News Flash

हे शब्दाविन ये आमंत्रण..

‘दरवर्षी साधारणपणे लाखभर भक्त परिक्रमा करतात. त्यातील २० ते २५ हजार पायी परिक्रमा करणाऱ्यांपैकी अडीच ते तीन हजार आम्हाला भेटतात.

नर्मदा परिक्रमा ही एकच अशी यात्रा आहे जिथे तुमच्या सगळ्या खर्चाची तरतूद सेवा मार्गातील ग्रामस्थांकडून केली जाते, असं मानलं जातं. प्रतिभा आणि सुधीर चितळे हे गेल्या चार वर्षांपासून ही सेवा देत आहेत. पुण्याहून यात्रेला निघताना चितळे दाम्पत्य आपल्या मारुती व्हॅनमध्ये स्वत:चे कपडे व ५०-६० ब्लँकेटस्, २५-३० स्वेटर्स, शंभरेक कानटोप्या, वेगवेगळ्या मापाचे चप्पल- बूट इत्यादी घेऊन निघतात. दरवर्षी अडीच ते तीन हजार भक्तांना- सकाळी आले तर चहा- नाश्ता. दुपारी आले तर भोजन आणि संध्याकाळी आगमन झालं तर जेवणाबरोबर झोपण्याची व्यवस्था केली जाते. त्यांच्या या सेवाकार्याविषयी..

एक तपश्चर्या म्हणून जेव्हा मी प्रथम नर्मदा परिक्रमा केली (नोव्हेंबर २००६) तेव्हा गेली अनेक वर्षे मनाच्या चांदण्यांत वास करून असलेली शांता शेळके यांची ही कविता सोबत होतीच..

दूर बासरी साद घालते कशी? कुठे?

सूर वाहती मला वाहती कसे? कुठे?

आभाळाच्या निळ्या कोंदणी खुणावते चांदणी

मी माझ्या मनातून सुटू पाहते तळमळते बंधनी

हे शब्दाविन ये आमंत्रण, कसे? कुठे?

परिक्रमेला निघण्याआधी मी माझ्या पतीला जेव्हा ही कविता ऐकवली तेव्हा ‘तुझं सगळंच जगावेगळं..’अशा अर्थाचा एक कटाक्ष टाकत त्यांनी माझं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. मात्र आम्ही परिक्रमा करून आल्यानंतर दीड वर्षांनी एका हळुवार क्षणी मी पुन्हा त्या कवितेची उजळणी केली तेव्हा मात्र त्यांचा बांध फुटला. पाणावल्या डोळ्यांनी माझा हात हातात घेत त्यांनी त्या कवितेच्या याओळी उद्धृत केल्या..

‘घर अंगणही पडले मागे, तुटले धागे कसे?

गूढ अशा त्या अभासाचे मजही लागले पिसे..

ऐकलं आणि वाटलं, जे हवं होतं ते सगळं मिळालं..’ प्रतिभाताई चितळे नर्मदा परिक्रमेमुळे जोडीदारामध्ये पडलेला जमीनअस्मानचा फरक उलगडत होत्या. नर्मदेच्या तीराने अनवाणी केलेल्या परिक्रमेने चितळे पती-पत्नीचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं आणि त्यांनी पुढील जीवन परिक्रमावासीयांच्या सेवेसाठी व्यतीत करायचं ठरवलं. त्यानुसार ही जोडी गेली चार र्वष (वर्षांतले आठ महिने) परिक्रमेच्या मार्गावर मुक्काम करत, नर्मदेच्या भक्तांना जेवणखाण्यापासून औषधांपर्यंत आणि कपडय़ांपासून पादत्राणांपर्यंत सर्व प्रकारची सेवा देत आहे.

