22 November 2019

News Flash

सेवायज्ञ

माझ्याशी लग्न केलंस तर संस्था देईल त्या जागेत राहावं लागेल.

‘सेवा परमो धर्म:’ हे ध्येय मानून प्रमोद करंदीकर व रंजना गांगल या दोघांनी सहजीवनाला प्रारंभ केला. सेवायज्ञात आपल्या सुखासिन आयुष्याची आहुती दिली. ‘वनवासी कल्याणाश्रम’ आणि नंतर ‘शबरी सेवा समिती’ या संस्थांच्या माध्यमातून अनेक कसोटय़ांवर उतरत रायगड, ठाणे, पालघर व नंदुरबार येथील ग्रामीण समाजजीवनात सकारात्मक परिवर्तन घडवलंय. कुपोषित आदिवासी मुलांना जगवण्यापासून त्यांना शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभं करणाऱ्या या जोडप्यांच्या सेवायज्ञाविषयी..

14
‘‘दीनदुबळ्या देशबांधवांसाठी जीवन वेचण्याचा माझा निश्चय आहे, माझ्याशी लग्न केलंस तर संस्था देईल त्या जागेत राहावं लागले, तिथे सर्व जे खातील तेच खावं लागेल आणि संस्थेत पडेल ते काम करावं लागेल..’’ त्यांनी विचारलं आणि समोरून क्षणार्धात उत्तर आलं, ‘‘माझी तयारी आहे.’’
३३ वर्षांपूर्वीचा हा संवाद ‘सेवा परमो धर्म:’ हे ध्येय मानणाऱ्या प्रमोद करंदीकर व रंजना गांगल या दोन उपवर व्यक्तींमधला. तिलाही चारचौघांसारखा संसार करायचा नव्हताच. म्हणूनच पदवी घेतल्यानंतर घरचे लग्नासाठी पाठी लागले तेव्हा तिच्या डोळ्यासमोर जीव झोकून काम करणाऱ्या या तरुणाला तिनेच साद घातली. तेव्हापासून अनेकांना बरोबर घेऊन सुरू झालेल्या त्यांच्या सहजीवनाने प्रथम ‘वनवासी कल्याणाश्रम’ आणि नंतर ‘शबरी सेवा समिती’ या संस्थांच्या माध्यमातून अनेक कसोटय़ांवर उतरत रायगड, ठाणे, पालघर व नंदुरबार अशा चार जिल्ह्य़ांतील ग्रामीण समाजजीवनात सकारात्मक परिवर्तन घडवलंय.
१९७७ची गोष्ट. एम.कॉम.च्या शेवटच्या वर्षांत शिकत असताना प्रमोदला विश्व हिंदू परिषदेचा घडगाव (ता. नंदुरबार) येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात ८ दिवसांसाठी व्यवस्थापक म्हणून जाण्याबद्दल विचारणा झाली. हाच त्याच्या जीवनातील टर्निग पॉइंट. तिथल्या आदिवासींची दारुण परिस्थिती पाहून तिथेच त्याने आपल्या आयुष्याची दिशा ठरवली. आपल्या तरुण मुलाने २०/२१व्या वर्षी असा निर्णय घेणं अर्थातच घराला रुचणारं नव्हतं. आई तर माझा मुलगा काय खाईल, कुठे झोपेल.. या चिंतेनेच व्याकुळ झाली. पण प्रमोदचा मनोनिग्रह जबरदस्त होता. त्यानुसार शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने वनवासी कल्याणाश्रमाच्या कामाला वाहून घेतलं.
आसाममध्ये एक वर्ष काम केल्यावर कर्जत केंद्रात काम करताना त्याच ठिकाणी कार्यरत असणाऱ्या रंजनाकडून लग्नाचा प्रस्ताव आला आणि तो चकितच झाला. कारण अत्यल्प मानधनावर पूर्ण वेळ काम करणाऱ्या, गोठय़ासदृश गृहात राहणाऱ्या आणि आंघोळीसाठी नदीवर जाणाऱ्या भणंग मुलाला कोणी मुलगी देईल हे त्याच्या कल्पनेपलीकडचं होतं. पण लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात हेच खरं. सेवेचा वारसा लाभलेली आणि त्याच पदपथावरून चालण्याचा निश्चय केलेली रंजना त्याच्या आयुष्यात आली आणि प्रतिकूल परिस्थितीत लढण्याची दोघांची हिम्मत दुप्पट झाली.
