पूर्वी ‘अ‍ॅसिडिटी’ म्हणजे ‘आम्लपित्त’ हे दुखणं सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही या पठडीतलं होतं! एखाद्या तरुणानं किंवा तरुणीनं ‘मला आम्लपित्त झालंय,’ अशी तक्रार केली की ‘तुम्हा तरुण मुलांना होतातच कशी ही दुखणी!,’ अशा प्रकारचं सल्लावजा व्याख्यानच ऐकावं लागत असे. आता मात्र ‘लंच स्किप झालं ना, की मला लग्गेच अ‍ॅसिडिटी होते,’ हे वाक्य रोज एकदा तरी ऐकायला मिळतं. बरं यातली बहुतेक मंडळी तरुण किंवा मध्यमवयीन असतात. जवळपास प्रत्येकानंच एकदा तरी अनुभवलेल्या या ‘जळजळी’विषयी थोडंसं..
अ‍ॅसिडिटी का होते?
* वेळी-अवेळी जेवण किंवा ‘कामाच्या धबडग्यात जेवायला वेळच मिळत नाही,’ ही सबब.
* मानसिक ताण  
* सततचे अति तिखट, तेलकट, मसालेदार जेवण
*‘एच- पायलोरी’ नावाच्या पोटातल्या जीवाणूंमुळेही अ‍ॅसिडिटी होऊ शकते.
लक्षणे कोणती?
* प्राथमिक लक्षणांमध्ये छातीत मळमळणं, आग होणं, जळजळणं, आंबट ढेकर येणं, तोंड कडू पडणं अशी लक्षणं दिसतात.
* त्रास आणखी वाढला की पोटात दुखणं, उलटय़ा होणं, मळमळही वाढणं आणि त्याच्या बरोबरीनं डोकंही दुखणं अशी लक्षणं दिसतात.
काय टाळू?.. काय करू?
* दोन जेवणांच्या मध्ये फार वेळ पोट रिकामे ठेवू नका. ठराविक वेळाने पोटात नैसर्गिकरीत्या आम्ल तयार होत असतं. हे आम्ल तयार झाल्यावर पचवण्यासाठी पोटात अन्नच नसेल तर अ‍ॅसिडिटी होते. त्यामुळे दर दोन तासांनी काहीतरी खाणे गरजेचे.
*‘जेवण ‘स्किप’ झालं,’ ही सबब तर मुळीच नको! कामात कितीही बुडालेले असलात तरी ठराविक वेळी जेवण्यासाठी वेळ काढा.
* काहींना खूप उन्हात फिरल्यानंतर किंवा खूप प्रवास केल्यानंतर अ‍ॅसिडिटी होते. अशांनी आपला त्रास ओळखून आधीच अ‍ॅसिडिटी होऊ नये याची काळजी घ्यावी. उन्हात डोकं झाकलेलं ठेवावं, प्रवासातही खाण्याच्या वेळा शक्यतो पाळण्याचा प्रयत्न करावा.
* काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यावर काहींचा अ‍ॅसिडिटीचा त्रास उफाळून येतो. त्यामुळे तिखट, मसालेदार, तेलकट आणि आंबट पदार्थ कितीही आवडत असले तरी ते थोडे जपूनच खावेत.
* आजच्या जीवनशैलीत जवळपास सर्वानाच थोडय़ाफार प्रमाणात मानसिक ताण असतो. हा ताण अ‍ॅसिडिटीच्या स्वरूपात दिसू नये यासाठी रोजचा थोडा तरी वेळ मन:शांतीसाठी ठेवावा. दिवसाची धावपळ सुरू करण्यापूर्वी काही मिनिटं डोळे मिटून शांत बसलं तरी फायदा होतो.
जळजळ होत असताना..
* आधी काहीतरी खा. हे अन्न अर्थातच तेलकट, मसालेदार नको तर थोडं सपक म्हणजे ‘ब्लांड’ चवीचं अन्न घ्या. लाह्य़ांसारखे पदार्थ चांगले.
* अ‍ॅसिडिटीत थंड आणि पाणीदार पदार्थ खाल्ल्यावर लगेच बरं वाटू लागतं. यात थंड लिंबूपाणी, कोकम सरबत, थंड दूध किंवा अगदी आईस्क्रीमही घेता येईल. लिंबू आम्लधर्मी असल्यामुळे अ‍ॅसिडिटीत लिंबूपाणी किंवा लिंबू सरबत प्यावं का, असा प्रश्न अनेकजण विचारतात. पण काही जणांना अ‍ॅसिडिटीत थंड लिंबूपाणी पिण्यानं फायदा होतो, तर काहींचा त्रास वाढतो. हे प्रत्येकाच्या प्रकृतीवर अवलंबून आहे.
* फळांच्या रसांमुळेही पोटातील आम्लाचा प्रभाव कमी व्यायला चांगली मदत होते.
* सफरचंद, कलिंगड, अननस, चिकू या फळांमध्ये आम्ल शोषून घेण्याचे चांगले गुणधर्म असतात. त्यामुळं जळजळत असताना ही फळं खाल्ली तर बरं वाटतं.
* आवळा सुपारी, आवळा कँडी आणि आवळा सरबतही उत्तम
* बेकरी पदार्थ शक्यतो टाळाच. ब्रेड खायचाच असेल तर तो भाजून खावा.
अ‍ॅसिडिटीवर औषधं किंवा सायरप घ्यावीत का?
थोडंसं जळजळायला लागलं तरी लगेच कुठलंतरी अँटासिड सायरप किंवा चघळण्याची अँटासिड गोळी घेऊन टाकतात.
पण या औषधांमध्ये पोटातल्या आम्लाला मारक ठरणारे घटक असल्यामुळे ती सारखी घेणं बरोबर नाही. अँटासिडच्या सततच्या माऱ्यामुळे पोटातल्या आम्लाची रासायनिक प्रक्रियाच बिघडून जाते. नैसर्गिक रितीनं जे आम्ल पोटात स्रवायला हवं त्याच्या स्रवणावरही परिणाम व्हायला लागतो. पोटाच्या आतल्या अस्तरावर सूज येणं, त्यावर व्रण (अल्सर) निर्माण होणं असे दुष्परिणाम कालांतराने दिसू शकतात.
त्यामुळं अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी शक्यतो नैसर्गिक उपायांवरच अवलंबून राहणं चांगलं. गोळ्या- औषधं शक्यतो नकोच.  
शब्दांकन- संपदा सोवनी