प्रतिभाताईंचं स्फूर्तिस्थान म्हणजे त्यांचे मामा रामचंद्र वैद्य. त्यांनी तर तीन वेळा पायी परिक्रमा केली. तिसऱ्या फेरीच्या वेळी मामांचं वय होतं ८२ आणि मामीचं ७५. त्यांचे अनुभव ऐकताना प्रतिभाताईंचा निर्णय पक्का होत गेला. पण सुधीर चितळे यांचं म्हणणं होतं..‘देहाला एवढे कष्ट देण्याची गरज आहे का? तुझी इच्छाच असेल तर आपण आपल्या गाडीने एका महिन्यात परिक्रमा करून येऊ..’ आपलं हे म्हणणं पटवण्यासाठी त्यांनी अनेक सबबीही पुढे केल्या. परंतु पत्नीचा मनोनिग्रह बघून शेवटी ते तयार झाले. एवढी रजा कशी मिळणार म्हणून त्यांनी आपल्या नोकरीचा (सरव्यवस्थापक पदाचा) राजीनामा दिला. मात्र परिक्रमा सुरू झाली आणि त्यांची आधीची भूमिका (तू साधक आणि मी सेवक) हळूहळू बदलत गेली..

प्रतिभाताई म्हणाल्या, ‘‘परिक्रमा तीन प्रकारे करता येते. एक पैसाअडका बरोबर घेऊन कोणत्या तरी वाहनाने, किंवा अर्धी पायी व अर्धी किनाऱ्याने आणि तिसरी अनवाणी कोणतंही साधन न घेता निष्कांचनपणे. आम्ही तप म्हणूनच निघाल्याने शेवटचा पर्याय निवडला. सदाव्रत (डाळ, तांदूळ, कणीक इत्यादी शिधा) मागून उदरनिर्वाह करायचा हा या परिक्रमेतील एक नियम. हे सदाव्रत कोण देतं तर नर्मदा किनाऱ्यावरचे शेतकरी, आदिवासी आणि नावाडी बांधव. यातील काहींच्या घरात तर दुसऱ्या दिवशीचीही भ्रांत असायची, पण आमचं स्वागत मात्र आनंदाने व्हायचं. अर्थात रोज सदाव्रत मागून शिजवण्याची वेळ आली नाही. अनेक कुटुंबांतून वा आश्रमांमधूनही जेवण मिळतं. या त्यांच्या परिक्रमेतील ३५०० कि.मी.च्या प्रवासात त्यांनी अनुभवलेल्या काही घटना थक्क करणाऱ्या, काही परीक्षा पाहणाऱ्या तर काही साक्षीभाव शिकवणाऱ्या. चितळ्यांच्या परिक्रमेविषयीची चित्रफीत ‘यू टय़ूब’वर उपलब्ध आहे. तरी एक दोन प्रसंग लिहिण्याचा मोह आवरता येत नाही..

परिक्रमेच्या सुरुवातीचा दिवस. त्रिपुरी पौर्णिमा होती त्या दिवशी. ओंकारेश्वरला दीपदानासाठी अलोट गर्दी उसळलेली. माणसाला माणूस चिकटलेलं. अशा परिस्थितीत अचानक पुढे असणाऱ्या पुरुषाचा राजस्थानी जोडय़ातला पाय प्रतिभाताईंच्या अनवाणी पावलावर पडला आणि त्या किंचाळल्या. ते ऐकून तो गरकन् वळला, त्याचबरोबर त्याचा बूटही वळला पण बरोबर त्यांच्या अंगठय़ाचं नख घेऊनच. त्या म्हणाल्या की, त्या क्षणी मी मेल्यातच जमा होते. बघता बघता तो अंगठा आवळ्याएवढा सुजला आणि दुसऱ्या दिवशी तर खडापहाड ओलांडायचं आव्हान होतं. हा पहाड पार करताना त्यावर हातापायाची बोटं रुतवत त्याला अगदी खेटून जावं लागतं. खाली अथांग नर्मदामैया. पाय जरा जरी घसरला तरी थेट मोक्ष. आसपास चिटपाखरूही नाही. अशा वेळी दोन परिक्रमावासी अचानक तिथे आले आणि त्याच्या मागोमाग ते जिथे बोटं रुतवतील तिथे तिथे त्यांचं अनुकरण करत (दुखरा पाय अधांतरीच) मी पलीकडे कशी गेले ते त्या मैयालाच ठाऊक. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगती, चालविशी हाती धरूनिया..’ हा अनुभव असा क्षणोक्षणी येणारा. एकदा तर चालताना आरपार गेलेला बाभळीचा काटा, बूड आत फसल्यामुळे त्यांनी दोन दिवस सोबत ठेवला. प्रतिभाताईंचं बोलणं ऐकताना जाणवत राहतं की अशा दिव्यातून सहीसलामत निभावण्यासाठी मनाची कोणती शक्ती काम करत असेल?