१३ ऑगस्ट १९८२ला लग्न झालं आणि लगेचच कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथे मुलामुलींच्या वसतिगृहात (मातीचं घर आणि कुडाच्या भिंती) त्यांचा सार्वजनिक संसार सुरू झाला. १९८४ मध्ये संस्थेला कोळिंबे गावात जंगलामधली दहा एकर जमीन मिळाली. तिथे नवं केंद्र सुरू करायचं ठरलं आणि त्याची जबाबदारी प्रमोदवर सोपवण्यात आली. त्यानंतर सुरू झाला एक सेवायज्ञ. वैजनाथहून डबा घेऊन रोज सकाळी डोंगर रस्ता तुडवत १० कि.मी. पायी यायचं. कोणी गडी मिळाला तर त्याच्यासह नाही तर एकटय़ाने कुदळ, कोयत्याने झाडं, वेली तोडून जागा साफ करायची आणि अंधार पडला की पुन्हा तेवढीच पायपीट करत घरी परतायचं. सोबत कुठली तर बिबळ्या, साप, अस्वल, लांडगे.. अशा वन्य प्राण्यांची. संस्थेकडे पैशांची चणचण त्यामुळे गवंडीकाम, सुतारकाम, विहिरीसाठी सुरुंग, लावून दगड फोडणं, कुंपण घालणं.. सर्व कामांसाठी हा एकच हक्काचा मजूर. सहा-सात महिन्यांच्या अथक परिश्रमाने मातीची जमीन व कुडाच्या भिंतींचं वसतिगृह उभं राहिलं. त्यात स्वत:च्या बाळासह शिकणाऱ्या २५ मुलांना घेऊन हे जोडपं तिथे राहायला लागलं. त्या दिवसातले कसोटी पाहणारे क्षण रंजनाताई उलगडत होत्या.. ‘‘पावसाळा जवळ आल्याने आम्हाला विहीर बांधण्याची घाई होती. विहिरीचं खोदकाम खाली उतारावर होतं. सुरुंग लावल्याने फुटलेले दगड आम्हाला डोक्यावरून न्यावे लागत. आमच्या आठ-१० महिन्यांच्या मुलाला झाडाखाली बसवून मुलांबरोबर मी हे काम भर उन्हात करत असे. पावसाळ्यात शेतीच्या कामामुळे स्वयंपाकासाठी बाई मिळणं मुश्कीलच. त्यामुळे ते तीन महिने ५०/५० जणांचा सकाळ-संध्याकाळचा स्वयंपाक मी चूल पेटवून एकीकडे मुलाला सांभाळत केलाय. अर्थात एकमेकांची साथ होती म्हणूनच ते दिवस निभावले.’’ त्या म्हणाल्या की, ‘‘आदिवासी मुलांना (शिकण्याकरिता) शोधण्यासाठी डोंगरात किती फिरणं व्हायचं याची तर गणतीच नाही, पण सरांबरोबर (प्रमोद करंदीकर) चालताना ते झाडं, वेली, पक्षी आदिवासींचं समाजजीवन यांची माहिती देत राहायचे त्यामुळे हा प्रवास समृद्ध झाला.
हळूहळू दोघांवरील जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि १९९० मध्ये हे दाम्पत्य संस्थेने कॉलेजच्या मुलांसाठी डोंबिवलीमध्ये घेतलेल्या वसतिगृहात राहायला आलं. दोघंही ज्येष्ठ कार्यकर्ते. त्यांना स्वतंत्रपणे दोन-दोन महिने कामासाठी बाहेर जावं लागे. त्यामुळे त्यांच्या मुलात परिपक्वता फारच लवकर आली. पूर्वीपासून एकटा राहायला लागला.
