28 November 2020

News Flash

आरोग्यासाठी गुंतवणूक

दर महिन्याला केलेली गुंतवणूक व्याजाने काही वर्षांनंतर मोठय़ा शिलकीत रुपांतरित होते. हाच नियम आरोग्यबाबतही आहे. वाईट सवयी काही वर्षांनी गंभीर स्वरुप धारण करतात.

| January 10, 2015 06:43 am

दर महिन्याला केलेली गुंतवणूक व्याजाने काही वर्षांनंतर मोठय़ा शिलकीत रुपांतरित होते. हाच नियम आरोग्यबाबतही आहे. वाईट सवयी काही वर्षांनी गंभीर स्वरुप धारण करतात. हे आपल्याच वाटेला का आले, याचे उत्तर अनेकदा वर्षांनुवर्षांच्या शुल्लक वाटणाऱ्या सवयींमध्ये दडलेले असते. नवीन वर्षांत केलेले संकल्प हे मोडण्यासाठीच असतात, अशी भावना असलेल्यांसाठी हा लेखप्रपंच नाही. मात्र ज्यांना आरोग्याविषयी काळजी वाटते आणि दीर्घ व निरोगी आयुष्यासाठी प्रयत्न करण्याची प्रामाणिक भावना आहे, त्यांनी रोजच्या आयुष्यात नेमके कोणते सकारात्मक बदल करावे यासाठी ही संकल्पसिद्धी. आरोग्य ही शरीर व मनाची सर्वसमावेशक संकल्पना असल्याने याबाबतीत आचरणात आणायच्या सवयी वेगळ्या असू शकत नाहीत. फॅमिली डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ यांनी सांगितलेले बदल दैनंदिन जीवनात अंमलात आणले तर त्याचा फायदा कदाचित तातडीने दिसणार नाही, मात्र वर्षांनुवर्षे निरोगी आयुष्याचा आनंद नक्कीच मिळवता येईल.

दिवसातून एकदा तरी कच्चे फळ किंवा भाज्या खा.
अन्न शिजवल्यावर त्यातील जीवनसत्त्व व क्षार यांचे प्रमाण कमी होते. शरीराची दैनंदिन कामे करण्यासाठी या दोन्हींची अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे दिवसभरातील आहारात किमान एकदा तरी कच्चे फळ किंवा भाज्या असतील, याकडे लक्ष द्या. भाज्यांचे सॅलड किंवा काहीच नसले तर किमान कच्चा कांदा, टोमॅटो, काकडी हे तरी जेवणात अवश्य ठेवा.

हिरव्या पालेभाज्या खा
रोजच्या जेवणात पालेभाज्या हव्यातच. या भाज्या साफ करणे त्रासदायक वाटत असल्याने किंवा फारशा चविष्ट वाटत नसल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.

पुरेसे पाणी प्या
आठवणीने, नियमित वेळाने पाणी प्या. प्रत्येकाच्या शारीरिक गरजेनुसार पाण्याचे प्रमाण वेगळे असते. पण तहानच लागत नाही असे सांगून अनेकजण पाणी प्यायला विसरतात. तहानेने घसा कोरडा होण्याची वाट पाहू नका. पुरेसे पाणी हा आरोग्यमंत्र आहे.

चावून खा
भूक मारू नका तसेच जेवण समोर आल्यावर वाघ मागे लागल्याप्रमाणे ते गिळू नका. अन्न नीट चावून खावे. भात गिळून खाणारी अनेक माणसे पोटाच्या समस्यांनी त्रस्त असतात. जे जेवण तयार करण्यासाठी काही तास लागतात, ते पूर्ण आस्वाद घेऊन, शांत मनाने जेवावे.

मर्यादा घाला
तळलेले, गोड पदार्थ कितीही आनंददायक असले, तरी ते रोजच्या जेवणाचा भाग होऊ देऊ नका. जसे सणसमारंभ, त्यातला आनंद हा रोज येत नाही. त्याचप्रमाणे पंधरवडय़ातून किंवा महिन्यातून एकदा स्वतला तळलेल्या किंवा गोड पदार्थाची मेजवानी द्या. हे पदार्थ थोडय़ा प्रमाणात पूर्ण आनंदाने खा. भरपूर खाल्लय़ाने आनंद मिळत नाही तर जिभेवर चव रेंगाळत ठेवून पदार्थ चाखल्याने त्याची मजा मिळते.

