News Flash

सूर्य डोई घ्यावा लागतो..

भिंतीला भेग पाडून बाहेर येणाऱ्या पिंपळाच्या रोपाप्रमाणे असतात काही जिद्दी!

त्याच्या शाळेचं नावच ‘प्रश्नचिन्ह’. आजही अनेक प्रश्न समोर ठाकलेले, परंतु ते सोडवतच पुढे जायचं, असा निर्धार मतीन भोसलेनं केला आणि त्याला सार्थ साथ मिळतेय बायको सीमाची. चोर म्हणूनच आजही ओळखल्या जाणाऱ्या फासेपारधी समाजातील मुलांसाठी शिक्षण हाच तरणोपाय आहे हे लक्षात घेऊन सुरू झालेली फाटकीतुटकी शाळा आता आकार घेऊ लागली आहे. जमातीतील ४५५ मुलं या शाळेत शिकत आहेत. मात्र हा प्रवास सोपा नाही, त्यासाठी अनेकदा त्यांना सूर्य डोईवर घ्यावा लागतो आहे..

चोर..! फासेपारधी जमातीत मूल जन्माला आल्या आल्या सटवाईने त्याच्या कपाळी मारलेला हा शिक्का. इंग्रजांनी या जमातीला  गुन्हेगार ठरवलं. स्वातंत्र्यानंतर कायदा बदलला, पण समाजाची या लोकांकडे बघायची मानसिकता तीच राहिली. अजूनही गावोगावी चोरी झाली की आधी याच जमातीकडे बोट दाखवलं जातं. म्हणूनच यातील बरेच जण आता भीक मागत उदरनिर्वाह करतात. शरीराने हट्टेकट्टे म्हणून अनेकदा तीही नाकारली जाते. अंगावर फाटकेतुटके, मळलेले कपडे, बोलीभाषा न समजण्यापलीकडची, जवळ येताच अंगाला येणारी दरुगधी, पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्याचं उष्टं- खरकटं किंवा भीक मागून आणलेलं अन्न.. असं ‘भंगार’ आयुष्य जगणाऱ्या फासेपारधी समाजाला मुळात जगायचं कशाला तेही माहीत नाही. परंतु सगळेच काही परिस्थितीला शरण जात नाहीत. भिंतीला भेग पाडून बाहेर येणाऱ्या पिंपळाच्या रोपाप्रमाणे असतात काही जिद्दी!
मतीन भोसले असाच एक विलक्षण जिद्दी तरुण. आपल्या समाजाच्या माथ्यावरील गुन्हेगारीचा कलंक पुसण्यासाठी त्याने जंग जंग पछाडलं. जिल्हा परिषदेतील शिक्षकाच्या नोकरीवर लाथ मारली. गावं, जंगलं आणि पाडे पालथे घालून देशाच्या कानाकोपऱ्यातून मुलं गोळा केली. त्यांना सावली देण्यासाठी आपल्या मंगरूळ चव्हाळा गावात (ता. नांदगाव, जि. अमरावती) फुटकंतुटकं का होईना पण छप्पर उभारलं. पदरच्या बकऱ्या विकल्या. भीक मागितली आणि या मुलांच्या पोटापाण्याची सोय केली. त्यांच्यासाठी ‘प्रश्नचिन्ह’ नावाची शाळा सुरू केली. गेल्या पाच वर्षांपासून रिकाम्या पोटानिशी सुरू असलेल्या त्यांच्या या लढाईत त्याच्या दरिद्री समाजाबरोबर त्याची सहधर्मचारिणी सीमा भोसले ठामपणे उभी आहे. जेमतेम दुसरीपर्यंत शिकलेली ही २७-२८ वर्षांची तरुणी आपल्या तीन लेकरांसह मतीनने जमवलेल्या ४५५ मुलांची आई झालीय.
देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशकं उलटायला आली. विज्ञान व तंत्रज्ञानाने प्रगतीची नवी दालनं उघडली. परंतु अशिक्षित व भटक्यांसाठी विकासाचे दरवाजे आजही बंद आहेत. फासेपारधी ही त्यातलीच एक जमात. गेल्या अनेक वर्षांपासून डोंगरात, रानावनात राहणारी ही जमात गावात आली खरी पण त्यांचं जगणं अजूनही कवडीमोलाचंच. या मागासलेल्या समाजातील मतीनचा जन्मही कुडाच्या घरातला. वडील शिकार करायचे आणि आई लोकांची भांडी घासायची. गावात, परिसरात कार्य झाल्यावर राहिलेलं अन्न पत्रावळीत जमा