सध्याच्या तंत्रयुगात कोणतीही माहिती शोधण्यासाठी आपण हमखास इंटरनेटचा उपयोग करतो. माहितीच्या या महाजालात जीवनावश्यक गोष्टींपासून जगभरातील घडामोडींपर्यंत कोणतीही माहिती सहज व सुलभ उपलब्ध होते. आता आरोग्यविषयक माहितींसाठी विविध संकेतस्थळेही उपलब्ध आहेत. विविध डॉक्टरांची माहिती, विविध विकार, त्यांच्यावरील उपचार पद्धती, औषधे यांची माहिती या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. या आरोग्यविषयक संकेतस्थळांचा आढावा.

http://www.marathi.aarogya.com
आरोग्यविषयक अत्यंत परिपूर्ण असे हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर आजार, पर्यायी औषधे, कुटुंबाचे आरोग्य, आरोग्य संपदा, विमा, लैंगिक विकार आणि स्व मदतगट असे विभाग या संकेतस्थळावर आहे. आजार या विभागात त्वचाविकारापासून फुप्फुसाच्या विकारापर्यंत माहिती आहे. कुटुंबाचे आरोग्य या विभागात गृहिणींपासून लहान मुलांच्या विविध समस्यांचा निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोग्य विमा, वैद्यकीय संशोधन, वैद्यकीय नीतितत्त्वे आदी विषयही येथे हाताळले आहेत.

http://www.healthy-india.org
केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने २००७मध्ये तयार केलेले हे संकेतस्थळ अल्पावधीतच लोकप्रिय झाले. रोगप्रतिबंधक उपचार, विविध उपचार पद्धती, आरोग्यविषयक जीवनशैली यांची परिपूर्ण माहिती या संकेतस्थळावर आहे. मधुमेह, कर्करोग, फुप्फुसविकार, रक्तदाब, हृदयविकार, तोंडाचे आजार आदी माहिती या संकेतस्थळावर मिळते. मानसिक विकार तसेच आहारासंबंधीही उपयुक्त माहिती या संकेतस्थळावर आहे. आरोग्यविषयक आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची सुविधाही या संकेतस्थळावर आहे.

http://www.healthywomen.org
महिलांच्या विविध आजारांविषयी माहिती असणारे हे एक उपयुक्त संकेतस्थळ. महिलांची जीवनशैली, त्यांचे आहार, आरोग्यविषयक मूलमंत्र या संकेतस्थळातून देण्यात आलेला आहे. सुरक्षित व सुलभ गर्भधारणा, गर्भवती महिलांसाठी सल्लेही यात देण्यात आले आहेत. बाळांचे आरोग्य राखण्यासाठी आईने काय करायला हवे, अशी उपयुक्त माहितीही येथे आहे. महिलांच्या समस्यांचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही येथे करण्यात येते.

http://www.medscape.com
वैद्यकीय क्षेत्रातील बातम्या, चर्चा, वैद्यकीय शिक्षण यासाठी हे संकेतस्थळ अत्यंत उपयुक्त आहे. त्याशिवाय विविध विकार, महिलांच्या समस्या, शस्त्रक्रिया यांबाबतही येथे माहिती आढळते. वैद्यकीय क्षेत्रातील
विविध समस्यांचा ऊहापोह करण्याचा प्रयत्नही या संकेतस्थळावर करण्यात आलेला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील विविध माहिती, ज्ञानाचा खजिनाही
येथे उपलब्ध आहे.

http://www.maha-arogya.gov.in
हे महाराष्ट्र सरकारचे आरोग्यविषयक संकेतस्थळ आहे. राज्य सरकारचे आरोग्यविषयक कार्यक्रम, धोरणे आदींची माहिती या संकेतस्थळावर आहे. राज्य सरकारच्या विविध आरोग्यविषयक योजना व प्रकल्पांची माहितीही
या संकेतस्थळावर आहे. त्याशिवाय आजारांपासून काळजी कशी घ्याल, विविध विकारासंदर्भात उपचार पद्धती आदी संदर्भात माहितीही या संकेतस्थळावर आहे.