जेवणाच्या वेळा
उत्तर आरोग्यासाठी जेवण, झोप आणि व्यायाम ही त्रिसूत्री आहे. प्रत्येकाच्या शरीरात जैविक घडय़ाळ असते व त्यानुसार शरीराचे काम सुरू असते. त्यामुळे आहाराच्या वेळात रोज बदल करू नये. कामाचा व्याप असल्याने दुपारचे जेवण तीन-चार वाजता घेतले जाते. ते अत्यंत चुकीचे आहे. दुपारच्या जेवणाची वेळ १२ ते २ मध्येच असावी. रात्री नऊ वाजता जेवल्यावर सकाळी आवर्जून न्याहरी घ्यावी. फक्त चहा पिणे ही न्याहरी नाही.

किमान अर्धा तास चालावे
खरे तर शरीराला वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायामाची गरज असते. मात्र किमान अर्धा तास तरी चालायलाच हवे. कितीही काम असले तरी मनाला, बुद्धीला चालना देण्यासाठीही व्यायामाची आवश्यकता असते.

झोपेचा अवधी
पुरेशी झोप हा शरीराची प्रतिकारक्षमता वाढवणारा महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येकाची झोपेची गरज वेगळी असू शकते मात्र किमान सहा तास झोप सर्वानाच आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे शारीरिक व मानसिक क्षमतेवर परिणाम होतो. सतत कमी झोप घेतल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. आजपासून दररोज किमान अर्धा तास लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला लागलीच फरक दिसून येईल.

पुरेशी विश्रांती
सर्दी, खोकला, ताप बरा होण्यासाठी आराम सर्वात महत्त्वाचा आहे. योग्य आहार, पाणी व विश्रांतीमुळे आजार आटोक्यात येतोच शिवाय त्याचा संसर्ग इतरांना होत नाही. खाडा होऊ नये यासाठी शाळा, महाविद्यालय, कार्यालये येथे जाऊन इतरांना साथ पसरवण्याचा तुम्हाला हक्क नाही.
स्वत:साठी वेळ काढा
झोपण्यापूर्वी पाच मिनिटे किंवा दिवसभरात केव्हाही स्वत:चा विचार करण्यासाठी रोज पाच मिनिटे वेळ काढा. रोजच्या कामाविषयी किंवा दुसऱ्या दिवशीच्या कामाचा विचार न करता शांतपणे बसा. कोणताही ताण मनावर न घेता आयुष्यात आतापर्यंत घडत असलेल्या घटनांकडे तटस्थपणे पाहा.

दिवसभरात मनमोकळेपणाने हसलात का..
व्हॉट्सअ‍ॅपवरून आलेल्या विनोदाला नाही तर मित्र-मैत्रिणींशी, नातलग, शेजारी, ट्रेनमधील अनोळखी.. कोणाशीतरी बोलताना दिवसभरात तुम्ही हसला आहात ना.. किंवा पुस्तक वाचताना आनंदित, उल्हसित झालात का..

कोणाला तरी हसवले का.
एखाद्यावर हसणे आणि एखाद्याला हसवणे यात खूप फरक असतो. इतरांची निंदा करणे अगदीच सोपे आहे. मात्र त्याच्या आयुष्यातील क्षण चांगला करणे हे तुमच्यासाठी अधिक आनंददायी ठरू शकते. एखाद्याला मनापासून दाद दिलीत का.. एखाद्याने न विचारता त्याचे कौतुक केलेत का.. याचा विचार करा. तुमचा
पोषाख चांगला आहे. खुशीत दिसताय, तुम्हाला भेटून ताजेतवाने वाटले.. असे बोलला
आहात का..

ताण सोडून दिला का..
रोजच्या जगण्यात अनेक ताण येत असतात. अपमान सहन करावे लागतात, क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते, अपराधी भाव मनात दाटतो. या भावना ओळखून वेळीच त्यांच्यातून बाहेर पडले नाही तर मनावरील ओझे वाढत जाते. दररोज या ओझ्यातील काही भाग मागे सोडून द्या. काहीबाबतीत काळ हाच उपाय असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 6:43 am

Web Title: an investment for health
टॅग Health It
Next Stories
1 थंडी आणि भूक
2 प्रौढ स्त्रियांच्या समस्या
3 ओठ फुटणे,पायांना भेगा पडणेअसे का होते?
Just Now!
X