करायचं. त्यावर मतीनसह तीन भाऊ, एक बहीण व आई-वडिलांची गुजराण व्हायची. आठवडय़ातले दोन-तीन दिवस असे जायचे. बाकीचे दिवस पाणी पिऊन ढकलायचे. खायला अन्न नाही, अंगावर पुरेसे कपडे नाहीत. अभ्यासाला पुस्तकं नाहीत, अशा अनंत अडचणींना तोंड देत तो शिकला. पदवीधर झाला. शिक्षणामुळे माणसाला माणसासारखं जगता येतं. याची त्याला जाणीव झाली आणि आपल्या अडाणी समाजाला शहाणं करायचं, हा विचार त्याच्या मनात झऱ्यासारखा फुटून आला.
पूर्वी पारध्यांना जातीचं प्रमाणपत्र मिळत नव्हतं. त्यासाठी मतीनने वयाच्या १५-१६ व्या वर्षीच शिंगणापुरात ‘रस्ता रोको’ आंदोलन केलं. जातिबांधवांसाठी उचललेलं याचं हे पहिलं पाऊल. याचा परिणाम म्हणजे पुढच्या सहा महिन्यांत तीन हजार फासेपारध्यांना जातीचे दाखले मिळाले.
डी. एड्. केल्यावर २००५ मध्ये त्याला जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी मिळाली. त्याच वर्षी याने ‘आदिवासी फासेपारधी समिती’ स्थापन केली. नामसिंग सिकल्या पवार (सचिव), अलिंद्र कसल्या पवार (उपाध्यक्ष), नानसिंग पवार, नूरदास भोसले, सचिन भोसले, रणजीत पवार असे ३०-३५ कार्यकर्ते नव्या आव्हानासाठी सज्ज झाले. रोजगार, रेशनकार्ड इत्यादी हक्कांसाठी त्यांचा लढा सुरू झाला. दरम्यान, मतीनचं लग्न झालं. पत्नी सीमा दुसऱ्यांच्या शेतात मजुरीसाठी जात होती. त्याच्या संसाराची घडी बसली होती. पण पैसा मिळवून फक्त आपल्या कुटुंबाचं पोट भरणं त्याला अप्पलपोटेपणाचं वाटत होतं. त्यातच ‘त्या’ दोन घटना घडल्या. पहिली ३० जुलै २०१० ची. नाल्यात खेकडे पकडायला गेलेल्या दोन मुलांचे निष्प्राण बेवारस देह नाल्यातील झुडुपात अडकलेले सापडले. आई-वडिलांचा पत्ता नव्हताच. त्यानंतर काही दिवसांनीच त्यांच्याच जमातीतील दोन मुलांचा ट्रेनमध्ये चोऱ्या करताना अपघाती मृत्यू झाला. आपल्या समाजाचं असं कवडीमोलाचं जिणं बघून त्याचा निश्चय पक्का झाला. समाज बदलायचा तर आधी मुलांना शिक्षित करावं लागेल. हे काम नोकरी सांभाळून करण्यासारखं नव्हतं. त्याने विचारपूर्वक राजीनामा दिला.
दरमहा सुरळीतपणे घरात येणारा पैसा असा बंद होणं घरातील कोणालाच पचनी पडण्यासारखं नव्हतं. तोवर दोन मुलींचा जन्म होऊन कुटुंबातील सदस्यांची संख्या (आई-वडिलांसह) सहा झालेली. १५ दिवस पती-पत्नीमध्ये अबोला होता. अखेर स्वत:ची तळमळ तिच्यापर्यंत पोहचवण्यात त्याला यश आलं. तिचं शिक्षण कमी होतं पण पतीवर शंभर टक्के विश्वास होता. आपला नवरा वेगळा आहे. तो समाजासाठी काही तरी चांगलं करायला धडपडतोय हे ती जाणून होती. तिने घराची जबाबदारी स्वीकारली आणि तो नि:शंकपणे बाहेर पडला. गावातील ११ कार्यकर्त्यांसह त्याचा मुलांसाठीचा शोध सुरू झाला. