News Flash

तरतरी.. टाळलेलीच बरी!

एखादं पेय प्यायल्या-प्यायल्या व्यक्तीला पंख फुटले आणि ती चक्क हवेत उडू लागली तर?..मजेशीर वाटणारी ही कल्पना टीव्हीवर एका पेयाच्या जाहिरातीत बघायला मिळते.

| September 23, 2014 06:42 am

तरतरी.. टाळलेलीच बरी!

एखादं पेय प्यायल्या-प्यायल्या व्यक्तीला पंख फुटले आणि ती चक्क हवेत उडू लागली तर?..मजेशीर वाटणारी ही कल्पना टीव्हीवर एका पेयाच्या जाहिरातीत बघायला मिळते. ‘इन्स्टंट’ तरतरी देण्याचा दावा करणारी ही पेयं म्हणजे ‘कॅफिनेटेड एनर्जी ड्रिंक’. गेल्या काही वर्षांत बाजारात सॉफ्ट ड्रिंकबरोबरच या कॅफिनेटेड पेयांनीही अमाप लोकप्रियता मिळवली आहे. शॉपिंग मॉलपासून नाक्यावरच्या किराणा दुकानापर्यंत सगळीकडे ही पेय अगदी सहज मिळतात. कॅफिनेटेड एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी कितपत सुरक्षित आहेत यावर वाद आहे. या पेयांच्या कॅनवर त्यांच्या सेवनाबद्दल काही सूचना लिहिलेल्या असतात खऱ्या; पण पेय पिणाऱ्यांकडून त्या पाळल्या जातात का यावरही मोठं प्रश्नचिन्ह आहे.
‘कॅफिन’ हा शब्द कॉफीची आठवण करून देतो. कॉफी, चहा आणि अगदी चॉकलेटमध्येही कॅफिन असतंच. पण हे कॅफिन नैसर्गिक स्वरूपात असतं. सॉफ्ट ड्रिंकसारख्या भरपूर साखर असलेल्या पेयात कृत्रिमरीत्या कॅफिन आणि आणखी काही घटक मिसळल्यावर जे तयार होतं ते ‘कॅफिनेटेड एनर्जी ड्रिंक’. या पेयांच्या जाहिरातींमध्ये ती त्वरित तरतरी आणणारी, दम (स्टॅमिना) टिकवणारी असल्याचं सांगितलं जातं. ते काही प्रमाणात खरंही आहे. ही ‘इन्स्टंट’ तरतरी कशी मिळते ते पाहू या-
कॅफिनेटेड पेय प्यायल्यावर त्यातलं कॅफिन मेंदूतल्या ‘अ‍ॅडेनोसिन’ या द्रव्याचा प्रभाव कमी करतं. अ‍ॅडेनोसिन हे द्रव्य झोपेशी संबंधित आहे. त्याचा प्रभाव कमी झाला, की शरीरातील ‘पिटय़ुटरी ग्रंथी’ ‘अ‍ॅड्रेनाइल’ या संप्रेरकाचं स्रवण करायला सुरुवात करते. ‘अ‍ॅड्रेनाइल’ हृदयाचे ठोके वाढवतं, डोळ्यांची बुब्बुळं देखील विस्फारली जातात. हे संप्रेरक यकृताला रक्तात अधिक साखर सोडण्याचा संदेश देतं. शरीरात वेगानं घडणाऱ्या या प्रक्रियांमुळे झटकन तरतरी आल्यासारखं वाटतं. तरतरी आणणारं हे पेय वाईट का असा प्रश्न पडला ना? इथे मुद्दा येतो अतिसेवनाचा.

