझ्यासाठी त्या दिवसाचं प्रेरणादायी पर्यटन ठरलं.

संपर्क

  • नवीन काळे – ९८६९२७४२३३/८८७९११०११९
  • मेल आयडी – info@amrutayatra.com
  • वेबसाइट – amrutyatra.com

 

संपदा वागळे

waglesampada@gmail.com 

First Published on November 5, 2016 1:04 am

Web Title: information about social tourism organization