12 November 2019

News Flash

जेथे जातो तेथे ती माझी सांगाती

लग्न झालं तेव्हा वासुदेवांची जे.जे.तील नोकरी होती हंगामी स्वरूपाची

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार आणि ‘संस्कार भारती’चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करताना वासुदेव कामत यांना सातत्याने आपल्या पत्नीची, भारती यांची साथ मिळाली आणि त्यांचं काम म्हणजे दुधातला गोडवा ठरलं. म्हणूनच ते म्हणतात, जेथे जातो तेथे ती माझी सांगाती. भारती लग्नानंतर लॅन्डस्केपिंग, फोटोग्राफी, मराठी शिकल्या. आज दोघंही ‘संस्कार भारती’च्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा प्रसार करीत आहेत..
‘‘मी २२/२३ वर्षांचा असेन तेव्हाची गोष्ट. कोणत्यातरी महत्त्वाच्या कामासाठी मी एका सद्गृहस्थांच्या घरी फोन केला, तो त्यांच्या पत्नीने घेतला. ते घरात नाहीत हे कळल्यावर मी विचारलं, ‘कुठे गेलेत?’ उत्तर – ‘माहीत नाही.’ ‘माझ्यासाठी काही निरोप?’..‘माहीत नाही.’ ‘कधी येतील?’ ‘माहीत नाही.’ हा नन्नाचा पाढा ऐकून मी अवाक् झालो आणि त्याच क्षणी मनाशी खूणगाठ बांधली की भविष्यात आपली जी जोडीदार येईल तिला माझ्या कामाची/व्यवहाराची पूर्ण महिती असेल. तिचं कागदोपत्री नाव काहीही असो मी तिला गृहिणी म्हणूनच हाक मारेन..आणि वस्तुस्थिती अशी आहे की माझ्या पत्नीने, भारतीने ‘गृहिणी गृहमुच्चते’ हे सुवचन आपल्या वागण्यातून सिद्ध केलंय. माझ्या प्रत्येक जबाबदारीत ती दुधातल्या खडीसाखरेसारखी विरघळलीय.. त्यामुळे आज दुधाला जो गोडवा प्राप्त झालाय तो या साखरेमुळेच..’ आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार आणि ‘संस्कार भारती’चे राष्ट्रीय अध्यक्ष वासुदेव कामत पत्नीचं आपल्या आयुष्यातील स्थान उलगडत होते.

लग्न झालं तेव्हा वासुदेवांची जे.जे.तील नोकरी होती हंगामी स्वरूपाची आणि घर म्हणजे बोरिवलीतील एका चाळीत दहा बाय दहाची खोली व एक झोपडी. या टीचभर जागेत ते आईवडील व ६ भावंडांसह राहात. मंगळुरूमधील कारकळ या गावी पार पडलेल्या त्यांच्या लग्नाच्या मांडवात एकच चर्चा सुरू होती..अशा स्थळी काय पाहून मुलगी दिली? यावर मुलीच्या काकांनी (कानडी भाषेत) दिलेलं उत्तर होतं, ‘रुकु पोळोन वाली सोडची’ म्हणजे झाड बघायचं आणि वेल सोडून द्यायची. काकाचं भविष्य खरं ठरलं. त्यांनी निवडलेल्या झाडाचा बघता – बघता डेरेदार वृक्ष झाला आणि त्याला बिलगलेली वेलही सर्वागाने बहरून आली. १२ वीपर्यंत शिकलेली व लग्न होईपर्यंत लोकल ट्रेनदेखील न बघितलेली ही मुलगी पतीच्या सहवासात लॅन्डस्केप पेंटिंग शिकली. ग्रुप शोमध्येही तिने भाग घेतला. फोटोग्राफीतही कौशल्य मिळवलं. लग्नापर्यंत मराठीचा गंधही नसताना आयोजकांच्या आग्रहाखातर तिने दहा मिनिटांचं भाषणही दिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतेही पद न घेता ‘संस्कार भारती’ची व्यासपीठामागची अनेक कामंही तिने केली. वासुदेव कामत नामक विद्यापीठात तिच्या व्यक्तिमत्त्वाला असे अनेक पैलू पडत गेले.