सुधीर चितळे म्हणाले, ‘‘सुरुवातीला माझी भावनिक गुंतवणूक नव्हती, पण जसजसे अनुभव येत गेले तसतसा मी विरघळत गेलो आणि शेवटी शेवटी तर परत जाऊच नये, असं वाटू लागलं.’’ त्यांनी सांगितलेला एक किस्साही असाच. ‘जून महिन्याच्या प्रारंभाला उत्तर तीरावरून चालताना उन्हाळा व श्रम यामुळे प्रतिभाताईंची तब्येत एवढी खालावली की त्यांच्या पायातली जोडवीही एक दिवस गळून पडली. हे लक्षात आलं केव्हा तर पुढच्या गावात गेल्यावर पाय धुताना. बरं ही जोडवीही महत्त्वाची. कारण अहमदनगरमधील त्यांच्या शेजारणीने ती दिलेली. कशासाठी तर परिक्रमा झाल्यानंतर आपल्या देव्हाऱ्यात ठेवण्यासाठी. नर्मदामैयाला मनापासून प्रार्थना केली आणि हुरहुरत्या मनाने सकाळी पुढे चालायला सुरुवात केली तर कानांवर हाक, ‘‘मैयाजी! (परिक्रमावासीयांना याच नावाने संबोधतात) रुको, चाय पिके जाना।’’ चहापानानंतर ती बाई अदबीने म्हणाली, ‘‘कृपा करून नाही म्हणू नका. मला तुम्हाला जोडवी भेट द्यायची आहेत.. काय म्हणणार या योगायोगाला?’’

नोव्हेंबर २००७ मध्ये सुरू झालेली चितळ्यांची परिक्रमा एक वर्ष पाच महिन्यांनी म्हणजे मार्च २००९ मध्ये सफल संपूर्ण झाली आणि सुधीर चितळे वयाच्या ५८ व्या वर्षी पुन्हा त्याच ग्रुपमध्ये नोकरीसाठी रुजू झाले. यावेळी तर पगार आधीच्या तिप्पट मिळाला. ही नोकरी तीन वर्षे केल्यावर त्यांनी विचार केला, आता कमावणं बस्स झालं. तिन्ही मुलगेही आपापल्या पायांवर उभे होते. त्यांना त्यांचे जोडीदारही मिळाले होते. परिक्रमेमुळे गरजाही कमी झाल्या होत्या. त्यांनी ठरवलं आता पुढचं जीवन सेवेसाठी. परिक्रमा करताना आपल्यावर बऱ्याच जणांनी खर्च केलाय. ते कर्ज आता उतरवायचं. प्रतिभाताईंची साथ होतीच. दोघांनी हेदेखील ठरवलं की कुठल्या तरी आश्रमात जाऊन किंवा कोणाच्या तरी हाताखाली सेवा नाही द्यायची. जे काही करायचं ते स्वत:च्या बळावर, स्वत:च्या मर्जीने.

