बुद्धिबळाच्या पटावर एका बाजूला राजा आणि दुसऱ्या बाजूला राणी.. प्रवीण आणि भाग्यश्री ठिपसे यांच्या संसारपटाचं असंच काहीसं आहे. ग्रॅडमास्टर, पद्मश्री, छत्रपती पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार असे अनेकानेक पुरस्कार मिळवणाऱ्या या दोघांनाही वाटतं की, जर लाइफ पार्टनर बुद्धिबळपटू असेल तर एकमेकांसाठीचा आधार अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतो.. प्रवीण आणि भाग्यश्रीच्या आजवरच्या यशाचं श्रेयही बहुधा हेच असावं.

ऑगस्ट १९८६ची घटना. सांगलीच्या वेशीपाशी अख्खं गाव लोटलं होतं. कशासाठी.. तर गावातल्या एका मुलीने बुद्धिबळामध्ये साता समुद्रापार झेंडा लावला म्हणून तिचं स्वागत करण्यासाठी. या मुलीचं नाव भाग्यश्री साठे (आताची भाग्यश्री ठिपसे) सलग तीन र्वष अव्वल खेळाडूंना हरवून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारी भाग्यश्री तेव्हा तिचा पहिला ग्रॅण्डमास्टर परफार्मन्स देऊन लंडनहून परतत होती. छोटय़ा गावाचं प्रेम काही वेगळंच! त्या मंडळींनी या तेवीस वर्षांच्या मुलीची वाजतगाजत हत्तीवरून मिरवणूक काढली. त्या वेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी वसंतदादा पाटील होते त्यांनीही भाग्यश्रीला प्रेमानं वर्षां बंगल्यावर चहापानासाठी बोलावलं. मात्र हा सुवर्णदिन बघायला तिचे पहिले गुरू व मार्गदर्शक वसंतराव साठे (वडील) हयात नव्हते याची खंत तिला तेव्हाही वाटली आणि आजही वाटते.
आपल्या चमकदार खेळाने पाच वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद, एकदा एशियन व दोनदा एशियन झोनल चॅम्पियनशिप, ८५ मध्ये पोलंडमधील आंतराष्ट्रीय स्पर्धेत अव्वल क्रमांक, ९९ मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेत बाजी.. अशा अनेक स्पर्धा जिंकत तिने केवळ सांगलीकरांनाच नव्हे तर संपूर्ण बुद्धिबळ विश्वाला आपली दखल घेणं भाग पाडलं. आयुष्याचा जोडीदारही (प्रवीण ठिपसे) तिला याच वाटेवर भेटला आणि बुद्धिबळ हाच श्वास आणि ध्यास असलेल्या या जोडीचं आयुष्य म्हणजे एक सुरेल संगीत बनलं.
भाग्यश्री सहा भावंडांतील शेंडेफळ. लहानपणी घरची परिस्थिती बेताची होती. वडिलांची तब्येत बरी नसल्याने घरची आर्थिक जबाबदारी तिची आई शांता, ताई व थोरले बंधू कांचनराव यांनाच उचलावी लागली. मात्र वडिलांनी मुलांच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलला. सर्व मुलांना बुद्धिबळाचं प्राथमिक शिक्षण दिलं. एवढचं नव्हे तर त्यांच्यात चुरस निर्माण करण्यासाठी ते मुलांमध्ये आपसातच स्पर्धा लावून बक्षीस म्हणून गोळ्या-बिस्किटे वाटत. घरात खेळाला पोषक वातावरण होतं. मोठी भावंडं टेबल टेनिस, कबड्डी, बॅडमिंटन यांमध्येही पारंगत होती. तिच्या आईचं वेगळेपण म्हणजे घराला हातभार लावण्यासाठी तिने मुंबईत येऊन अंधांना शिकवण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि ती महाराष्ट्रातील पहिली होम टीचर बनली.
१९७८ मध्ये भाग्यश्रीने भारतीय संघात पहिल्यांदा प्रवेश केला. तेव्हा टीममध्ये चारच महिला खेळाडू असायच्या. त्यांतील तिघी खाडीलकर भगिनी. चौथी कोण हाच प्रश्न असायचा. त्यामुळे भारतीय संघात शिरकाव झाला तरी तिचा संघर्ष सुरूच होता. १९८२ मध्ये प्रवीण ठिपसे चेस ऑलिम्पियाडसाठी भारतीय टीमचे कर्णधार झाले तेव्हा भाग्यश्रीही संघात होती. त्या वेळी ही दोघं प्रथम एकत्र आले. त्यानंतर स्पर्धाच्या निमित्ताने भेटीगाठी, बोलणं सुरू झालं. अर्थात तेव्हां एकमेकांत संघ सहकारी एवढंच नातं होतं.
