दिवाळीची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. सणासुदीला आप्तेष्टांना भेटल्यावर देण्यात येणाऱ्या भेटींमध्ये सुकामेव्याचा क्रमांक निश्चितच वरचा लागतो. त्यातही ‘नटस्’मध्ये येणारे बदाम, अक्रोड, काजू आणि पिस्ते सर्वाच्या आवडीचे! हे नटस् फक्त चवीलाच चांगले नसतात, तर त्याचे आरोग्यासाठीही फायदे आहेत. शिवाय योग्य प्रमाणात खाल्ले तर ते रोज देखील धावपळीच्या वेळी तोंडात टाकता येतील. या वेळी जाणून घेऊ सुक्यामेव्यातल्या ‘नटस्’विषयी..
बदाम, अक्रोड, पिस्ते आणि काजू या सगळ्यातच प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि तंतूमय पदार्थ देखील आहेत. मोनो-अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड (ओएलिक अ‍ॅसिड), ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे घटक या सर्व नटस्मध्ये चांगल्या प्रमाणात असतात, शिवाय त्यातले सॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण तुलनेने कमी- म्हणजे ४ ते १६ टक्के असते. यामुळेच सुक्यामेव्यातले हे नटस् योग्य प्रमाणात खाल्ले गेल्यास हृदयविकार, पित्ताषयातील खडे, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि अगदी कर्करोगातही त्यांचा फायदा होतो. अर्थात प्रत्येकाच्या प्रकृतीत फरक असल्यामुळे एखाद्या आजारादरम्यान सुकामेवा सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्यावा.
कदाचित हे खरं वाटणार नाही, पण योग्य प्रमाणात वापरल्यास हे नटस् वजन कमी करण्याच्या ‘डाएट’मध्ये सुद्धा खाता येतात. पण हा सुकामेवा वापरलेले मिठाई, केक, पेस्ट्री, आईस्क्रीम असे पदार्थ मात्र आरोग्यासाठी फारसे बरे समजले जात नाहीत. असे का, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. कारण या पदार्थामध्ये फक्त बदाम-अक्रोड निश्चितच नसतात. त्यात भरपूर प्रमाणात साखर, तुपासारखे स्निग्ध पदार्थ, मैदा, मीठ, खाद्यरंग व वास, रासायनिक ‘प्रीझव्हेटिव्हज’ हे सगळं असतं. त्यामुळे अशा पदार्थामध्ये नटस् असले तरी त्याबरोबर आरोग्यासाठी अपायकारक ठरु शकणाऱ्या अनेक गोष्टी पोटात जातात.
सकाळच्या न्याहरीच्या वेळी, मधल्या वेळी भूक लागल्यावर किंवा जेवणाचा एक अगदी छोटासा भाग म्हणून सुद्धा बदाम, अक्रोड, काजू आणि पिस्त्यापैकी काही खाता येईल. हे नटस् जसे भाजलेले, पाण्यात भिजवून ठेवलेले किंवा कच्चेही चांगले लागतात. संध्याकाळी ४ ते ६ या वेळात अनेकांना फार भूक लागते. अशा वेळी भाजलेले बदाम, काजू किंवा पिस्ते बंद मूठभर खाता येतील. हा सुकामेवा बरोबर घेऊन जाणंही सोपं. काही विशेष प्रसंगी नटस्ची पावडर करुन सूप किंवा रस्साभाजीतही घातली जाते. यातल्या काही नटस्चे तेलही उपलब्ध असते आणि ते सॅलडवर ‘ड्रेसिंग’सारखे वापरता येते. अनेक जणांना बदाम भिजवून खायचे माहीत असते. ते रात्रभर भिजवावेत आणि सकाळी उपाशीपोटी चावून खावेत. त्याचे साल काढून खाल्ले तरी चालू शकेल. बदाम पावडर दुधात घालून घेता येईल. भरपूर व्यायाम केल्यावर शक्ती देणारे प्रथिनयुक्त पेय हवे असेल तर सुक्यामेव्यातल्या विविध नटस्ची एकत्रित पावडर करुन ती गाईच्या दुधात किंवा ‘स्किम मिल्क’मध्ये घालून घ्या. ताजी फळे आणि कच्च्या भाज्यांबरोबरही नटस् चांगले लागतात. फ्रूटसॅलडमध्ये अक्रोडचे तुकडे घातल्यास लागतंही छान आणि त्याचे पोषणमूल्यही वाढतं. पिस्ता हा कच्चाच धान्यांबरोबर खाल्ल्यास चांगले. कुरमुरे किंवा पोह्य़ांच्या चिवडय़ात किंवा गहू, राजगिरा वा बाजरीच्या लाह्य़ांमध्ये थोडे पिस्ते घालून पहा.
शब्दांकन- संपदा सोवनी
डॉ. रत्नाराजे थर
ratna.thar@gmail.com