वासुदेवांच्या बोटात चित्रकला उपजतच होती. वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षांपासूनच त्यांनी भिंतीवर चित्रं काढायला सुरुवात केली. घराला संघाचे संस्कार होते. ते शाळेत असताना वडील कामावरून आले की दोन प्रश्न नेहमी विचारत. पहिला, आज कोणतं चित्र काढलं आणि दुसरा, शाखेत गेला होतास ना? अशा संस्कारात वाढल्याने शिक्षण पूर्ण होता होता प्रचारक बनण्याचे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. पण त्याचबरोबर चित्रकलेचा हातही सोडायचा नव्हता. या दोन्हीचा मेळ त्यांना ‘संस्कार भारती’च्या ध्येयधोरणांत सापडला आणि ते महाराष्ट्रातील पहिल्या बैठकीपासून (१९९०) या संस्थेशी जोडले गेले.
वासुदेव कामत म्हणाले, ‘‘संस्कार भारती म्हणजे आठ कलांच्या (संगीत, नृत्य, नाटय़, साहित्य, चित्र/ शिल्पकला, प्राचीन कला आणि रांगोळी) माध्यमांतून भारतीय संस्कृतीचा प्रसार करणारी संस्था.’’ कलाक्षेत्रच का निवडलं यावर त्यांचं उत्तर.. ‘‘इतर संघटनांना लोकांपर्यंत जाऊन त्या त्या क्षेत्रात काम करावं लागतं, पण कलेमध्ये उपजतच आकर्षण व मनोरंजन हे गुण असल्यामुळे जिथे जिथे या कलेचं सादरीकरण होतं तिथे तिथे लोक स्वत: जातात. मात्र केवळ करमणूक हाच उद्देश न ठेवता हे माध्यम संस्कारवाहक कसं बनेल याचा विचार केला गेला.’’ ते म्हणाले की, ‘‘प्रत्येक कलाकार हा साधकच असतो, एकेकटेपणे त्याची साधना सुरूच असते.’’ परंतु वासुजींच्या भाषेत कलाकारांना एकत्र आणणं म्हणजे तराजूत बेडकांचं वजन तोलण्यासारखं आहे. हे आव्हान स्वीकारून विद्यार्थीदशेतील कलाकारांपासून प्रथितयश कलावंतांपर्यंत सर्वानी कटिबद्ध होऊन व्यापक प्रमाणात संस्कारकार्य करण्यासाठी सर्वश्री भाऊराव देवरस, हरीभाऊ वाकणकर, नानाजी देशमुख आणि माधवराव देवळे यांच्या प्रदीर्घ चिंतनातून ११ जानेवारी १९८१ रोजी लखनौ येथे ‘संस्कार भारती’ची स्थापना झाली आणि पुढे ही संकल्पना टप्प्याटप्प्याने देशभर विकसित होत गेली.

‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ व ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ या संस्थांच्या अध्यक्षपदाबरोबर ‘संस्कार भारती’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यापासून वासुदेव कामत यांचे अनेक शनिवार कोणत्या ना कोणत्या बैठकीत वा कार्यक्रमात व्यग्र असले तरी त्यांनी सुरुवातीला ‘संस्कार भारती’च्या माध्यमातून चित्रकलेत गोडी असणाऱ्या/नवोदितांना एकत्र आणण्यासाठी बोरिवलीत अनेक र्वष दर आठवडय़ाला कार्यशाळा घेतल्या. या कार्यशाळांच्या आयोजकांत वासुदेव कामत हे वलयांकित नाव अग्रभागी असे तरी पडद्यामागची जबाबदारी भारतीताईंचीच. निवासी शिबिरांमध्ये तर कोणतीही व्यावहारिक अडचण आल्यास तिचं निवारण करण्यासाठी शिबिरार्थीना तो हक्काचा भोज्जा आहे.

वासुदेव कामतांनी आवर्जून सांगितलं की, ‘ते आजही कुठेही एकटे जात नाहीत.. जेथे जातो तेथे ती माझी सांगाती. या पाठराखणीसाठी प्रसिद्ध चित्रकर्ती प्रफुल्ला डहाणूकर यांनी भारतीताईंना जाहीर शाबासकी दिलीय. १९९६ मध्ये जपानमधील एका बौद्ध मंदिरासाठी काढलेल्या बुद्धाच्या पेंटिंगच्या मालिकेवर अखेरचा हात फिरवण्यासाठी दोघंही तिथे ४५ दिवस जाऊन राहिले होते. त्या दिवसात दोघांनीही स्वतंत्रपणे डायरी लिहिली. त्यातील भारतीताईंची निरीक्षणे चकित करणारी होती. आजही त्या दैनंदिनी लिहीत असल्याने कामतांच्या सर्व कामांचं स्टॅटिस्टिक्स (कोणत्या चित्राला किती वेळ लागला- वगैरे) त्यांच्याकडे तयार असतं.

बोलता बोलता दोघांनीही ‘संस्कार भारती’ने त्यांच्या आयुष्याला दिलेले अनेक समाधानाचे क्षण उलगडले. त्यातील एक अगदी अलीकडचा. वासुदेव कामतांच्या हाकेनुसार मुंबईतील काही चित्रकारांनी एकत्र येऊन आपल्या कलाकृतींचं, किंमत कमी करून प्रदर्शन लावलं आणि विक्रीची रक्कम नेपाळच्या पूरग्रस्तांसाठी देण्याचं जाहीर केलं. भारतीताई म्हणाल्या की, ‘‘एरवी प्रदर्शनातून हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढय़ाच चित्रांची विक्री होते पण त्या वेळी मात्र एकूण एक चित्रं विकली गेली. शेवटची दोन चित्रं उरली तेव्हादेखील घेणाऱ्यांनी पटकन टिकली लावा (टिकली ही विकली गेल्याची खूण) असा धोशा लावला आणि आम्ही भरून पावलो.’’

