News Flash

आयुर्वेद आणि पथ्यापथ्य

विशिष्ट आजारांमध्ये काही गोष्टी करणं आणि काही गोष्टी टाळणं आवश्यक असतं.

विशिष्ट आजारांमध्ये काही गोष्टी करणं आणि काही गोष्टी टाळणं आवश्यक असतं. पण नेमकं काय करायचं आणि काय टाळायचं ते आपल्याला माहीत असतंच असं नाही. म्हणूनच आपल्याला माहीत असायलाच हव्यात अशा काही गोष्टी..

प्रसन्नात्मेन्द्रियमन:
स्वस्थ इत्यभिधीयते।
आयुर्वेदाचे घोषवाक्य ‘स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम्’ व ‘आतुरस्य रोग- निवारणम्’ असे आहे. आयुर्वेदीय प्रमुख ग्रंथांत रोग झाल्यावर उपचार करण्यावर भर न देता; रोग होऊ नये; निरोगी माणसाचे स्वास्थ्य कसे टिकवता येईल; वाढवता येईल यावर भर दिलेला आहे. याकरिता आयुर्वेदातील अष्टांगसंग्रह, अष्टांगहृदय व श्रीचरकसंहिता या ग्रंथांतील सूत्रस्थान अध्याय १ ते अध्याय ७ पर्यंत स्वस्थवृत्तात या स्वरूपाचा विचार क्रमवार सांगितला आहे. दिनचर्या, ॠतुचर्या, आहारातील पातळ स्वरूपाचे पदार्थ उदा.- पाणी, दूध, मध, उसाचा रस इत्यादी व ६ व्या अध्यायात मांसाहारासकट सविस्तर आहारविचार मांडलेला आहे. याशिवाय अन्नरक्षा अध्याय, व्यायाम, निद्रा, मैथुन यांसंबंधी उपयुक्त माहिती सविस्तरपणे सांगितली आहे. नैसर्गिक वेग मल, मूत्र, वायू; भूक, निद्रा इत्यादी वेग अडविले तर काय रोग होतात व त्यांचे निवारणाचेही उपाय या स्वस्थवृत्त स्वरूपाच्या अध्यायात सांगितले आहेत. हे सर्व सांगत असताना विविध पदार्थ, व्यायाम व अन्य शरीरधर्म, शरीरास हितकर काय व अहितकर काय याचा विचार या ग्रंथांतून त्या काळानुरूप केलेला आहे. आज ५००० वर्षांनंतर या ग्रंथांतून वर्णन केलेले धान्य, फळे, पालेभाज्या, कडधान्ये यांची कदाचित नावे वा रंग, रूप बदललेले असेल पण मानवी स्वास्थ्य टिकविण्याकरिता सांगितलेले यमनियम हे मोलाचे आयुर्वेदधन आहे. उदा. पाणी प्यावे न प्यावे? पाण्याचे विविध प्रकार व त्यांचे गुणधर्म; मीठ खावे न खावे? त्यांची पांचभोतिक रचना; ताक व दही यांच्यातील परस्पर विरोध; जुना व नवा तांदूळ; अल्पायू पालेभाज्या; मलमूत्रांचे वेग अडविण्याचे दुष्परिणाम; व्यायामाचा अतिरेक सांगताना सिंह व हत्ती यांचा दाखला हे सर्व मार्गदर्शन मोठे चपखल आहे.
पथ्य व कुपथ्य हे शुद्ध वैद्य- डॉक्टरांच्या रोजच्याच व्यवहारात आवश्यक शब्द आहेत, पण त्यापेक्षा हितकर व अहितकर मानवी जीवनाला उपयुक्त व अनुपयुक्त असा विचारही पथ्यापथ्यात हवा. पथ्यापथ्य हे तात्पुरते नसावे. रोग असला तर तो मुळापासून दूर व्हावा ही अपेक्षा पथ्यापथ्य सांगताना असली पाहिजे. कारण तात्पुरता रोग बरा करण्याचे काम औषधांकडे आहे; रोग पुन्हा होऊ नये; शरीर सक्षम व्हावे; रोगप्रतिकारकशक्ती वाढावी, म्हणून आहार-विहार यावर आयुर्वेदाचा भर आहे. असे दिनचर्या,ॠतुचर्येला धरून वर्तन झाले तर माणसाचे शरीरस्वास्थ्य दीर्घकाळ टिकते. शरीरस्वास्थ्य असले तर मन स्वस्थ राहाते. मन नुसतेच स्वस्थ असून चालत नाही तर ते प्रसन्न हवे. असे शरीर, मन स्वस्थ व प्रसन्न राहिले तर आत्म्याचे बल टिकाऊ स्वरूपाचे होते. यालाच शास्त्रात, ‘स्वस्थ’ अशी भावपूर्ण व्यापक संज्ञा आहे.
इंग्रजी भाषेत रोग या शब्दाला ‘डिस-इज’ ‘डिसीज’ म्हणजे ‘नॉट अ‍ॅट ईज’ असा प्रतिशब्द आहे. हा शब्द सुटसुटीत आहे. पण या ‘ईज’ शब्दात आयुर्वेदाच्या स्वस्थ या व्यापक अर्थाच्या संज्ञेचा फारच थोडा भाग येतो. त्यामुळेच की काय अ‍ॅलोपॅथिक शास्त्रात स्वस्थवृत्त, पथ्यापथ्य यांना जवळपास काहीच स्थान नाही. याउलट हा प्रिव्हेंटिव्ह स्वरूपाच्या आग्रहाचा; पथ्यापथ्याच्या आग्रहाचा सांगावा, आयुर्वेदांत अग्रक्रम असलेला दिसेल.
पथ्ये सति गदार्तस्य
भेषजग्रहणेन किम्।
पथ्ये सति गदार्तस्य
भेषजग्रहणेन किम्।।
अर्थ :
पथ्य सांभाळले तर रुग्णाला औषध कशाला? (म्हणजे औषधे न घेताही रोग बरा होऊ शकेल.) आणि पथ्य सांभाळले नाही तर औषध कशाला? (म्हणजे औषध घेऊन काय उपयोग?) म्हणजेच औषध घेतले, पण पथ्य सांभाळले नाही तर काहीही उपयोग होणार नाही.

