X

Healthy living: जेट स्प्रे वापरताय…जरा सांभाळून!

या जेट स्प्रेचा आरोग्याला एक धोका संभवतो

वैयक्तिक स्वच्छतेसाठी आधुनिक जगामध्ये जेट स्प्रेचा उपयोग केला जाऊ लागला, ही आता नवीन गोष्ट नाही. बसल्या जागेवर करावयाची ही स्वच्छता तशी सुविधाजनक व एका दृष्टीने आरोग्यास उपकारकच म्हणायला हवी. जेट स्प्रे वापरताना हातांचा थेट स्पर्श होत नाही व त्यामुळे संभाव्य आरोग्य धोके टळतात. असे असले तरी या जेट स्प्रेचा आरोग्याला एक धोका संभवतो!

गुदभाग हे आयुर्वेदाने एक मर्म सांगितले आहे. मर्म म्हणजे शरीराचा असा भाग जो तुलनेने नाजूक आहे. ज्यावर मांसाचे वा हाडाचे आवरण नसल्याने रक्तवाहिन्या वा नसा तुलनेने त्वचेच्या जवळ व असुरक्षित असतात आणि साहजिकच तिथे इजा होणे कटाक्षाने टाळले पाहिजे. गुदासारख्या अशा नाजूक भागावर ज्याच्या नावामध्येच जेट आहे अशा स्प्रेमधून वेगाने येणार्‍या पाण्याचा फवारा आदळणे योग्य होईल काय? तो थंड पाण्याचा मारा त्या नाजूक भागाला अहितकारक होत असेल काय? तशी शक्यता आहे व तसे अनुभवही आहेत.

त्यातही ज्या व्यक्ती पित्त प्रकृतीच्या अर्थात कोमल शरीराच्या असतात, ज्यांच्या सर्व अवयवांमध्ये तुलनेने उष्ण रक्ताचा संचार अधिक असतो त्यांना हा जेट स्प्रेचा फ़वारा तिथल्या लहानशा रक्तवाहिन्यांना इजा करण्याची व गुदभागी सूज निर्माण करण्याची शक्यता असते; तर वातप्रकृतीच्या कृश-सडसडीत शरीराच्या मंडळींमध्ये गुदभागी जात्याच असणारा थंडावा व कोरडेपणा थंड पाण्याच्या वेगवान फवार्‍यामुळे अधिकच वाढून गुदविकारांना कारणीभूत होऊ शकतो.

सहसा चांगल्या दर्जाचा जेट स्प्रे नवीन असतो, तोवर त्यामधून पाण्याचा फवारा हवा तसा व्यवस्थित येत असतो. मात्र कालांतराने जेट स्प्रेची काही छिद्रे मातीच्या सूक्ष्म कणांनी वगैरे बुजतात, तेव्हा पाण्याचा फवारा योग्य येत नाहीये, या विचाराने तुम्ही पाण्याचा वेग वाढवता .तेव्हा आहेत त्या छिद्रांमधून पाणी अत्यधिक वेगाने येऊन तुमच्या गुदभागावर आदळते. काही काही जेट स्प्रे तर गुदावर असा तीक्ष्ण मारा करतात की पाणी असुनही ते टोचते. असे वारंवार होत राहिले तर गुदाला इजा होऊन तिथे सूज येणे, तिथल्या लहानशा शिरा फुगून वर येणे(पाईल्स), त्या शिरा फुटून त्यामधून रक्तस्त्राव होणे, गुदभाग थंड व कोरडा होऊन त्याला चिरा पडणे( फिशर्स) असे त्रास संभवतात.

वाचा- Healthy Living : डायबिटीज् घेतोय अनेकांचा जीव

२१व्या शतकामध्ये तुम्हाआम्हांला त्रस्त करणार्‍या गुदविकारांमागे गार पाण्याचा वेगवान स्पर्श हे सुद्धा कारण असू शकते, हे लिहीले आहे, ईसवीसनापूर्वी निदान १५०० वर्षे इतक्या प्राचीन काळामध्ये लिहिलेल्या सुश्रुत संहितेमध्ये. तुम्ही म्हणाल मग काय जेट स्प्रेचा उपयोग बंद करु?नाही, थोडी काळजी घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेट स्प्रेमधून बाहेर पडणारे पाणी हलक्या वेगाने येईल, जेणेकरुन हळूवारपणे गुदाची स्वच्छता होईल अशी योजना करा. जेट स्प्रेची दर महिन्याला स्वच्छता करुन त्याची छिद्रे बुजू देऊ नका. जेट स्प्रेमधून कोमट पाणी आले तर उत्तम, नाहीच तर आठवड्यातून एकदा कोमट पाण्यात बसुन शेक घ्या. गुदभागाला रात्री झोपताना तेल, तूप, लोणी वगैरे एखादा स्नेह लावा. भल्याभल्यांना रडवणार्‍या गुदविकाराला प्रतिबंध करण्यासाठी हे उपाय पुरेसे आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने दिलेल्या एखाद्या सुविधेचा आपण जेव्हा जेव्हा आनंद घेतो,तेव्हा तेव्हा त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोच का हो?

First Published on: March 20, 2017 10:41 am
Outbrain

Show comments