भारत हा एक असा देश आहे ज्याला एकीकडे संसर्गजन्य रोगांचा सामना करायचा आहे, तर दुसरीकडे असंसर्गजन्य अर्थात जीवनशैलीजन्य आजारांचा. यामधील टीबी, एड्‍स व मलेरिया हे तीन तर भारतीयांसाठी कर्दनकाळ ठरले आहेत. त्यामध्ये एड्स होण्याचा धोका रक्ताशी वा शरीराच्या आभ्यन्तर स्त्रावांशी थेट संबंध आला तर संभवतो, तर मलेरिया हा आजार मलेरियाचे जंतू वाहून नेणारा डास चावल्यामुळे असतो. याऊलट टीबीचे जंतू हवेमधून पसरतात. त्याशिवाय पाणी, अन्नपदार्थ यांमार्फत विविध संसर्गजन्य आजारांचे रोगजंतू आजार पसरवतात. मात्र संसर्गजन्य आजारांचे रोगजंतू वाहून नेण्यास आपल्या रोजच्या वापरातल्या चलनी नोटासुद्धा कारणीभूत होऊ शकतात, असे म्हटले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. मात्र काही संशोधकांच्या मते चलनी नोटा या काही विशिष्ट रोगांचे संक्रमण होण्यास साहाय्यक होऊ शकतात.

एखाद्या संसर्गजन्य रोगाने ग्रस्त व्यक्तीने हाताळलेल्या नोटांवर त्याच्या शरीरामधील रोगाचे जंतू स्थिरावले व कालांतराने (जितके दिवस ते रोगजंतू जिवंत राहू शकतात, तेवढ्या दिवसात) दुसऱ्या व्यक्तीकडून त्या नोटा हाताळल्या गेल्या तर ते रोगजंतू या दुसऱ्या व्यक्तीच्या हातांवर स्थिरावण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तवात रोगग्रस्त व्यक्तीचा नासास्त्राव, नेत्रस्त्राव, शिंक इ. शरीरस्त्रावांचा हातांशी संबंध आल्यानंतर त्याच हातांनी नोटा हाताळल्या गेल्यास त्या स्त्रावाचे सूक्ष्म बिंदू नोटांवर विसावण्याची व त्यामुळे त्या रोगजंतूंचे नोटांवर संक्रमण होण्याची शक्यता आहे.

ditch that glass of ice cold water during summer
उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पीत आहात? आजचं सोडा ही वाईट सवय, तज्ज्ञांनी सांगितले कारण…
health benefits of lauki
तुम्ही उन्हाळ्यात दर आठवड्याला दुधी खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
diy skin care prevent foot odour this summer expert tips on how to keep your feet fresh all day
उन्हाळ्यात घामामुळे पायांना दुर्गंधी येतेय? मग फॉलो करा डॉक्टरांनी सांगितलेले ‘हे’ सोपे उपाय
Health Special Does pollution cause stomach disorders
Health Special: प्रदूषणामुळे पोटाचे विकार होतात का?

सांगण्याचा मथितार्थ हाच की नोटा हाताळताना हातमोजे घालणे योग्य होईल. ते शक्य नसेल तर नोटा हाताळताना निदान नाकाला-डोळ्यांना हात लावू नका. या मार्गाने रोगजंतू सहजगत्या शरीरामध्ये शिरतात. जेव्हा जेव्हा नोटा हाताळाल तेव्हा स्वच्छ हात धुवून मगच इतर व्यवहार करा. महत्त्वाचे म्हणजे नोटा हाताळून झाल्यानंतर अन्नसेवन किंवा मुलांचे लाड करणार असाल तर कटाक्षाने काळजी घ्या. त्यातही ज्यांना आधिक्याने नोटा हाताळाव्या लागतात अशा बँक, शासकीय वा खाजगी कार्यालयांमधील कॅशियर्स, हॉटेल वा दुकानांचे काऊंटर सांभाळणारे, बस कंडक्टर्स, ट्रेन-बसची तिकिटविक्री करणारे वगैरे मंडळींनी दक्षता घ्यावी. अर्थात कमी नोटा हाताळणार्‍या घरातल्या गृहिणीला हा धोका संभवणार नाही असे नाही.

काही संशोधकांच्या मते नोटांमार्फत रोग-संक्रमण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे नोटांच्या या रोगवाहक दोषाबद्दल इतकेच म्हणता येईल की विषाची परिक्षा कशाला घेता?थोडी काळजी घेतलीत तर आरोग्याला फायदाच होईल.