News Flash

खोटे बोलण्याचा विकार!

मूल पौगंडावस्थेत गेल्यावर अचानक खोटं बोलू लागल्याचं कळलं तर?..

ज्यांच्या घरी असा प्रसंग घडतो त्या पालकांच्या जिवाला घोर लावणाऱ्या या समस्येविषयी-

लहान असताना बिनमहत्वाच्या गोष्टीही आईबाबांना सांगणारं आपलं मूल पौगंडावस्थेत गेल्यावर अचानक खोटं बोलू लागल्याचं कळलं तर?..ज्यांच्या घरी असा प्रसंग घडतो त्या पालकांच्या जिवाला घोर लावणाऱ्या या समस्येविषयी-

प्रश्न : माझा प्रश्न माझ्या बारा वर्षांच्या मुलाविषयी आहे. माझा मुलगा आशीष लहान असताना शाळेतून आल्यावर घडलेली प्रत्येक गोष्ट मला-( म्हणजे त्याच्या आईला )सांगायचा. अलीकडे तो शाळेत काय झाले, मित्रांबरोबर काय झाले यातले काहीही आम्हा आई-बाबांना कळू देईनासे झालाय. अलीकडेच तो आमच्याशी तीन-चारदा खोटे बोलला. गेल्या आठवडय़ात दोनदा त्याने बाबांकडून प्रोजेक्टसाठी साहित्य आणायला पसे मागून नेले. प्रत्यक्षात त्याच्या वर्गाला मुळी या सेमिस्टरमध्ये प्रोजेक्ट नाहीच, हे मला त्याच्या शिक्षिकेकडून कळले. आम्ही आडून आडून विचारून पाहिल्यावरही हा मुलगा काही बोलायला तयार नाही. रविवारी नेहमीप्रमाणे क्लाससाठी म्हणून तो बाहेर पडला, पण प्रत्यक्षात तो क्लासला न जाता मित्रांबरोबर दिवसभर भटकत होता. त्याच्या बाबांनीच त्याला रस्त्यावर बघितलं आणि घरी आणलं. आम्ही त्याला कधी धाकात ठेवत नाही, मग तो आमच्याशी खोटे का बोलतो हेच कळत नाही.

उत्तर : आशीष लहान असताना प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायचा हे खरोखरीच सुखद आणि आनंददायक आहे. पालक असल्याचा व मूल वाढवण्याचा आनंद देणारे हे क्षण आयुष्यभर जपून ठेवावेत असेच असतात. पण आता आपण त्याच्या सध्याच्या वयाचा विचार करू या. १२-१३ वर्षे हे वय मित्रांचे आई-वडील जास्त आदर्श वाटण्याचे, शिक्षकांमध्ये आदर्श शिक्षक ठरवता येण्याचे, ‘हिरो वरशिप’ची ‘फेज’ सुरू होण्याचे असते, पण त्याबरोबरच या वयात खोडकरपणाचीही मितीही बदलते. पुस्तकातील चित्रांना दाढिमिश्या काढणे, न आवडणाऱ्या शिक्षकांची चेष्टा करणे, वयात येण्याचा अनुभव नवीन नवीन असताना शिक्षिकांविषयी संकोच वाटावा असे विचार करू शकणे, एकमेकांना स्वत:चे ‘सिक्रेट’ सांगणे, ‘गँग’ करून एकमेकांशी लढाया धरणे अशा विविध गोष्टी होऊ शकतात. लहानपणच्या ‘लग्न अजिबात करणारच नाही, ते वाईटच असतं,’ वगैरे विचारातून बाहेर पडून संमिश्र भावना, मुलींविषयी सुप्त किंवा उघड आकर्षण वाटू लागणे या गोष्टी घडू लागतात. साहजिकच आई-वडिलांशी सगळं ‘शेअर’ करणं शक्य नसतं. इथपर्यंत सर्व सामान्य आहे.
पौगंडावस्थेचा काळ श्रावणसरींसारखा असतो. घटकेत ऊन घटकेत पाऊस! कधी गच्च मळभ येतं की निराशा आणि उदासी जणू खाऊन टाकतील! आणि कधी दुसऱ्या टोकाला जाऊन आपण जगातील सर्वोत्तम नक्कीच होऊ शकणार- ‘कोई शक?’, ‘सो व्हॉट’ अशा पद्धतीची नव्यानं सापडलेली मग्रुरीची शक्ती अनुभवायला येऊ शकते. ‘रोल मॉडेल’ या वयात आवडू लागतात. त्या आदर्शाच्या मागं धावणं ही सामान्य विकासाची पायरी आहे. म्हणून आशीषच्या बाबतीत जे चाललं आहे ते तात्पुरतं असेल (-आपण अशी आशा तर नक्कीच करूया), तर सोन्याहून पिवळं. पण जर तसं नसेल तर..? म्हणून कुटुंबाबाहेर ‘पालकांसारखं पण पालक नव्हे’ असं सुस्थिर व्यक्तिमत्त्व आजूबाजूला असणं आवश्यक ठरतं.
खोटं बोलणं, घेतलेल्या पैशांचं काय केलं हे कळू न देणं या खऱ्याखुऱ्या गंभीर गोष्टी आहेत. त्याचे आदर्श चुकीचे तर नाहीत? ही माझीपण मोठी काळजी आहे. पण याला उत्तर सहजासहजी मिळणार नाहीये. तुम्ही ज्यांना त्याचे मित्र म्हणताय ते खरे म्हणजे मित्र नव्हेत. ‘मित्राची चूक दाखवून जागेवर आणतो तो मित्र,’ ही व्याख्या धरली तर त्या अर्थाने ते केवळ चोरून मजा करणाऱ्या एका टोळीचे सभासद ठरतात. आशीषचं वागणं ‘वर्तनसमस्ये’च्या किंवा कदाचित अधिकही गंभीर आजाराकडे जाऊ शकतं. त्यातल्या त्यात नैराश्यासारखं दुखणं असेल आणि त्यामुळे तो असं वागत असेल तर तो चटकन बरा होऊ शकतो, उपचारांना प्रतिसाद देऊ शकतो. पण त्यासाठी तज्ज्ञ समुपदेशकाकडे आणि कदाचित मानसोपचारतज्ज्ञाकडेही नियमित जायला हवं हे निश्चित. नात्यातल्या कुणा समंजस आणि प्रगल्भ मोठय़ा माणसाशी त्याचं जुळत असेल तर ती मोलाची गोष्ट ठरेल. अशा व्यक्तीला उपचारांत जरूर सामावून घेऊ या.
‘आम्ही धाकात ठेवत नाही तरी तो खोटे का बोलतो,’ या प्रश्नाचे उत्तर आत्ता माझ्याकडे नाही. कारण फक्त धाकात ठेवलं तरच मुलं खोटं बोलतात असं नाही. त्याला इतरही कारणं असू शकतात. प्रसारमाध्यमं, आजूबाजूचे लोक या सगळ्यांतून जे उचलायला नको ते त्याने उचललं का, याचाही विचार करायला हवा. ज्या दोन-तीन घटनांचा तुम्ही उल्लेख केला आहे, त्यांच्या मागील प्रक्रियांचा अभ्यास केला तर आपण आशीषला नक्कीच भरीव मदत करू शकू.

-डॉ. वासुदेव परळीकर
paralikarv2010@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2015 3:49 am

Web Title: article of vasudev parlikar on student psychology
Next Stories
1 न्याहरी चुकवू नका!
2 फुकाची अस्वस्थता!
3 काळजी ‘नेत्रां’ची!
Just Now!
X