आदिवासींचं जीवन जवळून बघत असताना कुपोषणाने होणारे बालमृत्यू सरांना आंतर्बाह्य़ हलवून गेले आणि या एका विषयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी डोंबिवलीतील पाच-सहा जणांना घेऊन त्यांनी २००३ मध्ये शबरी सेवा समिती या संस्थेची स्थापना केली (शबरीची सेवा व भक्ती कामात यावी यासाठी हे नाव). डोंबिवलीतच ऑफिस वा घरासाठी भाडय़ाची जागा घेऊन काम सुरू झालं. कार्यकर्त्यांना हाताशी धरून कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात स्वत: फिरून सरांनी ६५० कुपोषित बालकं शोधून काढली. बालरोगतज्ज्ञांकडून तपासणी व उपचार, अत्यंत नियमितपणे पोषक आहार, पालकांशी संवाद व प्रबोधन, गर्भवती स्त्रियांची साडीसह हिरवे मूग, गूळ, खोबरं यांनी ओटी भरून सामुदायिक डोहाळे जेवण.. अशा मार्गानी कुपोषणाशी लढाई सुरू झाली. या अनुभवातून नंतर मुरबाड व ठाणे जिल्ह्य़ांत आणि २००८ पासून नंदुरबार जिल्ह्य़ातील अतिदुर्गम तालुक्यात काम सुरू झालं. हे आव्हान कस पाहणारं होतं. सर सांगतात, ‘‘मरणपंथाला लागलेल्या मुलाला मरणाच्या दाढेतून परत आणण्यासाठी वेळेला ८०/९० किलोमीटरचा प्रवास करून शहराच्या ठिकाणी हॉस्पिटलात न्यावं लागे. तिथे जाऊन उपचार होईपर्यंत ते मूल जिवंत राहील याचीही खात्री नसे, पण धाडसानं पावलं उचलत राहिलो. मुलं बरी होत गेली. त्यातून आमच्यावरचा विश्वास वाढत गेला आणि संस्थेला स्थानिक कार्यकर्ते मिळाले. आज आम्ही अभिमानाने सांगतो की, संस्थेच्या प्रयत्नातून या सर्व भागातली एकूण ६५१० बालकं कुपोषणमुक्त झाली. आता आमच्या कार्यक्षेत्रात कुपोषणाने एकही बालमृत्यू होत नाही.’’
आज या दुर्गम भागातील सर्वच पाडय़ांत शबरी सेवा समितीचा संपर्क आहे. कर्जत, जव्हार, शहापूर, मुरबाड, नंदुरबार, मावळ या भागांत ठरावीक ठिकाणी व ठरावीक वारी नियमितपणे आरोग्य शिबिरे होतात. स्थानिक कार्यकर्ते व जवळचे डॉक्टर्स यांची आता व्यवस्थित घडी बसलीय. कुपोषणाचा प्रश्न मार्गी लागल्यावर सरांनी बालविकासाकडे लक्ष केंद्रित केलं. या घडीला शबरी सेवा समितीच्या कर्जत व जव्हार तालुक्यात एकूण १५ बालवाडय़ा सुरू आहेत. त्या त्या ठिकाणच्या ७वी ते १२वीपर्यंत शिकलेल्या महिला या बालवाडय़ांच्या शिक्षिका. त्यांना टॅबही दिलेत. या शिक्षिकांना प्रशिक्षण देण्याचं काम सरांचं. ते कशेळे केंद्रावर चालतं. याच केंद्रावरील वसतिगृहात राहून सध्या ११ मुलं शाळा-कॉलेजचं शिक्षण घेताहेत. १ली ते ७वीच्या विद्यार्थ्यांसाठी पदवीधर कार्यकर्त्यांच्या मदतीने अभ्यासिकाही चालवल्या जातात. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या पुस्तकहंडी उत्सवात आतापर्यंत १३ शाळांतील मुलांना दरवर्षी दीड हजार पुस्तकं वाटण्यात आलीत. शैक्षणिक साधनं व दिवाळी फराळाचं वाटप, सामुदायिक विवाह, शिवणवर्ग, शेतकऱ्यांना बियाणं, खतं पंप यासाठी मदत व मार्गदर्शने असे संस्थेचे अनेक उपक्रम आहेत आणि त्यासाठी सर व ताईंची भिंगरीसारखी भ्रमंती सुरू आहे.