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यंही त्याने पिंजून काढली. मुंबई, नागपूर, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली मिळेल ते शहर-गाव गाठून त्याने १६९ मुलं गोळा केली. या मुलांना आणणं सोप्पं नव्हतं. काहींचे पालक गुन्हय़ाखाली तुरुंगात गेलेले तर काहींचे भीक मागणारे. त्यांची तर तीच (मुलं) रोजीरोटी होती. मुलांच्या व पालकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी ही मंडळी त्यांच्यासोबत १५-१५ दिवस राहिली. (बरेचदा उपाशीपोटीच) मंगरूळ चव्हाळ्याला मुलं आणली खरी पण त्यांना जगवण्यासाठी घरात दाणा नाही आणि खिशात आणा नाही. ३७४ चौरस फुटाचं एक गोडाऊन एका हितचिंतकाच्या कृपेने मिळालं. पत्र्याची शेड असलेल्या या घराला हवा येण्यासाठी किंचितशीही फट नाही. बाहेरच्या बाजूला तट्टे ठोकून उभ्या केलेल्या दोन बाथरूम आणि नैसर्गिक विधींसाठी मोकळं रान, असा नवा संसार सुरू झाला.
संस्कार या शब्दांशी या मुलांचा दुरूनही संबंध नव्हता. रोज आंघोळ करायची असते, कपडे बदलायचे असतात, इतकंच नव्हे तर संडासला कसं बसायचं हे देखील त्यांना शिकवावं लागलं. सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्या दोन वेळच्या भुकेचा होता. कधी आमिळ पिऊन (पाण्यात कालवलेलं पीठ) तर कधी उपाशीपोटी दिवस ढकलले जात होते. आपला हा लढा शासनापर्यंत पोहचावा, त्यांनी दखल घ्यावी म्हणून मतीनने ‘भीक मांगो’ आंदोलन सुरू केलं. दर शनिवार-रविवारी मुलं व कार्यकर्ते यांची वेगवेगळ्या तालुक्यात पदयात्रा निघे. दिवसाला ७०-८०
किलो मीटर चालत धान्य, कपडे, भांडी, चपला, पेन, पेन्सिली जे मिळेल ते गोळा करणं सुरू झालं. आपल्या दोन लहान मुलींना घरी सासूू-सासऱ्यांजवळ ठेवून सीमानेही पदयात्रेत भीक मागितली. त्या १८० मुलांमधील मुलींची संख्या ७२ (आता ती १५९ झालीय). या मुलींची वेणीफणी, लहान मुलामुलींच्या अंघोळी, नखं कापणं आणि मुख्य म्हणजे सर्वाचा दोन वेळचा स्वयंपाक ही जबाबदारी तिने इतर कार्यकर्त्यांच्या बायकांना सहभागी करून उत्तम प्रकारे निभावली-निभावतेय.
मतीनने मुख्यमंत्र्यांपासून राष्ट्रपतीपर्यंत अनेक नेत्यांना भेटण्यासाठी नागपूर, मुंबईपासून दिल्लीपर्यंत असंख्य चकरा मारल्या. पण राज्यकर्ते त्याला जुमानत नाहीत. पारध्यांनी भीक मागावी ती शिळ्या अन्नाची, भाकर-तुकडय़ाची, शिक्षणाची नाही. त्यांचं लक्ष वेधण्यासाठी त्याने अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांपासून पोलीस आयुक्तापर्यंत ‘भीक मांगो’ आंदोलनही केलं. त्या वेळी भीक मागणं हा गुन्हा म्हणून पोलिसांनी मोर्चातील सर्वाना तुरुंगात डांबलं. ही बातमी पोलिसांमार्फत घरी कळली तेव्हा सीमामधली रणरागिणी जागी झाली. तिने ७०-८० स्त्रियांना गोळा केलं. दोन बकऱ्या विकून दोन टेम्पो भाडय़ाने मिळवले आणि हा मोर्चा थेट जेलवर जाऊन धडकला. आमच्या माणसांना सोडवा नाही तर आम्हाला आत घ्या, ही त्यांची मागणी. पोलिसांनी त्यांनाही तुरुंगाची हवा दाखवली. त्या वेळी सीमा सहा महिन्यांची गरोदर होती. (जन्माआधीपासूनच संघर्ष म्हणून या मुलाचं नावंही तेच ठेवलंय..संघर्ष मतीन भोसले) ७२ तासांच्या उपोषणानंतर तीन दिवसांनी सर्वाची सुटका झाली.
‘भीक मांगो’ आंदोलनातून पन्नास हजार रुपये जमले होते. त्यातून शाळा सुरू करायचं ठरलं. जिथे जेवायचं, झोपायचं तिथेच शाळा सुरू झाली. २२ सप्टेंबर २०१३ हा तो दिवस. अनेक प्रश्नांसह सुरू झालेली शाळा म्हणून शाळेला नाव दिलं प्रश्नचिन्ह. मंगरूळ-चव्हाळा गावात नागपूर- औरंगाबाद महामार्गालगतच ही शाळा आहे. पहिली ते दहापर्यंत शिकणाऱ्या ४४७ मुलांपैकी १०८ मुलांचे पालक राज्यातील वेगवेगळ्या तुरुंगात चोरीच्या गुन्हय़ाखाली शिक्षा भोगत आहेत. सीमा व मतीन हेच आता या सर्वाचे माय-बाप!
