News Flash

मनाचा तोल सावरताना..

शनिवार सकाळच्या थंडीत गरमागरम चहा घेत, खिडकीतून दूरचा डोंगर बघत जय निवांत बसला होता. शांत मन, रम्य सकाळ, निवांत क्षण

| December 21, 2013 03:53 am

शनिवार सकाळच्या थंडीत गरमागरम चहा घेत, खिडकीतून दूरचा डोंगर बघत जय निवांत बसला होता. शांत मन, रम्य सकाळ, निवांत क्षण; असा अनुभव एरवीच्या धकाधकीच्या दिवसांमध्ये त्याला क्वचितच मिळत होता. स्वत:चाच त्याला हेवा वाटत होता! विचारांशिवाय आपण, ही कल्पनाच त्याला सुखद अनुभव देणारी होती.
रस्त्यावरच्या वाहनांच्या गर्दीसारखी मनात विचारांची गर्दी होणं, हा त्याचा नित्याचाच अनुभव झाला होता. वाऱ्याची एक जोरदार झुळूक आली आणि भिंतीवरच्या कॅलेंडरची पानं फडफडली. त्यामुळे अगदी सहजच जयचं लक्ष त्या कॅलेंडरकडे गेलं. वर्ष संपायला काहीच दिवस शिल्लक असल्याची जाणीव त्याला झाली.
इतका वेळ वैचारिक शांती अनुभवत असलेल्या जयचं मन नकळत भूतकाळात गेलं आणि भूतकाळातील एकेका घटनेची आठवण होत असताना त्याच्या मनात पुन्हा एकदा विचारांची गर्दी झालीच. चांगल्या आठवणींच्या स्मृती जागृत कटू आठवणींच्या घोंघावणाऱ्या वादळामध्ये त्याचं मन अडकू लागलं. ऑफीस, घर, आई-वडील, मित्रमंडळी, नातेवाईक या सगळ्यांना सांभाळून घेताना त्याला तारेवरची कसरतच करावी लागत होती. ही कसरत करताना अनेकदा त्याचा तोलही जात होता. आपल्या धावपळीचा, दगदगीचा इतरांवर निघणारा राग, चिडचिड आणि नंतरची सारवासारव या सगळ्याला त्याला तोंड द्यावं लागत होतं. हे विचार करता- करता तो इतका गुंतून गेला की त्याच्या हातातला चहा कधीच थंड होऊन गेलाय हे त्याच्या लक्षातही आलं नाही! दिवसाची सुरूवातच त्याला उदास करून गेली होती.
जयप्रमाणे तुम्हालाही अशी निवांत सकाळ मिळाली असती तर तुम्हीही त्या क्षणांचा आस्वाद घेऊ शकला असता का? की विचारांची गर्दी तुम्हालाही अस्वस्थ करून गेली असती? जयच्या वयाचं कोणी असो; शाळेत जाणारं मूल असो अथवा समाधानानं निवृत्तीचे आयुष्य जगणारे आजीआजोबा असोत, प्रत्येकालाच वेगवेगळ्या ताणांना तोंड द्यावं लागतं. मुलांना अभ्यासाची, तरूण आणि मध्यमवयीन मंडळींना नोकरीची, पालकांना मुलांची, मुलांना वयोवृद्ध आईवडिलांची, नवऱ्याला बायकोची, बायकोला नवऱ्याची काळजी असायचीच. हीच काळजी अति झाली की मनावर त्या काळजीची काजळी पसरु लागते.
नैराश्य, ताण, चिंता, अस्वस्थता अशी कितीतरी गोष्टी मानसस्वास्थ बिघडवण्यास कारणीभूत होतात. काही मानसिक तक्रारी तात्पुरत्या टिकणाऱ्या असतात पण त्यांच्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्यांचे स्वरूप तीव्र होऊन आणखी त्रासदायक ठरू शकते हे विसरता कामा नये. मानसिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यास मनाचा तोल सावरणे सहज शक्य होऊ शकते. हे जर आपले आपल्याला करणे शक्य नसेल तर सुहृदांशी केलेली चर्चा, हितगुज, शेअरिंग आणि गरज पडली तर समुपदेशक व प्रसंगी मानसोपचार तज्ज्ञांची घेतलेली मदत आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. बदल अपरिहार्यच असतात, फक्त त्यांची स्वीकारार्हता आवश्यक असते. अशा या स्वीकारार्हतेमुळे मानसिक आणि पयार्याने शारीरिक आरोग्यही सुदृढ ठेवण्यास मदत होऊ शकते, हो ना?
मानसिक स्वास्थासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रोहन जहागीरदार यांनी काही साधे उपाय सुचवले-
*स्वत:साठी वेळ द्या
*स्वत:शी आणि स्वत:च्या भावनांशी प्रामाणिक राहा
*एखादा तरी छंद जोपासा
*स्वत:च्या भावभावनांबाबत जागरूक राहा
*मन मोकळे करण्यासाठी एक तरी व्यक्ती जवळ असू द्या

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 3:53 am

Web Title: balancing mentality
टॅग : Health It
Next Stories
1 एड्सवर लस शक्य?
2 दातांची झीज रोखणारी कँडी
3 स्वयंपाकघरातला खजिना!
Just Now!
X