दरम्यान, भाग्यश्रीच्या खेळातील प्रगती बघून तिच्या वडीलबंधूंनी- कांचनरावांनी- तिला अधिक मार्गदर्शनासाठी मुंबईला पाठवण्याचा निर्णय घेतला. अनायसे तिचा दुसरा भाऊ धनंजय मुंबईत असल्यामुळे ते शक्य झालं. धनंजयच्या विनंतीनुसार तिच्या प्रशिक्षणाची जबाबदारी प्रवीणने स्वीकारली आणि त्यांची ओळख वाढत गेली.
१९८४ मध्ये दोघेही नॅशनल चॅम्पियन झाले. सर्वसाधारणपणे संघातील खेळाडूंना एक किंवा दोनच मोठय़ा स्पर्धा खेळायला मिळतात. पण राष्ट्रीय विजेत्याला मात्र देश-विदेशात भरपूर खेळण्याची संधी मिळते. या नियमानुसार भारताच्या पुरुष व महिलांच्या संघात अव्वल स्थान मिळाल्यावर दोघेही सलग सहा-सात महिने एकत्र स्पर्धा खेळत राहिले. त्यानिमित्ताने फिरत राहिले. यातून त्यांची मैत्री घनिष्ठ होत गेली.
या मैत्रीला नात्याचा अंकुर फुटला १९८४ मध्ये, ब्रिटिश चेस चॅम्पियन स्पर्धेच्या वेळी. लागोपाठ दोन मोठय़ा स्पर्धा, दुसरी लॉईड्स बॅंकेची स्पर्धा, खेळायच्या असल्याने तीन आठवडय़ांचा दौरा होता. सरकारतर्फे फक्त जाण्या-येण्याची व्यवस्था होती. तोपर्यंत इंटरनेटचा उदय न झाल्यामुळे स्पर्धकांना स्पर्धेच्या ठिकाणी गेल्यावरच राहायची सोय करावी लागे. त्या वेळी प्रवीणच पुढाकार घेऊन सर्व व्यवस्था बघत असे. या स्पर्धेच्या दरम्यान प्रवीण, अरुण वैद्य व भाग्यश्री एकाच अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यामुळे प्रत्येक गेमच्या आधी व नंतर होणाऱ्या चर्चामधून तिला तिचा गुरू खऱ्या अर्थाने याच जागी भेटला. या दौऱ्यातच दोघांनी आयुष्याची पुढील वाटचाल जोडीने करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचं दोन्ही घरी स्वागतच झालं.
प्रवीण ठिपसे यांचा तर जन्मच मुळी बुद्धिबळासाठी झाला असावा. त्यांचे वडील डॉ. महादेव (मधू) ठिपसे हे महात्मा गांधींचे अंगरक्षक होते. स्वातंत्र्यलढय़ासाठी १० र्वष दिल्यानंतर ते डॉक्टर झाले आणि त्यांनी मुंबईत प्रॅक्टिस सुरू केली. प्रवीणला दोन भाऊ व एक बहीण. त्यांच्या आईने (कै. सुशीलाताई) आपल्या सर्व मुलांना बुद्धिबळाचं वेड लावलं. तेही इतकं की, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला ही मुलं खेळायचा आग्रह करत. मोठे बंधू अभय (उच्च न्यायालयात न्यायमूर्ती) यांना खेळाचं तांत्रिक ज्ञान अवगत होतं आणि शिकवण्याचं कौशल्यही. बुद्धिबळाचे क्लिष्ट धडे ते अत्यंत सोप्या शब्दात धाकटय़ा दोघा भावांना देत. त्यांची ही हातोटी बघून पुढे अनेक वर्षांनी महाराष्ट्र शासनाने त्यांना बुद्धिबळ प्रशिक्षणासाठीचा मानाचा ‘दादोजी कोंडदेव पुरस्कार’ देऊन गौरवलं.
आईकडून प्राथमिक धडे घेतल्यावर प्रवीणने सहा-सातव्या वर्षीच वेगवेगळ्या शालेय स्पर्धा खेळायला सुरुवात केली. मुलांना घडवण्यामागची आईची एक आठवण त्यांनी सांगितली. म्हणाले, ‘‘१९७० मध्ये मी आठवी-नववीत असताना आमच्या शाळेने आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होण्याविषयी अनास्था दाखवल्याने आईने शाळा बदलण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ती दादरच्या बालमोहन शाळेत जाऊन दादासाहेब रेगे यांना जाऊन भेटली. परिणामी १९७२-७३ आणि १९७३-७४ या दोन्ही वर्षी बुद्धिबळाचा आंतरशालेय करंडक ‘बालमोहन’कडे आला आणि त्यानंतरही पुढची तीन वर्षे सतीशने (धाकटा भाऊ) तो शाळेकडेच राखला. हाच सतीश काही वर्षांतच राष्ट्रीय सब ज्युनियर चॅम्पियन झाला.