http://www.webmd.com
अस्थमा, पाठदुखी, कोलेस्ट्रेरोल, अ‍ॅलर्जी, डोळ्यांचे विकार आदी विविध विकारांचे निराकरण करण्याच्या उपचार पद्धती या संकेतस्थळावर आहे. शिवाय काय खावे, काय खाऊ नये, व्यायामाचे विविध प्रकार, औषधांचे दुष्परिणाम या संदर्भातही येथे माहिती आहे. लोकांच्या विविध प्रश्नांना तज्ज्ञांची उत्तरेही येथे देण्यात आली आहे. आरोग्य संदर्भातील बातम्या, लेखही या संकेतस्थळावर आहे. हे व्यावसायिक संकेतस्थळ आहे.

http://www.arogyaworld.org
‘आरोग्यवर्ल्ड’ ही बिगर संसर्गजन्य रोगांचे (एनसीडी) निराकरण करणारी एक जागतिक संस्था आहे. या संस्थेचेच हे संकेतस्थळ आहे. आरोग्यशिक्षण आणि बदलती जीवनशैली यांबाबत या संकेतस्थळावर माहिती आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी लोकांना वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन या संकेतस्थळावरून करण्यात आलेले आहे. एनसीडी म्हणजे मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, यकृताचे विकार आदी संबंधी माहिती या संकेतस्थळावर आहे. महिला, बालक, कामगार यांच्या आजारांवरही येथे ऊहापोह करण्यात आलेला आहे.

http://www.arogyavidya.net
डॉ. श्याम अष्टेकर यांनी तयार केलेले हे एक उपयुक्त संकेतस्थळ. मोफत आणि मुक्त प्राथमिक आरोग्य या संदर्भात जनजागृती करण्याचा या संकेतस्थळाचा उद्देश. मुख्य पानावर ८४ प्रकरणे दिली असून, प्रत्येक प्रकरणामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे. माहिती, छायाचित्रे, तक्ते, चित्रफिती यांचा समावेश करून हे संकेतस्थळ परिपूर्ण केले आहे. रोगनिदान मार्गदर्शक, रोगनिदान तक्ते आदींचा समावेश असून, यामध्ये त्या त्या लक्षणांशी आधारित आजारांची तुलनात्मक माहिती आहे. विविध वृत्तपत्रांतील आरोग्यविषयक लेखांचा समावेशही या संकेतस्थळावर आहे.

http://www.webmd.boots.com
हे एक व्यावसायिक संकेतस्थळ आहे. येथे पुरुषांचे आजार, महिलांचे आजार, बालकांचे आजार असे विभाग आहेत. औषधे आणि उपचार, झोपेचे महत्त्व, आहार, वजन कमी-जास्त करण्यासाठीचे उपाय, व्यायाम, गर्भधारणा आदीसंबंधी माहिती या संकेतस्थळावर आहे.

http://www.niramayaarvi.wordpress.com
या संकेतस्थळाचे बोधवाक्यच आहे, ‘सर्वे सन्तु निरामय’. याचा अर्थ आहे, ‘सर्वानी निरोगी राहावे’. हाच प्रयत्न या संकेतस्थळाद्वारे केला जातो. समाजातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांची वैद्यकीय गरज पुरविण्यासाठी असणाऱ्या वैद्यकीय योजनेची माहिती या संकेतस्थळावर आहे. गरिबांना स्वस्त दरात औषधांचा पुरवठा करण्यासाठी जनजागृती करणे हा या संकेतस्थळाचा मुख्य उद्देश. स्वस्त दरातील औषधांची यादीच या संकेतस्थळावर आहे. त्या संदर्भातील योजनांची माहितीही असून, डॉक्टर, औषधविक्रेते आणि रुग्ण यांच्यात जनजागृती करण्याचा प्रयत्न या संकेतस्थळाने केला आहे.
(टीप : या संकेतस्थळांवरील माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. त्यावर अवलंबून कोणतेही उपचार करू नयेत. कोणतेही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या संकेतस्थळांवर डॉक्टर, क्लिनिक यांची अपॉइंटमेंट घेण्याची सोय असली तरी त्याचा निर्णय वैयक्तिक पातळीवर घ्यावा. या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याला ‘लोकसत्ता’ जबाबदार राहणार नाही.)