२०१२ हे त्यांच्या सेवेचं पहिलं वर्ष. त्यासाठी त्यांनी सर्वेक्षण करून मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्य़ातील बगलवाडा हे गाव निवडलं. सेवेची गरज कुठे आहे याचा शोध ते दरवर्षीच घेतात. कधी आपल्या अनुभवावरून तर कधी परिक्रमावासीयांनी दिलेल्या माहितीवरून ठिकाण निश्चित केलं जातं. मात्र पहिल्या वर्षी अनुभव नसल्याने राहाण्याची जागा गावात आणि सेवा देण्याचं स्थळ परिक्रमा मार्गावर असं दोन ठिकाणी बस्तान बसवल्याने काही परिक्रमावासीयांची चुकामूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे पुढच्या वर्षांपासून परिक्रमेच्या मार्गावरच राहून सेवा द्यायची हे निश्चित झालं. झालंच तर प्रथम पाणी, चहा व बिस्किटं.. इतपत सेवा द्यायची असं त्यांनी ठरवलं होतं. (कारण जवळच्या आश्रमात जेवणाची सोय होती). परंतु जेव्हा महाराष्ट्रीय परिक्रमावासी येत तेव्हा बरेच दिवसांनी आपल्या पद्धतीचं जेवण (म्हणजे पिठलं भात/ तूप, मेतकूट भात) मिळेल या आशेने रेंगाळत. ते पाहून चितळ्यांची सेवा चहा- बिस्किटांपासून दोन्ही वेळच्या जेवणापर्यंत विस्तारली. पुढच्या वर्षांपासून ते जेवणाखाणाबरोबर अंथरूण- पांघरूण/ औषधं/ कपडे/ चपला.. असं परिक्रमावासीयांना ज्याची जी गरज असेल ते ते पुरवायला सुरुवात केली.

सुधीर चितळे म्हणाले, ‘दरवर्षी साधारणपणे लाखभर भक्त परिक्रमा करतात. त्यातील २० ते २५ हजार पायी परिक्रमा करणाऱ्यांपैकी अडीच ते तीन हजार आम्हाला भेटतात. (दिवसभरात ५० ते १००, कधी दीडशेही) ते ज्या वेळेला येतील त्याप्रमाणे व्यवस्था करायची. सकाळी आले तर चहा- नाश्ता. दुपारी आले तर भोजन आणि संध्याकाळी आगमन झालं तर जेवणाबरोबर झोपण्याची व्यवस्था. जेवण म्हणजे गावात मिळेल ती भाजी टाकून केलेलं सांबार, भात आणि गव्हाच्या चपात्या. शिवाय लिंबाचं लोणचं, तूप, मेतकूट हे असतंच.

रोज सकाळी उठून पहिलं काम म्हणजे दहा किलोची कणीक मळून ठेवणं. तिकडे घरोघरी गहू पिकतो. गावात चक्की असतेच आणि गरज असेल ते आणायला आमचं वाहन सज्ज असतंच (चितळे पुण्याहून आपल्या मारुती व्हॅनमध्ये स्वत:चे कपडे व इतर सामान भरून निघतात. हे इतर सामान म्हणजे ५०-६० ब्लँकेटस्, २५-३० स्वेटर्स, शंभरेक कानटोप्या, वेगवेगळ्या मापाचे चप्पल- बूट इत्यादी) तेल, तिखट, मीठ इत्यादी त्या त्या गावी घ्यायचं. ते म्हणाले, ‘‘आणि हो, सगळा स्वयंपाक तीन दगडांच्या चुलीवर. एक बैलगाडी भरून लाकडं घेतली की सहा महिने पुरतात. आम्ही पुण्याहून गाडीतून गॅस व शेगडीही घेऊन जातो. पण तो वेळी-अवेळी पटकन चहा करून देण्यासाठी राखून ठेवायचा..’’

रोज १० किलोची कणीक मळायची या कल्पनेनेच माझे हात भरून आले. मी विचारलं, ‘‘म्हणजे पोळ्या किती लाटाव्या लागत असतील?’’ यावर प्रतिभाताईंचं उत्तर, ‘‘हेतू शुद्ध असला की कष्टांच्या चढत्या भाजणीनुसार उत्साह वाढत जातो. शिवाय परिक्रमावासी मदत करतातच की! चितळेंनाही सगळा स्वयंपाक येतो. कणीक मळायचं काम त्यांचंच.’’ त्यांनी सांगितलं की, ‘बरोबर सोलर लॅम्प ठेवले तरी रात्रीचं जेवण सूर्यास्तापूर्वी उरकावं लागतं, नाहीतर पानात किडय़ांची मेजवानी ठरलेली. झालंच तर नैसर्गिक विधींसाठी आजूबाजूचं जंगल

आणि कडाक्याच्या थंडीतही नर्मदेत स्नान हे वेगळं सांगायला नको.