मात्र मदत देताना सरांचं एक सूत्र आहे.. उभं राहायला हात द्यायचा, आत्मविश्वास निर्माण करायचा आणि अलगद बाजूला व्हायचं. अवलंबून ठेवायचं नाही. त्यानुसार जांभूळवाडी (ता. कर्जत) व वावी (ता. धडगाव) या टंचाईग्रस्त भागांत विहिरी बांधताना बांधकाम साहित्य संस्थेचं आणि श्रमदान गावकऱ्यांचं अशी विभागणी होती. आंब्यांच्या कलमांचे वाटपही फुकट नाही. २५ टक्के रक्कम घेणाऱ्याची. जव्हार तालुक्यात २००० कलमं दिली, तीही आधीच्या वर्षी दिलेली ५०० कलमं जगवलेली पाहिल्यावरच. या सूत्रामुळे इथली अनेक माणसं आता स्वयंपूर्ण झाली आहेत. कोणी भाजीपाला पिकवतंय तर कोणी इथल्या शेवग्याच्या शेंगा बाहेर नेऊन विकतं. मावळमधील शिरदे गावात तर घरोघरी खवा बनतोय.
इथल्या आदिवासी स्त्रियांमधला आत्मविश्वास तर कमालीचा वाढला. कशेळे (कर्जतपासून १६ कि.मी.) केंद्रावर सरांशी गप्पा मारताना कविता गांधिवले भेटल्या. या आजूबाजूच्या पाडय़ांवर फिरून संस्थेची आरोग्य शिबिरे व अन्य उपक्रमांची माहिती कानाकोपऱ्यात पोहोचवतात. अत्यंत सुसंगत व नेटकेपणे बोलत होत्या. म्हणाल्या, ‘‘आज मी कामाने जे स्थान मिळवलंय ते मोलमजुरी करून आयुष्यात मिळालं नसतं.’’
वसतिगृहातील मुलंही स्मार्ट, चुणचुणीत आहेत. म्हणाली, ‘‘सर आमच्याबरोबर बुद्धिबळ खेळतात (यासाठी वेळ कुठून आणतात कोणास ठाऊक?). एकदा तर कुठल्याशा सणाला जेवण करणाऱ्या बाई रजेवर होत्या. सरांनी विचारलं, ‘आज काय करू या?’ कोणी तरी म्हणालं, ‘पुरणपोळी.’ तेव्हा सरांनी ताईंना फक्त फोन करून सर्व कृती समजून घेतली आणि मग सर्वानी मिळून जमतील तशा पुरणपोळ्या केल्या आणि दूध/ तुपासह पोटभर खाल्ल्या.’’
इथल्या मुलामाणसांना सहभागी केल्याशिवाय सर आणि ताईंचा कोणताही आनंद साजरा होतंच नाही. त्यांच्या लग्नाच्या ३०व्या वाढदिवसाचा आनंदही बालवाडीच्या मुलांना साजूक तुपातले कणकेचे लाडू वाटून द्विगुणित झाला आणि मुलाच्या लग्नानंतर (जूनमध्ये) जव्हारला झालेल्या वैद्यकीय शिबिरात प्रत्येकाच्या हातात औषधांबरोबर एक-एक आंबाही ठेवला गेला.
या सगळ्यासाठी लागणारा पैसा? यावर सरांचं उत्तर होतं, ‘‘आम्ही माणसं जोडत गेलो आणि पैसा येत राहिला/ राहील. समाजाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या बांधवांपर्यंत पोहोचतो. समाज जे देतो ते १०० टक्के त्या बांधवांना मिळेल याची खात्री आम्ही आमच्या कामातून देतो.’’ त्यांचे पुढचे शब्द हृदयात कोरून ठेवावे असे म्हणाले, ‘‘आज आमच्याकडे बंगला, गाडी-घोडा, दागिने.. यापैकी काही नाही. पण नंदुरबार जिल्ह्य़ात अशा शेकडो माता भेटतील ज्या सांगतील की, माझं बाळ आज करंदीकर सरांमुळे जिवंत आहे. हे समाधान इतर कोणत्याही सुखापेक्षा लाखमोलाचं नाही का?’’

 

प्रमोद करंदीकर- ९९२०५१६४०५
रंजना करंदीकर- ९४२३८९१५३२
ईमेल- shabarisevasamiti@yahoo.co.in
वेबसाइट- www.shabarisevasamiti.org
waglesampada@gmail.com

First Published on June 4, 2016 1:07 am

Web Title: inspirational stories of social workers
Just Now!
X