‘संस्कार भारती’चे गुढीपाडवा, गुरुपौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दिवाळी परिवार मेळावा, भारतमाता पूजन आणि भरतमुनी जयंती हे ६ उत्सव देशभरात सर्वत्र सामूहिकपणे साजरे केले जातात. गुढीपाडव्याची नववर्ष यात्रा या संकल्पनेची रुजवात ‘संस्कार भारती’चीच. मात्र या उत्सवात साचलेपण येणार नाही, ते नावीन्यपूर्ण पद्धतीने कसे होतील याचा प्रबंधकांच्या बैठकीत विचारविनिमय होत असतो. उदाहरणार्थ, कृष्णाष्टमीला देशभर विशेषत: उत्तर भारतात ‘कृष्णरुपसज्जा’ नावाने हा उत्सव साजरा होतो. त्यासाठी हजारो बालक बाळकृष्ण व राधेच्या रूपात एकत्र येत. अशा मेळाव्यांपेक्षा या निमित्ताने त्यांनी कृष्णाच्या जीवनातले काही प्रसंग सादर केले किंवा गीतेचे काही अध्याय पाठ केले तर त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख होईल या विचारातून आता असा बदल घडवण्यास सुरुवात झालीय. त्याचे परिणामही दिसू लागलेत. एवढंच नव्हे तर कला हे
क्षेत्र निवडल्याने प्रस्तुती गुणवत्तापूर्ण असली पाहिजे हा कामतांचा आग्रह असतो. म्हणूनच क्रांतिकारकांच्या जयंतीला मुलांनी त्यांच्या समोर चित्रात रंग भरण्यापेक्षा त्या हुतात्म्यांना अर्पण करण्यासाठी त्यांच्या मनातून कागदावर उतरवलेलं काहीही, मग ते धूर निघणाऱ्या उदबत्तीचं चित्र असो वा एखादं फूल..ते मुलांमधील सृजनात्मकता जागवत असल्याने त्यांना लाखमोलाचं वाटतं.

जहांगीर आर्ट गॅलरी तसेच दिल्ली, बंगळुरू, पुणे येथील नामवंत कलादालनात स्वतंत्रपणे अनेक प्रदर्शने भरवणाऱ्या या श्रेष्ठ व ज्येष्ठ कलाकाराचा मिरारोड येथील घरच्या वरच्या मजल्यावरील स्टुडिओ अप्रतिम अशा पेंटिंग्ज व लॅन्डस्केपिंग्जनी सजलाय. बंगल्याची सजावटही त्यांच्या एकुलत्या एक आर्किटेक्ट मुलीची, अमृताची. घरातील दोन हक्काच्या मॉडेल्सची पोट्र्रेट बंगल्यात जिथे तिथे दिसतात. २००६ मध्ये ‘पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका’ने देशविदेशातील १२०० चित्रांतून निवडलेल्या आणि ‘ड्रेपर ग्रॅन्ड प्राइज’ मिळालेल्या भारतीताईंच्या पोर्ट्रेटपाठची कथाही गंमतशीर. स्पर्धेसाठी चित्र पाठवायला ४/५ दिवस उरले असताना एकदा रात्री साडेदहा वाजता सगळी कामं आटपून झोपण्याच्या तयारीत असणाऱ्या भारतीताईंना पतीराजांचा प्रश्न..‘तू बसतेस का आत्ता मॉडेल म्हणून?’ त्या घरातल्या साडीवरच त्यांनी दोन-तीन तासांची बैठक जमवली. दुसऱ्या दिवशीही तेवढाच वेळ दिला आणि एक विलक्षण कलाकृती जन्माला आली.

अशा प्रकारे मॉडेलपासून सखी- सचिवापर्यंत सर्व भूमिका निभावणाऱ्या भारतीताई म्हणजे अत्यंत साध्या, सोप्या आवरणाखालील एक अफाट मानसिक सामथ्र्य असलेली सहचरीच वाटते. ही सहचरी विचाराने व कृतीने आपल्या कलाकार पतीच्या पाठी एखाद्या अभेद्य भिंतीसारखी उभी आहे. एक माणूस म्हणून, एक स्त्री म्हणून जगण्यावरची निष्ठा साधेपणाने कशी जपायची हे भारतीताईंकडे पाहून उमजतं. त्यांच्या या साधेपणातच उभयतांच्या सहजीवनाचा गोडवा सामावलेला आहे.

– संपदा वागळे

First Published on April 23, 2016 1:10 am

Web Title: life story of vasudeo kamath and bharathi kamath