ख्रिश्चनधर्मीय मॅथ्यू आणि मराठमोळ्या कुटुंबातील लीना ओक यांची गाठ पडली ती एका प्रशिक्षण शिबिरात. एकत्र आल्यानंतर दोघांनीही आपापल्या नोकरी सांभाळून ‘व्हिक्टरी ज्यूदो क्लब’च्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणींना स्वसंरक्षणाचे धडे दिलेत. त्यांचे अनेक विद्यार्थी आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामधून चमकत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भानही या गुरुद्वयीनं विकसित केलंय.

धकाधकीचा मामला। कैसा घडे अशक्ताला।

नाना बुद्धी शक्ताला। म्हणोनी सिकवाव्या।।

‘विद्यार्थ्यांचे रामदास’ या सुनील चिंचोलकरांनी संपादन केलेल्या पुस्तकातील ही ओवी. मुलांच्या दिनचर्येत व्यायाम, खेळ..इत्यादींचं महत्त्व सांगणारा समर्थाचा हा उपदेश डोंबिवलीतील के. अँटोनी मॅथ्यू व लीना ओक-मॅथ्यू या जोडीने तंतोतंत आचरणात आणलाय. ‘व्हिक्टरी ज्युदो क्लब’ या आपल्या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गेल्या तीन दशकांत हजारो विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणासाठी सक्षम केलंय. त्यांचे अनेक विद्यार्थी आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामधून चमकत आहेत. एवढंच नव्हे तर त्यांच्याकडे लहानपणापासून ज्यूदो कराटेचं शिक्षण घेणाऱ्या काही शिष्योत्तमांनी आपल्या गुरुजनांचा वारसा पुढे चालवत ‘व्हिक्टरी ज्यूदो क्लब’ची धुरा स्वतच्या खांद्यावर घेतलीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅथ्यू व लीना यांनी आपल्या विद्यार्थ्यांचं सक्षमीकरण निव्वळ वैयक्तिक परिघापुरतं ठेवलेलं नाही तर गेली अनेक र्वष डोंबिवलीतील सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी आपल्या टीमला पोलिसांच्या बरोबरीने उभं करून त्यांच्यामधील सामाजिक भानही या गुरुद्वयीनं विकसित केलंय.

या दोघांकडून काही तरी भरीव काम घडावं अशी त्या विधात्याचीच इच्छा असणार म्हणूनच तर केरळमध्ये राहणारा ख्रिश्चनधर्मीय मॅथ्यू आणि  डोंबिवलीतील कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबातील मराठमोळ्या लीना वासुदेव ओक यांची त्याने गाठ घालून दिली. मॅथ्यू यांचा केरळ ते मुंबई प्रवास असा झाला.. बी. एस्सी. झाल्यावर मामाबरोबर मुंबई बघायला आलेले मॅथ्यू या नगरीच्या प्रेमात पडले आणि इथेच रेंगाळले. केरळमधील कलरी पयट्टू ही पारंपरिक मार्शल आर्ट ते शिकले. शिवाय कॉलेज जीवनात एन.सी.सी.मध्ये सहभागी झाल्याने साहसातील खुमारीही कळली होती. त्यामुळे साहजिकच त्यांचे पाय होमगार्डकडे वळले. त्याच सुमारास मुंबईचे पोलीस आयुक्त व होमगार्डचे तत्कालीन महासंचालक कसबेकर यांनी होमगार्ड्सना ज्युदो- कराटेचं प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. मॅथ्यूंना या खेळाची गोडी लागली. अल्पावधीतच त्यांनी या कलेत प्रावीण्य मिळवलं. बरोबरीने फायर फायटिंग व रेस्क्यू आणि रायफल शूटिंग यातही मास्टरी संपादन केली. कालांतराने त्यांनी एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी सुरू केली आणि मुंबईत बस्तान बसवलं. संध्याकाळच्या वेळात त्यांनी धारावीतील श्रमिक विद्यापीठ या सामाजिक संस्थेतील मुलांना कराटे शिकवायला सुरुवात केली.

