17 August 2019

News Flash

अति पाणी प्यायल्यानेही प्रकृतीला धोका

योग्य प्रमाणात पुरेसं पाणी पिणं आवश्यक

पाणी प्या पण योग्य प्रमाणात

मागील काही वर्षांपासुन “भरपूर पाणी प्या” असा एक ढोबळ सल्ला आधुनिक आहारतज्ज्ञ देतात आणि लोकसुद्धा साधकबाधक विचार न करता त्याचे पालन करतात.पोषणाबाबतचा एखादा सल्ला असला म्हणजे तो सरधोपटपणे एकजात सर्वांना लागू करायचा, ही रीतच अयोग्य आहे. तहान ही एक नैसर्गिक संवदेना असल्यामुळे शरीराला पाण्याची गरज असेल तर माणसाला तहान लागणारच आणि त्यानुसार पाणी प्यायलेही जाणार.दिवसभरातून शरीराला साधारण दीड लीटर पाण्याची गरज असते, तेवढे पाणी आपण पितो व प्यायले पाहिजे. मात्र ’हायड्रेट युवर बॉडी’असे म्हणून, जेव्हा जाता येता पाणी पिण्याचा जो खुळचट सल्ला दिला जातो, तो योग्य नाही.या अति जलपानाचा शरीराच्या विविध जैवरासायनिक क्रियांवर विपरित परिणाम संभवतो काय?

याचे उत्तर १९२० साली क्षेमशर्मा नावाच्या लेखकाने लिहिलेल्या ‘क्षेमकुतूहल’ या ग्रंथामध्ये निश्चित शब्दांमध्ये सांगण्यात आले आहे. त्यामध्ये असे स्पष्टपणे म्हटले आहे की, “अत्यम्बुपानान्न् विपच्यतेऽन्नं” अर्थात् अतिप्रमाणात पाणी प्यायल्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही.
अतिजलपानाने जठरामधील,स्वादुपिंडामधील व यकृतामधील पाचक स्त्राव विरल होतात.ज्याच्या परिणामी भुकेची संवेदना कमी होण्याबरोबरच अन्नाचे पचनसुद्धा व्यवस्थित होत नाही. अन्न पचवण्यासाठी त्या पाचक स्त्रावांमध्ये जी तीव्रता हवी असते, ती गमावून बसल्याने असे पाचक स्त्राव सेवन केलेल्या अन्नाचे पचन नीट करू शकत नाहीत आणि अन्नाचे पचन व्यवस्थित नाही म्हणजे विकृतीची सुरुवात.
इथे अन्नाचे पचन म्हणताना अन्नसेवन व पोट साफ़ होणे इथपर्यंतच अर्थ मर्यादित नाही, तर सेवन केलेल्या अन्नाच्या प्रत्येक कणाचे पचन-पृथक्करण-सात्म्यीकरण-उर्जेमध्ये रुपांतर-निरोगी कोषनिर्मिती व त्याज्य घटकांचे पूर्ण विसर्जन असा व्यापक अर्थ अपेक्षित आहे.अति पाणी पिण्यामुळे अन्न पचत नसते तेव्हा यातल्या कोणत्याही पातळीवर विकृती संभवू शकते,हे लक्षात घेतले पाहिजे.जी विकृती विविध विकारांमागचे मूळ कारण बनते.

अतिजलपानाने अन्न न पचण्याचा हा मुद्दा ज्यांना मुळातच भूक कमी लागते,ज्यांना एरवीसुद्धा अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही अर्थात ज्यांचा अग्नी मंद असतो त्यांना आणि जे बैठी कामे करतात,ज्यांच्याकडून फ़ारसे परिश्रम-व्यायाम होत नाही,जे घाम गाळत नाहीत,ज्यांना सदैव गार वातावरणामध्ये राहावे लागते अशा मंडळींना विशेषकरुन लागू होतो. हे मुद्दे तर तुम्हाआम्हाला लागू होतात, मग का बरं उगाच अति जलपान करायचे?

पाणी पिताना तुमची प्रकृती,अग्नी (भूक व पचनशक्ती), तत्कालीन ऋतु, सभोवतालचे वातावरण, तुमचे कामकाजाचे स्वरूप, तुम्ही करत असलेले परिश्रम वा व्यायाम, तुम्हाला येणारा घाम, तुमचा आहार वगैरे अनेक गोष्टींचा विचार करुन; सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या तहानेनुसार कधी आणि किती पाणी प्यायचे ते ठरवा, असे मार्गदर्शन आयुर्वेद शास्त्र करते, जे सर्वार्थाने योग्य आहे.

First Published on March 22, 2017 12:19 pm

Web Title: healthy living health tips in marathi hazards of excessive water drinking