किती प्रमाणात प्यावे याचा विसर
ही एनर्जी ड्रिंक विशेषत: तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. पण त्यांचे शरीरासाठी सुरक्षित प्रमाण काय आणि ठरावीक वेळात किती पेय प्यायले तर नुकसान होणार नाही या दोन गोष्टी मात्र लक्षात घेतल्या जात नाहीत. पोटाच्या विकारांचे तज्ज्ञ डॉ. संजय कोलते म्हणाले, ‘‘एनर्जी ड्रिंक थोडय़ा प्रमाणात घेतल्यावर तरतरी येत असली, तरी ती अतिप्रमाणात किंवा थोडय़ा वेळात अति प्रमाणात प्यायल्यास त्यांचा हृदयावर विपरीत परिणाम दिसू शकतो. विशेष म्हणजे हा दुष्पपरिणामही तितकाच पटकन जाणवतो. अशा परिस्थितीत रक्तदाब वाढून रक्तस्राव होण्याची शक्यता असते. ही पेयं आम्लपित्त वाढवणारी असून त्यामुळे पित्ताच्या उलटय़ा होणं, पित्त उसळणं आणि अल्सरसारखे त्रासही सुरू होतात.’’
कॅफिनेटेड पेयं आणि अल्कोहोलचे मिश्रण टाळा
शरीरातील अतिरिक्त पाणी मूत्राच्या स्वरूपात बाहेर टाकण्यासाठी कॅफिन कारणीभूत ठरते. त्यामुळे कष्टाचे व्यायाम किंवा कामे करत असताना एनर्जी ड्रिंक पिणे अपायकारक ठरू शकते. एकीकडे घामामुळे दुसरीकडे कॅफिनमुळेही शरीरातले पाणी बाहेर टाकले गेल्यामुळे अतिसाराचा धोका बळावतो. कॅफिनेटेड एनर्जी ड्रिंकमध्ये अल्कोहोल मिसळून पिण्याचे प्रमाणही हल्ली वाढत असल्याचे निरीक्षण डॉ. कोलते यांनी नोंदवले. ‘अल्कोहोलिक पेय ‘डिप्रेसंट’ म्हणजे धुंदी आणणारी असतात. त्याच्या अगदी उलट कॅफिनेटेड एनर्जी ड्रिंकचा हेतू तत्काळ तरतरी आणणे हा असतो. या दोन्ही पेयांमधली समान गोष्ट म्हणजे ती दोन्हीही शरीरातील पाणी बाहेर टाकणारी आहेत. त्यामुळे पेयांच्या अशा मिश्रणाचं सेवन पूर्णत: टाळावे,’ असेही त्यांनी सांगितलं.  
एनर्जी ड्रिंक कधीच पिऊ नयेत का?
इतक्या सगळ्या दुष्परिणामांविषयी वाचल्यावर कॅफिनेटेड एनर्जी ड्रिंक्स कधीच घेऊ नयेत का, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. क्रीडावैद्यक तज्ज्ञ डॉ. राजीव शारंगपाणी म्हणाले, ‘‘एकच गोष्ट प्रत्येकाच्या तब्येतीला मानवतेच असे नाही. आपले शरीर आपल्याला जे सांगते तितका चांगला सल्ला इतर कुणीही देऊ शकत नाही. त्यामुळे जाहिरातींना न भुलता आपल्या प्रकृतीस हे पेय मानवेल का याचा विचार ते पेय पिणाऱ्याने करणे गरजेचे आहे.’’

घरगुती सरबतंही देतात तरतरी
विनाकारण कॅफिनेटेड एनर्जी ड्रिंक पिणे टाळणेच उत्तम. कॅफिन नसलेली नैसर्गिक पेयेही शरीराला तरतरी देतातच. शहाळ्याचे पाणी, भाज्यांचे किंवा फळांचे रस, लिंबू सरबत, कोकम सरबत किंवा साखर- मीठ घातलेली घरगुती सरबते, बार्लीचे पाणी हे ताजेतवाने करणारे काही नैसर्गिक पर्याय आजमावून पाहा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2014 6:42 am

Web Title: avoid energy drink
टॅग : Health It
Next Stories
1 स्त्रीबीजकोशाचा कॅन्सर (ओव्हॅरियन कॅन्सर)
2 दमा गैरसमजुतींचा आजार!
3 चायनिज खाताय? जरा जपून
Just Now!
X