20 November 2017

News Flash

Healthy Living : डायबिटीज् घेतोय अनेकांचा जीव

आपल्याला मधुमेह आहे हेच अनेकांना माहिती नाही

डॉ. अश्विन सावंत | Updated: March 16, 2017 10:00 AM

” मानवी शरीराला आतून पोखरून काढणारा आजार कोणता?” असा प्रश्न विचारला तर उत्तर येईल, ’एड्‍स’. प्रत्यक्षात मात्र एड्स हा आजार केवळ रोगप्रतिकारशक्ती कमजोर करतो, तर मधुमेह शरीरातल्या प्रत्येक अवयवाला विकल करतो. “२१व्या शतकामध्ये भारतीयांच्या अकाली मरणाला कारणीभूत होणारा रोग कोणता?” असा प्रश्न विचारला तर सहसा उत्तर येईल ,”कॅन्सर”. प्रत्यक्षात मात्र कॅन्सरमुळे जितके लोक मरतात त्यापेक्षा कितीतरी अधिक लोक मधुमेहजन्य विकृतींमुळे मृत्युमुखी पडतात.

मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत मागील ५०-६० वर्षांमध्ये बेसुमार वाढ झाली आहे. जगप्रसिद्ध ’लॅन्सेट’ या वैद्यक नियतकालिकाच्या म्हणण्यानुसार १९८० मध्ये जगामधील मधुमेहाच्या रुग्णांची संख्या जी दहा करोड ८० लाख होती, ती २०१४ मध्ये ४२० करोड झाली. यातले अर्ध्याहून अधिक रुग्ण हे भारत, चीन, अमेरिका, ब्राझिल व इंडॊनेशिया या पाच देशांमध्ये आहेत. आपल्या देशामधील मधुमेही रुग्णांच्या संख्येमध्ये झालेली भयावह वाढ नेमक्या आकड्यांमध्ये सांगायची तर १९८० मध्ये भारतामध्ये एक करोड १९ लाख लोक मधुमेहाने ग्रस्त होते, जी संख्या २०१४ मध्ये सहा करोड ४५ लाख झाली. त्यामध्येसुद्धा १९८०मध्ये पुरुषांमधील मधुमेहाचे प्रमाण जे ३.७% होते, ते जवळजवळ तिपटीने वाढून ९.१% झाले, तर स्त्रियांमध्ये मधुमेहाचे प्रमाण ४.६% होते, ते ८.३% झाले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २०१५ मधील गणनेनुसार भारतामध्ये सहा करोड ९२ लाख मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यात पुन्हा दुर्दैवाची गोष्ट ही की त्यामधील ३ करोड ६० लाख लोक असे आहेत ज्यांना आपल्याला मधुमेह आहे हे माहीतच नाही अर्थात त्यांच्या मधुमेहाचे निदान झालेले नाही व ते उपचाराशिवाय आहेत. मधुमेह(अर्थात मधुमेहजन्य विकृतींमुळे) होणारे मत्यू ३५टक्क्यांनी वाढले, असा अंदाज आहे. दुर्दैव हेच की आज मधुमेह भारतीयांच्या घराघरामध्ये घुसून मृत्युचे तांडव खेळत आहे, तरी समाजाचे डोळे काही उघडत नाहीत. २०२५ ते २०५० या कालावधीमध्ये प्रत्येक तिसरा भारतीय मधुमेहाने पिडित असेल अशी शंका आहे. हे टाळता येणार नाही काय? वास्तवात योग्य प्रयत्न केले तर अकाली मरणाला कारणीभूत होणार्‍या जीवनशैलीजन्य जीर्ण आजारांचा प्रतिबंध शक्य आहे. टक्केवारीमध्ये सांगायचे तर साधारण ८०% हृदयरोग, लकवा, मधुमेह(प्रकार२) आणि ४०% कर्करोग टाळणे शक्य आहे, आहार व जीवनशैलीमधील बदलांच्या साहाय्याने.

First Published on March 16, 2017 10:00 am

Web Title: health tips in marathi symptoms of men and women diabetes in india