हा जीवनक्रम ऐकताना मनात आलं, ‘‘संकल्पाची ताकद काही वेगळीच. नाही तर वयाच्या ५०/५५ पर्यंत नळ, लाईट, गॅस, कुकर, मिक्सर.. अशा ‘कम्फर्ट झोन’मध्ये वावरलेल्यांना त्यातून बाहेर येऊन असं जगणं किती अवघड!’’

चितळे पती- पत्नीने २०१२ ते २०१४ अशी तीन वर्षे (प्रत्येक वर्षांचे आठ महिने) अनुक्रमे बगलवाडा, छोटी छिपानेर व रमपुरा या मध्य प्रदेशातील तीन ठिकाणी मुक्काम करून सेवा दिली. मात्र चौथ्या वर्षी त्यांनी आपल्या व्हॅनने उलटय़ा दिशेने परिक्रमा करायचं ठरवलं. त्यामुळे परिक्रमावासी समोरून येताना दिसत. मग त्यांना घेऊन जवळच्या एखाद्या पाराखाली तीन दगडांची चूल मांडून चहा किंवा जेवणाची तयारी. यात्राही झाली आणि सेवाही.

चितळ्यांचे हे सेवाकार्य माहीत झालेले अनेकजण त्यांच्याजवळ सेवेची इच्छा व्यक्त करतात. या इच्छुक सेवेकऱ्यांचं नियोजन करण्यासाठी आणि परिक्रमेतील अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये हॉल घेऊन एक सभा घेण्यात येते. मात्र चितळे शक्यतो कोणाकडून पैशांची मदत घेत नाहीत. हे सेवाकार्य कुठवर करणार यावर त्यांचं उत्तर ‘‘जवळचा पैसा आणि अंगातलं बळ यापैकी काहीही संपलं की तिथं थांबायचं..’’

सेवेच्या या सोनेरी पर्वात त्यांनी जे अनुभवलं ते शब्दातीत असंच. प्रतिभाताईंनी सांगितलं, ‘‘पंचेंद्रिये सक्षम असतानाही पायी परिक्रमा करणं महाकठीण. परंतु जेव्हा दोन्ही पाय नसलेला (फक्त कुबडय़ांचा आधार) आणि कालांतराने दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला अशा दोन साधकांना एकटय़ाने परिक्रमा करताना पाहिलं तेव्हा आमचा उरलासुरला अभिमानही गळून पडला. मे-जूनपर्यंत परिक्रमावासी कमी कमी होत जातात आणि नंतर येतात ते साधू. त्यांचा सत्संग ऐकताना  समाधान मिळतं..’’

दोघांनी एकमुखाने सांगितलं की, ‘‘ही एकच अशी यात्रा आहे, की जी तुम्ही एकही पैसा बरोबर न घेता करू शकता. तुमच्या सगळ्या खर्चाची तरतूद मार्गातील ग्रामस्थांकडून केली जाते. पुन्हा कधी भेटू याची शाश्वती नाही. एकमेकांकडून कसलीही अपेक्षा नाही. फक्त प्रेमाची देवाण- घेवाण. या परिक्रमेनेच आम्हाला शिकवलं की यापुढे संचय करायचा नाही. परिक्रमेच्या काळात जे सुख रोज नव्याने भेटलं ते दोन्ही हातांनी वाटण्याचा प्रयत्न करायचा..’’ शिकलेलं अंगीकारत प्रतिभाताई आणि सुधीर चितळे यांची पावले त्याच मार्गावर पडत आहेत..

-संपदा वागळे

संपर्क – ९१५८९९११७५

sudhirchitale51@gmail.com

waglesampada@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2016 1:06 am

Web Title: invitation without word
Next Stories
1 आयुष्याचा महोत्सव
2 फॅमिली चॅम्पियनशिप
3 सूर्य डोई घ्यावा लागतो..
Just Now!
X