अग्निमांद्य अजीर्ण, गॅस, उदरवात, ढेकरा, उचकी, पोटदुखी, वायुगोळा
पथ्य :
खात्रीचे सुरक्षित साधे पाणी किंवा उकळून गार केलेले पाणी, दूध शक्यतो गाईचे व खात्रीचे असावे. रोगलक्षणे अधिक असल्यास सुंठचूर्ण किंवा आले तुकडा उकळून दूध द्यावे.
ताक, भाताची पेज, जिरे पाणी, गरम पाण्यातील लिंबूसरबत, ज्वारीची भाकरी, ताकाची कढी, बाजरी, नाचणी किंवा तांदूळ भाजून भात. नाईलाज म्हणून गहू वापरायचा असेल तर सुकी पातळ चपाती. मूग, मुगाची डाळ, नाइलाज म्हणून तूर डाळ.
सर्व पालेभाज्या व बटाटा, रताळे सोडून सर्व फळभाज्या. गोडचवीचे संत्रे, अननस, वेलची केळे, ताडफळ, गोड द्राक्षे, पपई, वाफारून सफरचंद. हिंग, लसूण, आलेयुक्त ताक. मनुका, खारीक, भात, ज्वारी व राजगिऱ्याच्या लाह्य़ा.
माफक व कोवळे ऊन, आवश्यक तेवढा हलका व्यायाम, अन्नपचन होईल एवढे श्रम, मोकळ्या हवेतील राहणी, रात्रौ जेवणानंतर १५ मिनिटे फिरणे. रात्रौ वेळेवर झोप.
कुपथ्य :
फ्रीजचे किंवा खूप गार पाणी, कोल्ड्रिंक, गार दूध, म्हशीचे कसदार दूध, दुधाचे जड पदार्थ, दही, चहापान.
गहू, नवीन तांदूळ, वाटाणा, हरभरा, मटकी, उडीद, मटार, कुळीथ, बटाटा, रताळे, कांदा, हिरव्या साळीची केळी, चिक्कू , मोसंबी, खूप मसालेदार पदार्थ, पोहे, चुरमुरे, फरसाण, मिठाई, बेकरीचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, सुकामेवा, मांसाहार.
फाजील श्रम, खूप वजन उचलणे, पंख्याखाली किंवा वातानुकूलित राहणी, ओल व कोमट हवा, बैठे काम, जागरण, दुपारी झोप, विश्रांतीचा अभाव, मानसिक अस्वास्थ्य व चिंता, फोम किंवा खूप मऊ अंथरुण पांघरूण; धूम्रपान, मद्यपान, तंबाखूचा विविध प्रकारे वापर.