त्यांनी धारावीत सलग चार वर्षे थोडय़ाथोडक्या नव्हे ५०० मुलांना ज्यूदो-कराटेचे धडे दिलेत. तेही कोणताही मोबदला न घेता. मॅथ्यूसरांच्या संस्कारांमुळे गुन्हेगारीकडे वळू पाहणारी इथली काही मुलं सन्मार्गाला लागली याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. विनामूल्य प्रशिक्षण देण्याचा त्यांचा हा सिलसिला पुढे सात वर्षे सुरू होता. (१९८५ ते १९९२) ज्यामध्ये १९८५ पासून लीनाही सहभागी झाली. दोघांची ओळख झाली तीही एका प्रशिक्षण वर्गातच. राष्ट्र सेवा समितीच्या वतीने कल्याणमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या १०० मुलींच्या कराटे शिक्षणाची जबाबदारी मॅथ्यूसरांकडे सोपवण्यात आली आणि लीना वासुदेव ओक ही सरांची विद्यार्थिनी शिकता शिकता त्यांची जीवनसाथी बनली. लीना ही डोंबिवलीच्या टिळकनगर विद्यामंदिरची चतुरस्र विद्यार्थिनी. अभ्यासाबरोबर खेळातही अग्रेसर. शिवाय गाणं, निवेदन या कलांतही निपुण. लग्नानंतर बी.पी.एड्. करून याच शाळेत अध्यापिका म्हणून रुजू झाली. (आता शाळेच्या सुपरवायझरपदावर) दोघांनी दिवसभर आपापल्या ठिकाणी नोकरी व संध्याकाळी डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, आंबिवली या ठिकाणी कराटेचे वर्ग असं सहजीवन सुरू केलं.

कराटेला शासनाची मान्यता नाही, हे लक्षात आल्यावर या दोघांनी ज्युदो या ऑलिम्पिक क्रीडा प्रकारावर लक्ष केंद्रित करून त्यात ब्लॅक बेल्ट संपादन केला आणि मग सुरू झाली त्यांच्या ‘व्हिक्टरी ज्युदो क्लब’ची घोडदौड! आज डोंबिवली परिसरात ‘व्हिक्टरी ज्युदो क्लब’च्या झेंडय़ाखाली जवळजवळ हजारभर मुलं ज्युदोचं प्रशिक्षण घेत आहेत. त्याबरोबर ज्युदोशी साधम्र्य असणाऱ्या कुराश या खेळातही प्रगती करत आहेत. मॅथ्यूसर म्हणाले, ‘‘कुराश या उझबेकिस्तानच्या खेळाला तीन ते चार हजार वर्षांची परंपरा आहे. या खेळांच्या सर्व पातळीवर (राज्यस्तरीय ते आंतरराष्ट्रीय) स्पर्धा होतात आणि प्रत्येक स्पर्धेत आमची मुलं भरपूर पदकं मिळवतात. मुंबई विद्यापीठाच्या ज्यूदो टिममधून आमचे चार मोहरे खेळत आहेत. आधी कराटे, आता ज्युदो व कुराश या तिन्ही खेळांतील आमच्या गुणवान खेळाडूंची आकडेवारी सांगायची तर.. आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले खेळाडू २२, राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्यांची संख्या ५३, राज्यस्तरीय खेळाडू २५०च्या आसपास आणि जिल्हा स्तरावर खेळणाऱ्यांची तर गणतीच नाही..’’

ज्युदोमध्ये एशियन गोल्ड मेडलिस्ट व कराटे आणि कुराशमध्ये इंटरनॅशनल मेडलिस्ट असलेली पूर्वा ही मॅथ्यू व लीना यांची लेक म्हणजे ‘व्हिक्टरी ज्युदो क्लब’चा कणा आहे. २४ व्या वर्षीच तिच्या नावावर अनेक विक्रम जमा आहेत. २००१ मध्ये बँकॉक येथे झालेल्या कराटेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तर मॅथ्यू मायलेकींनी आपापल्या वयोगटांत व वजनीगटात सुवर्णपदक मिळवून इतिहास घडवला. त्यांचा ११ वीत शिकणारा मुलगा नील हा देखील ज्युदोमधील राज्यस्तरीय सुवर्णपदक विजेता आहे.

पूर्वीप्रमाणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे आशुतोष लोकरे, प्रवेंद्र सिंग, तरुण पावळे, मानसी पोळ, सुनंदा नरसिंहन, सिद्धेश विचारे, प्रदीप नवघरे हे ‘व्हिक्टरी ज्युदो क्लब’चे विद्यार्थी आता इथले कोच बनलेत. मॅथ्यूसर व मॅडमच्या मुशीत घडल्याने खेळाबरोबर शिस्त, व्यवस्थापन, संवादशास्त्र, संपर्ककला.. अशी कौशल्येही त्यांच्या अंगी मुरली आहेत. त्यामुळे क्लबमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यापासून स्पर्धेला नेण्या-आणण्यापर्यंत सर्व जबाबदाऱ्या ही तरुण मुलं आता स्वतंत्रपणे निभावतात. अर्थात सर / मॅडमचं मार्गदर्शन असतंच.

केवळ पदकं मिळवूनच नव्हे तर सामाजिक योगदानामुळे ‘व्हिक्टरी ज्युदो क्लब’च्या मुलांनी डोंबिवलीकरांची मनं जिंकलीयेत. पहिल्या नववर्ष स्वागतयात्रेपासून सुधीर फडके अमृत महोत्सव, आशा भोसले संगीत रजनी.. अशा गर्दी खेचणाऱ्या सर्व कार्यक्रमांत पोलिसांना सुरक्षाव्यवस्थेत मदत करण्यात मॅथ्यूसरांचे विद्यार्थी नेहमी आघाडीवर असतात.