कधी काळी ही मुलं. कचरा, भंगार गोळा करायची..भीक मागायची..चोऱ्या करायची..आज ती सर्व शाळेत धडे गिरवत आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक पैचं मानधन न घेणारे तीन शिक्षक आहेत. सकाळी प्रार्थना व योगासनांनी त्यांचा दिवस सुरू होतो. संध्याकाळी मुलं खो-खो, कबड्डी, व्हॉलिबॉल खेळतात. स्वयंपाकात मदत करतात. बोलीभाषेतून (पारधी) मराठी शिकतात.
साडेचारशे माणसांच्या या परिवाराला आठवडय़ाला दोन क्विंटल धान्य लागते. तेल, मीठ, मिरची वेगळं. मात्र गेल्या दोन वर्षांपासून जालन्याच्या ‘मैत्र मांदियाळी’ संस्थेने मदतीचा हात दिल्याने ‘प्रश्नचिन्ह’ शाळेला बराचसा (४० टक्के) दिलासा मिळालाय. या संस्थेचे अजमदादा किंगरे यांनी मतीनचं ‘भीक मांगो’ आंदोलन थांबवलं. आता मुलांवर उपाशी झोपण्याची वेळ येत नाही. त्यांच्याच आधाराने शाळेचं पाच खोल्यांचं नवं बांधकामही पूर्ण होत आलंय. त्यानंतर ‘प्रश्नचिन्ह’चा पत्र्याच्या शेडमधला संसार पक्क्या घरात जाईल. अजूनही अनेक प्रश्न समोर आहेत. तरीही नव्या सदस्याला सामावून घ्यायला मतीन कायम उत्सुक असतो. गेल्या पाच वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे आता हे काम दूरदूर पोहोचू लागलंय. गेल्या वर्षी ‘प्रश्नचिन्ह’च्या मुलांना त्यांच्या बाबासह (मतीन) झी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर येण्याची संधी मिळाली. तसंच
डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांनीही या शाळेला भेट दिली. मतीन अलीकडेच (मे २०१६) काही कामानिमित्त ठाण्याला आला होता. त्या वेळी त्याला समजलं की ठाण्यातील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या भटक्या फासेपारधी मुलांसाठी तीन हात नाका सिग्नलवर शाळा सुरू होतेय. झालं! हा तडक जिल्हाधिकाऱ्यांना भेटला. का तर या मुलांची प्रगती निवासी शाळेतच होऊ शकते हे सांगण्यासाठी, त्यांना आपल्या शाळेचा पर्याय सुचवण्यासाठी. ‘प्रश्नचिन्ह’ शाळेला ना शासनाचे अनुदान, ना मान्यता. पण मी शिकेन,
काही तरी चांगलं करेन हे स्फुल्लिंग मात्र प्रत्येक विद्यार्थ्यांत जागृत झालंय, हे परिवर्तनाचं पहिलं पाऊल म्हणायला हवं. खपाटीला गेलेल्या पोटांची ही लढाई आकंठ पोट भरलेल्या सुखवस्तू समाजाच्या हृदयापर्यंत पोहचेल?
लक्षात असू द्या..
सोपं नसतं झाड होणं
मातीमध्ये रुजून येणं
सूर्य डोई घ्यावा लागतो
तशात कोणी सावली मागतो
बसेल त्याला झुळूकभर
वारासुद्धा द्यावा लागतो
सोपं नसतं मागेल त्याला
मागेल ते देत जाणं
सोपं नसतं झाड होणं..

मतीन भोसले, ९०९६३६४५२९
मेल आयडी – matinbhosle@gmail.com

waglesampada@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2016 1:16 am

Web Title: inspirational stories of couples doing social work
Next Stories
1 सेवायज्ञ
2 नृत्यसुरांचं ‘देव’घर
3 पर्यावरणासाठी दक्ष
Just Now!
X