आंतरशालेय करंडक जिंकल्यामुळे रामचंद्र सप्रे, श्रीकृष्ण साखळकर, अरुण वैद्य, सुरेश शाळिग्राम, अविनाश आपटे.. अशा महाराष्ट्रातील नामवंत खेळाडूंचं लक्ष प्रवीणने वेधून घेतलं. त्यानंतर या दिग्गजांचा खेळ बघत, त्यांच्या चर्चा ऐकत या एकलव्याची साधना सुरू झाली आणि त्याने एक-दोन वर्षांतच प्रथम राज्य व नंतर राष्ट्रीय पातळीवर खेळायला सुरुवात केली.
संपूर्ण भारताचं लक्ष वेधून घेणारी १९७४ मधली एक घटना प्रवीणने सांगितली. बुद्धिबळावर ज्यांनी १०० च्यावर पुस्तकं लिहिली आहेत, असे रशियाचे प्रसिद्ध खेळाडू युरी अवेरबाख भारतात आले असताना, ते एकाच वेळी २५ अव्वल खेळाडूंशी खेळतील असं जाहीर करण्यात आलं. त्यांपैकी २४ खेळाडूंना त्यांनी हरवलं. त्यांची एकच मॅच बरोबरीत सुटली. तो प्रतिस्पर्धी होता प्रवीण ठिपसे, वय र्वष १५. हा खेळ बघणाऱ्या डॉ. सव्‍‌र्हेयर या महान खेळाडूने त्याच वेळी भविष्य वर्तवलं की, एक ना एक दिवस हा मुलगा ग्रॅण्डमास्टर होईल. त्यांचे हे बोल पुढे (१९९७) खरे ठरले.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच बुद्धिबळ ऑलम्पियाड, एशियन टीम चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा त्याचा सिलसिला सुरू झाला. त्याबरोबर एम.एस्सी. पदवीही मिळवली. तीही विशेष प्रावीण्यासह. बुद्धिबळातील पराक्रमामुळे १९व्या वर्षी छत्रपती पुरस्कार, २३व्या वर्षी अर्जुन पुरस्कार आणि पंचविशीच्या आतच ग्रॅण्डमास्टर किताबासाठी पहिला परफॉर्मन्स असा त्याच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला.
१९८५मध्ये प्रवीण आणि भाग्यश्रीने विवाहाचा निर्णय घेतला तेव्हा दोघांचाही खेळ ऐन बहरात होता. याच काळात तिनेही एशियन चॅम्पियनशिप व कॉमनवेल्थ स्पर्धावर आपली विजयी मोहर उमटवली. या चॅम्पियन्सचं लग्नही त्यांच्या लौकिकाला साजेशा थाटामाटात झालं. लग्नपत्रिकाही बुद्धिबळाच्या पटावर एका बाजूला राजा आणि दुसऱ्या बाजूला राणी.. अशी आगळी वेगळी. १९८७ साली सांगलीमध्ये संपन्न झालेल्या या विवाहसोहळ्याला वसंतदादा पाटील (तेव्हा ते राजस्थानचे राज्यपाल होते), सांगली संस्थानच्या राजमाता पद्मिनीराजे पटवर्धन, क्रीडामंत्री अशोक पाटील असे अनेक उच्चपदस्थ आवर्जून उपस्थित होते. त्याच वर्षी भाग्यश्रीला पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि पाठोपाठ अर्जुन अवॉर्ड. तिला ‘अर्जुन’ मिळाल्याची आणि ‘प्रवीणने राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकले’ अशा दोन्ही बातम्या एकाच वेळी दूरदर्शनच्या पडद्यावर (हेडलाइन्स) झळकल्या, तो दोघांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण.
या नेत्रदीपक कामगिरीबद्दल भाग्यश्रीला आय.डी.बी.आय. बँकेकडून नोकरीसाठी आमंत्रण आलं. प्रवीणला तर युनियन बँकेने आधीच सामावून घेतलं होतं. सांगलीसारख्या शांत गावात लाडाकोडात वाढलेल्या भाग्यश्रीचं आयुष्य लग्नानंतर एकदम बदललं. एकत्र कुटुंबात सामावून जाताना तिने स्वत:मध्ये जे बदल केले त्याबद्दल प्रवीणला नेहमीच कौतुक वाटतं.
