12 July 2020

News Flash

Healthy living: बहुगुणकारी कडुनिंब

कडुनिंबाचा आहारात वापर फक्त गुढीपाडव्यापुरताच नको

आहारातलं कडुनिंबाचं महत्त्व

गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ गुढ्या उभारण्याची परंपरा पौराणिक काळापासुन आजतागायत सुरु आहे.गुढीपाडव्याच्या निमित्ताने सकाळी शुचिर्भूत होऊन सर्वप्रथम कडुनिंबाचे सेवन करण्याचा प्रघात आहे. ही खरं म्हटलं तर एक आरोग्यपरंपरा पाडवा वसंत ऋतुमध्ये येतो. वसंताआधीच्या गार वातावरणामुळे शरीरामध्ये जमलेला कफ़ थंडीनंतर सूर्याची किरणे तिरपी व प्रखर असल्याने पातळ होऊन या दिवसांमध्ये कफ़प्रकोपाचे आजार बळावतात. हा कफ़प्रकोप टाळण्यासाठी कडू रसाचे सेवन अत्यावश्यक असते.

कफ़प्रकोपामुळे थंडीनंतर सर्दी, ताप, कफ़,खोकला, दमा, सांधे धरणे-आखडणे वगैरे कफ़विकार बळावतात. सर्दीतापाची तर साथच येते. या सर्वांचा प्रतिबंध करणे गरजेचे असते, जे कडुनिंबासारख्या कफ़ व रोगजंतुनाशक औषधाने शक्य होते. या दिवसांमध्ये सर्वत्र फ़ैलावणार्‍या साथीच्या रोगांच्या रोगजंतूंना अटकाव करण्यासाठीच तर गुढीपाडव्याला घरादारावर-गुढीवर कडुनिंबाच्या डहाळ्या बांधल्या जातात.
दुसरीकडे थंडीतल्या गोडधोड, तेलकट, तुपकट खाण्यामुळे व व्यायामाच्या अभावामुळे शरीराला आलेले जडत्व, शरीराच्या विविध जैवरासायनिक क्रियांमध्ये आलेले शिथिलत्व व स्वाभाविकरित्या दुर्बल झालेली रोगप्रतिकारशक्ती यांमुळे वसंत ऋतुमध्ये आजारी पडण्याचा धोका बळावतो. थंडीतल्या अतिअन्नसेवनामुळे व त्याला व्यायामाची-कष्टाची जोड न मिळाल्यामुळे शरीरात ’इन्सुलिन रेसिस्टन्स’ची विकृती सुरु होण्याचा किंवा असल्यास बळावण्याची भीती असते. जी मधुमेहच नव्हे तर अनेक घातक आजारांचे मूळ कारण ठरते. या सर्व विकृतींना प्रतिबंध करण्याचा सहजसोपा मार्ग आपल्या पूर्वजांनी शोधून काढला तो म्हणजे थंडीनंतर लगेचच्या वसंत ऋतुमध्ये रोज सकाळी उपाशी पोटी कडुनिंब चाटणे.

हल्ली मार्चच्या मध्यापासुनच कडक उन्हाळा सुरू हॊऊ लागला आहे, त्यामुळे त्या दिवसांमध्ये ज्यांना पित्ताचा त्रास होतो,उष्णतेचे विकार त्रस्त करतात अशा पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी कडू सांभाळून, मर्यादेत खावे.परंतु उष्मा असतानाही जे कफ़ाच्या आजारांनी त्रस्त असतात, ज्यांच्या शरीरामध्ये पाणी वाढते, अंगावर सूज असते, एकंदरच ज्यांच्या आहारामध्ये गोडधोड तेल, तूप अधिक असत. तसंच जे बैठी जीवनशैली जगतात. अशा स्थूल व कफ़प्रकृतीच्या व्यक्ती यांनी संपूर्ण वसंत ऋतुमध्ये कडू खाणे त्यांच्या हिताचे होईल. या सर्व विकृतींना कडू रस हा प्रतिबंधक आणि उपचारक आहे. आता तुमच्या लक्षात आले असेल गुढीपाडव्याला कडूनिंबाची पाने का खातात ते? तेव्हा वाचकहो, कडुनिंबाचे सेवन गुढीपाडव्यापुरते मर्यादित ठेवू नका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2017 10:45 am

Web Title: health tips in marathi healthy living benefits of kadunimba neem
Next Stories
1 Healthy Living: रात्रपाळीनंतर कसे-कधी झोपावे?
2 Healthy Living: आरोग्याला घातक मैद्याचं अर्थकारण
3 Healthy Living: लठ्ठपणा कमी करा
Just Now!
X