आम्लपित्त, उलटी, अल्सर, पोटदुखी, पोट डब्ब होणे
पथ्य :
खात्रीचे सुरक्षित साधे व मर्यादित पाणी, किंवा उकळून गार केलेले पाणी. नारळपाण्ी, गाईचे दूध, खात्रीचे बिनसायीचे म्हशीचे दूध. तांदुळाची जिरेयुक्त पेज, कोकम सरबत.
तांदूळ भाजून भात, तांदुळाच्या पिठाची भाकरी, ज्वारी, नाचणी, साबूदाण्याची पातळपेज, भाताच्या, राजगिरा किंवा ज्वारीच्या लाह्य़ा. मूग, मुगाची डाळ. दुध्याभोपळा, पडवळ, दोडका, टिंडा, परवल, घोसाळे, तांबडा माठ, राजगिरा, कोथिंबीर, धने, गोड द्राक्षे, जुन्या बाराचे मोसंब, वेलची केळी, ताडफळ, अंजीर, नारळाचे दूध, शहाळे, गोड व मऊ दाण्याचे डाळिंब, मनुका, सुके अंजीर, केमिकलविरहित गुळाचा वापर.
माफक व्यायाम, सकाळी व रात्रौ जेवणानंतर कि मान पंधरावीस मिनिटे फिरणे, सायंकाळी लवकर व कमी जेवण, दुपारी वेळेवर जेवण. पोटाला विशेषत: आतडय़ांना ताण पडणार नाही असा व्यायाम.
कुपथ्य :
चहा, गरम पेये, फाजील गार पाणी, कृत्रिम कोल्ड्रिंक, तहान मारणे, शंकास्पद दूध, फार पातळ पदार्थ वारंवार घेणे. तहानेच्या बाहेर उगाचंच पाणी पिणे, शिळे पाणी.
बाजरी, गव्हाचा अतिरेकी वापर, वाटाणा, हरभरा, उडीद, चवळी, मटकी, मटार. मुळा, पालक, मेथी, गोवार, शेपू, शेवगा, लसूण, मिरची, पुदिना, कारळे, मोहरी, लोणेचे, पापड, व्हिनेगार, मसालेदार पदार्थ, जेवणावर जेवण, फरसाण, मिठाई, बेकरीचे पदार्थ, आंबवलेले शिळे अन्न व शंकास्पद अन्न. पपई, अननस, संत्रे, आंबा, हिरव्या सालीची केळी, काजू, बदाम, खजूर, पिस्ता, चॉकलेट, मांसाहार.
खूप उन्हातान्हांत काम, ताकदीच्या बाहेर फाजील श्रम, कोंदट व ओल असलेल्या जागेत निवास, दुपारी झोप, रात्री जागरण, आतडय़ांना ताण पडेल असे व्यायाम, फाजील पश्चिमोत्तानासन, व्यायामाचा अभाव, बैठे काम, धूम्रपान, मशेरी, मद्यपान इ. जेवणाच्या वेळा नेहमी अनियमित असणे; फाजील चिंता.

जुलाब, पोटफुगी, पोट खराब होणे, अजीर्ण, गॅसेस, पोटदुखी
पथ्य :
उकळून गार केलेले पण शिळे नसलेले पाणी. सुंठपाणी, ताजे ताक, सुंटमिश्रित ताक; आले व लसूणयुक्त ताकाची कढी; गरम पाण्यांतील लिंबूसरबत, कोकम सरबत. तांदुळाची जिरेयुक्त पातळ पेज. सूंठचूर्णयुक्त कोरी कॉफी.
जुना तांदूळ भाजून भात, तांदुळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, मुगाचे लसूणयुक्त वरण, साळीच्या लाह्य़ा. राजगिरा लाह्य़ा, लाह्य़ांचे पीठ; लाह्य़ा व ताक, कुळीथ, कुळीथ कढण (जिरे आलेयुक्त), दुध्याभोपळा, पडवळ, दोडका, घोसाळे, मुळा, गवार, डिंगऱ्या, पुदिना, आले लसूण अशी चटणी; मेथी, चकवत, शेपू इ. (पालेभाज्या काळजीपूर्वक धुवून घेणे). ताडफळ, अननस, पपई, गोड संत्रे, सफरचंद वाफारून, धने, जिरे, मिरी, आले, सुंठ, लसूण, तमालपत्र इत्यादी माफक प्रमाणात, केमिकल विरहित गूळ.
अन्नपचन होईल इतपत माफक हालचाल; सायंकाळी लवकर व कमी जेवण. रात्रौ जेवणानंतर किमान दोन हजार पावले चालणे.
कुपथ्य :
खूप पातळ पदार्थ, दूध, खवा, मलई, पेढा, बर्फी, चहा, शंकास्पद दुधाची पेये; शिळे व शंकास्पद पाणी. गहू, नवीन तांदूळ, बाजरी, मका, वाटाणा, हरभरा, मटकी, मटार, राजमा, वाल, पोहे, चुरमुरे, भणंग, मक्याची कणसे, साबुदाणा, वरई. काळजीपूर्वक न धुतलेल्या पावसाळ्यांतील पालेभाज्या; फ्लॉवर, बियांची वांगी, कांदे, बटाटा, रताळे, गाजर, टोमॅटो. आंबा, फणस, केळी, चिक्कू, मोसंबी, पेरू, बोरे, करवंदे, जांभूळ.
खूप तिखट पदार्थ, लोणचे, पापड, मिरच्या, आंबवलेले पदार्थ, इडली, डोसा, ढोकळा इ. बेकरीचे पदार्थ, मेवा-मिठाई, मांसाहार.
जेवणावर जेवण, भूक नसताना जेवण, बैठे काम, व्यायामाचा अभाव, रात्रौ उशिरा जेवण, दुपारी झोप, रात्रौ जागरण, जेवणानंतर लगेच खूप पाणी पिणे, जेवणामध्ये वारंवार पाणी पिणे, जेवणानंतर लगेच खूप लांबचा प्रवास, अतिरिक्त पेयपान, मद्यपान, धूम्रपान.
वैद्य प. य. खडीवाले वैद्य – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 1:20 am

Web Title: ayurved 6
Next Stories
1 निमित्त : बहुआयामी कांदा!
2 विचित्र सवयींचे आजार
3 रक्तवाहिन्यांमधील अडथळे आणि परिणाम
Just Now!
X