लग्नानंतर मुलाचा कौस्तुभचा जन्म होईपर्यंत दोघांनी सर्व टूर्नामेंट्स खेळले. एकत्र राहून केलेल्या या सरावाचा त्यांना खूप फायदा झाला. एकमेकांच्या खेळाचं विश्लेषण करणं सोपं झालं. हा त्यांच्या दाम्पत्य जीवनातील सुवर्णकाळ. मात्र कौस्तुभच्या येण्यानंतर भाग्यश्रीच्या घोडदौडीला काहीशी खीळ बसली. तरीही तो ७-८ वर्षांचा होईपर्यंत त्याला आजोळी सांगलीला सोडून किंवा आजीला इकडे बोलवून तिचं बुद्धिबळ खेळणं सुरू होतं. लग्नानंतर ती १९ र्वष भारतीय संघातून खेळत होती. एकूण शंभर आंतरराष्ट्रीय सामन्यांत तिने भारताचं प्रतिनिधित्व केलंय. (आणि प्रवीणने दीडशे सामने) मात्र कौस्तुभ आठवीत गेल्यापासून तिच्यातल्या आईने स्पर्धेत भाग घेणं कमी केलं. ग्रँडमास्टरचे तीन नॉर्म पूर्ण होऊनही रेटिंगअभावी ती या किताबापासून लांब राहिली याचं दु:ख तिच्यापेक्षाही जास्त प्रवीणला होतं.
मात्र स्पर्धेत भाग घेतला नाही तरी बुद्धिबळ खेळल्याशिवाय (ऑनलाइन) तिचा एकही दिवस जात नाही. कौस्तुभने आईच्या बुद्धिबळाच्या पॅशनविषयी एक किस्सा सांगितला.. २०१२च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी विश्वनाथन आनंदला आव्हान देण्यासाठी नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन आला होता. निर्णायक खेळी सुरू होती. आनंद हरत चालला होता. ते बघताना (ऑनलाइन) आईच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं..’ मात्र आईचं हे समर्पण आपल्यात नाही हे तो कबूल करतो. वकिलीची सनद घेतलेला कौस्तुभ एक हौशी बुद्धिबळपटू आहे. पण केव्हा ना केव्हा आईला ‘हरवण्याची’ मनीषा बाळगून आहे.
प्रवीण ठिपसे यांचा खेळ व नोकरी दोन्ही हातात हात घालून सुरू आहे. गेल्याच वर्षी त्यांनी दिल्लीतील डॉ. हेडगेवार मेमोरियल ट्रॉफी ही खुली स्पर्धा जिंकली.
या गॅ्रन्डमास्टरच्या हाताखाली निशा मेहता, सौमया स्वामिनाथन, कृत्तिका नाडीग आणि भाग्यश्री असे चार राष्ट्रीय खेळाडू तर ललित बाबू (आंध्र), जी. रोहित (हैदराबाद), अंकित राजपारा (गुजराथ) व एस. एल. नारायणन (केरळ) असे चार ग्रॅण्डमास्टर घडलेत. त्यांच्या ‘ठिपसे स्कूल ऑफ चेस’मध्ये वैयक्तिक वा ग्रुपमधून प्रशिक्षण दिलं जातं. प्रवीणनाही मोठय़ा भावाप्रमाणे शासनाने दादोजी कोंडदेव पुरस्कार देऊन गौरवलंय. या पतीपत्नीना मिळालेल्या पुरस्कारांनी त्यांची एक पूर्ण खोलीच भरून गेलीय.
भाग्यश्री म्हणाली, ‘‘आमच्या घरात बुद्धिबळाचीच हवा वाहते. प्रेमाचा विषयही तोच आणि वादाचाही तोच. मी इंटरनेटवर खेळत असताना प्रवीण आसपास असतील तर तेही खेळात डोकं घालतात. असं कर.. तसं कर सुचवत राहतात. कधी कधी तर आम्ही दोघं रात्ररात्र जागून सामने बघतो. नवनवीन गोष्टी शिकत राहतो.’’
प्रवीणनी सांगितलं की, ‘‘नव्वद मिनिटांच्या फुटबॉलच्या खेळाला किंवा बॉक्सिंगच्या एका मॅचला जेवढी एनर्जी वापरली जाते तेवढय़ाच कॅलरी बुद्धिबळाच्या एका डावात खर्च होतात. बुद्धीची कसोटी जोखणारे हे सामने खूप दिवस चालतात. एका पाठोपाठ दुसरा गेम असतो. यासाठी नैतिक बळ लागतं. लाइफ पार्टनर बुद्धिबळपटू असेल तर हा सपोर्ट अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतो. याच बळावर आम्ही लंडनमधली फॅमिली चॅम्पियनशिप जिंकली. आमच्या आजवरच्या यशाचं श्रेयही बहुधा हेच असावं..’’

संपर्क –
भाग्यश्री ठिपसे
९९२०९९४२१८
ई मेल – pravinthipsay@gmail.com
waglesampada@gmail.com