त्यांना मॅथ्यू यांनीही महाविद्यालयं, महिला मंडळं, कंपन्या, सरकारी कार्यालयं.. अशा अनेक ठिकाणी वेळोवेळी मुलींसाठी व स्त्रियांसाठी स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिकं दाखवून डोंबिवलीच्या सामाजिक जीवनावर आपला स्वतंत्र ठसा उमटवलाय. स्वयंसिद्धा (महाराष्ट्र शासनाचा महिला सुरक्षा उपक्रम) अंतर्गत ठाणे जिल्हय़ात, (खास करून ग्रामीण भागात) दिलेलं स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण व कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांना सलग दोन र्वष दिलेलं १५/१५ दिवसांचं प्रशिक्षण हा त्या जबाबदारीचा एक भाग. टिळकनगर विद्यामंदिरात १९९९ पासून सुरू झालेल्या मुलींच्या एन.सी.सी. पथकाची जबाबदारी साहजिकच मुख्याध्यापक बाजपेईसरांनी त्यांच्यावर सोपवली आणि त्यांनी ती उत्तमरीत्या निभावली.

आपलं जीवन सुखी व समृद्ध होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या पाच गुरूचं ऋ ण त्या मानतात. त्या म्हणाल्या, ‘‘आई, वडील, मॅथ्यूसर, बी.पी.एड्. कॉलेजचे प्राचार्य कानडेसर व सुरेंद्र बाजपेई यांनी दिलेल्या संस्कारांचं पाठबळ मला प्रचंड आत्मविश्वास देऊन गेलं.’’

खेळाप्रमाणे शेतीचीही आवड असणारे मॅथ्यूसर आता सकाळ-संध्याकाळचे वर्ग सांभाळून मधल्या वेळात वांगणीला मोगऱ्याची शेती करतात. सीझनमध्ये त्यांचा रोजचा २० ते २५ किलो मोगरा दादरच्या फूल मार्केटमध्ये जातो. म्हणाले, ‘‘माझं आयुष्यही लीनाने मोगऱ्यासारखं सुगंधित केलंय..’’

सरांच्या या वाक्याचं बोट पकडून मी पुढे पाऊल टाकलं. संपूर्णपणे वेगळ्या वातावरणात वाढलेल्या या दोघांचं अन्य सहजीवन आणि त्यांच्या आई-वडिलांच्या प्रतिक्रिया ऐकण्याची उत्सुकता मला होतीच. त्यासंबंधी छेडताच लीना मॅथ्यू भरभरून बोलल्या. म्हणाल्या, ‘‘माझे आई-वडील सुशिक्षित सुजाण, प्रगल्भ, विचारांचे. मॅथ्यूंशी लग्न करण्याचा माझा निर्धार पाहून माझ्यामागे उभे राहिले. सासरी केरळलाही माझ्या स्वयंपाकाचं, विशेषत: पुरणपोळ्यांचं कोण कौतुक! फक्त मॅथ्यूचं रोजचं मासे खाणं मला सुरवातीला जड गेलं. आता मात्र मी मासे, चिकन, मटण सगळं बनवते. सरांनीच शिकवलंय. खात मात्र नाही..’’

मॅथ्यू व लीना दोघांनीही आपला धर्म बदललेला नाही. त्यांच्या घरात जसा ख्रिसमस साजरा होतो तशी दिवाळी. मंडळी मंदिरात जातात तशीच चर्चमध्ये. देवघरात बायबल आहे तशी गीताही. मात्र त्यांनी मुलांना शाळेत घालताना फॉर्मवर कुठल्याही धर्माचं नाव लिहिलेलं नाही. त्यांना एकच धर्म माहीत आहे तो म्हणजे माणुसकी!

ज्युदो हाच श्वास व ध्यास असलेल्या या दोघांचं एक स्वप्न आहे, विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी व सरावासाठी सुसज्ज व अत्याधुनिक सोयी असलेला हॉल उभारणं! सामाजिक सहभागामुळे सुरुवातीला जाणवणारा समाजाचा छुपा विरोधही आता निवळलाय. मात्र स्वत:ला अनेक पुरस्कार मिळूनही एक खंत लीना मॅथ्यू यांच्या मनात आहेच. ती म्हणजे क्रीडा क्षेत्रात एवढं भरभक्कम योगदान देऊनही या ज्येष्ठ क्रीडाशिक्षकाला (मॅथ्यूसर) आजवर एकाही संस्थेने गौरवलेलं नाही.

ही कसर भरून निघेल ?

– लीना मॅथ्यू -९८९२५७२२१७

ईमेल- matthewleena.judo@rediffmail.com

waglesampada@gmail.com

संपदा वागळे