15 August 2020

News Flash

Healthy Living : दोरीच्या उड्या मारुन पोट कमी होईल का?

तुमच्या पोटाचा आकार कमी होईल असे नाही

आजकाल लोकांची पोटे आकाराने मोठी होत चालली आहेत, एकापेक्षा एक मोठी…मोठ्ठ्या पोटांची स्पर्धाच लागली आहे जणू!मोठे पोट अर्थात पोटावर वाढणारी चरबी, ही एक नाही तर अनेक आजारांना आमंत्रण देणारी असल्याने, लोक एखाद्या ब्रह्मराक्षसाप्रमाणे मोठ्ठ्या पोटाला घाबरतात. अर्थात आपल्या मोठ्‍या पोटाला ’भूषण’ समजणारेसुद्धा काही जण असतात म्हणा. पण त्यांचा विचार आज नको, जे पोट घटवण्यासाठी धडपडत असतात त्यांचा विचार करु.

पोट कमी करण्यासाठी लोक नाना प्रयत्न करत असतात. व्यायामापासून योगासनांपर्यंत आणि नृत्यापासून ॲरोबिक्स पर्यंत विविध व्यायामप्रकारांनी लोक पोट आणि आपले वजन उतरवण्याचा प्रयत करत असतात. या व्यायामामधलाच एक प्रकार म्हणजे ’दोरीउड्या’. आपल्यातल्या बहुतेकांनी लहानपणी दोरीउड्या मारलेल्या आहेत; तरी आज त्या दोरी वरुन एखादी उडी मारायची क्षणभर विचार करावा लागेल; सरावाने ते जमते म्हणा. वास्तवात दोरी उड्या हा एक चांगला व्यायाम आहे, पण काय त्यामुळे पोट उतरवण्यास मदत मिळेल? या प्रश्नाचे उत्तर घेण्यासाठी दोरीउड्यांनी शरीराला होणारे फायदे समजून घेऊ.

दोरीउड्या हा खेळाडुंसाठी एक आदर्श व्यायाम आहे. पायांची चपळता वाढवण्यासाठी, पायांच्या हालचालींमध्ये सुसूत्रता येण्यासाठी, पोटर्‍यांचे-मांड्यांचे व नितंबांचे स्नायू सुदृढ व प्रमाणबद्ध होण्यासाठी, हातांचे स्नायू सशक्त व लवचिक होण्यासाठी, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या हृदयाला सक्षम करण्यासाठी व पर्यायाने तुमचा दम वाढवण्यासाठी दोरीउड्या हा व्यायाम निश्चित उपयुक्त आहे. त्यामुळे धावपटू, टेनिस व बॅडमिंटनपटू, बॉक्सर्स, मार्शल आर्टस्‌चे खेळाडू यांना; किंबहुना कोणत्याही खेळामध्ये खेळाडूची क्षमता वाढवण्यासाठी तो उपयुक्त आहे, यात शंका नाही. इतका थकवणारा हा व्यायाम साहजिकच शरीराचे भरपूर उष्मांक जळत असला पाहिजे. साधारण १० मिनिटे दोरीउड्या केल्यानंतर १०० उष्मांक(कॅलरी) जळतात. इतके उष्मांक जळतात याचा अर्थ शरीराचे वजन सुद्धा घटणार. होय, नित्यनेमाने दोरीउड्यांचा एकदा सराव होऊन तुम्ही सकाळ-सायंकाळ दोन वेळा १० मिनिटे दोरीउड्या केल्यात तर साधारण २०० कॅलरीज जळतील आणि एक तास दोरीउड्या मारल्यामुळे सरासरी ७००हून अधिक कॅलरीज जळतात. हे प्रमाण बरेच चांगले आहे. इतके उष्मांक जळल्यामुळे शरीरामधील चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास ते साहाय्यक होईल. मात्र याचा अर्थ दोरीउड्यांमुळे तुमच्या पोटाचा आकार कमी होईल, असे काही नाही.

हा सर्वांगासाठी उपयोगी असा व्यायाम आहे, जो चरबी घटवेल ,परंतु त्यामुळे खास पोटावरचीच चरबी कमी होईल, असे म्हणता येणार नाही. पोट उतरवण्यासाठी विशेष व्यायाम व त्याला पूरक आहार यांच्या जोडगोळीने पोटाची चरबी घटवता येईल. (दोरीउड्या वा अन्य कोणताही व्यायाम सुरु करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2017 9:30 am

Web Title: healthy tips in marathi skipping rope can reduce belly fat weight loss
Next Stories
1 Healthy Living : मद्यपान करताना ‘चकणा’ का देतात ?
2 Healthy Living : सावधान! उन्हाळ्यात मेदूवडा-इडली खाणे पडू शकते महाग
3 Healthy Living : धूम्रपान सोडण्यासाठी ‘हा’ उपाय करून पाहा
Just Now!
X