25 November 2020

News Flash

बिटाच्या रसाने रक्तदाब होतो कमी

रोज एक कपभर बिटाचा रस सेवन केला तर तुमचा रक्तदाब लक्षणीय प्रमाणात कमी होतो असा दावा एका भारतीय संशोधकाने केला आहे. ज्या लोकांनी रोज ८

| April 27, 2013 02:52 am

रोज एक कपभर बिटाचा रस सेवन केला तर तुमचा रक्तदाब लक्षणीय प्रमाणात कमी होतो असा दावा एका भारतीय संशोधकाने केला आहे. ज्या लोकांनी रोज ८ औंस इतक्या प्रमाणात बिटाचा रस सेवन केला, त्यांच्यात रक्तदाब हा १० एम.एम.ने कमी झाला. परंतु हे निष्कर्ष प्राथमिक असल्याने आहारात बिटाचा समावेश केल्याने नेहमीच असा फायदा होतो असे म्हणता येत नाही. ‘द लंडन मेडिकल स्कूल’ येथील प्राध्यापक व या शोधनिबंधाच्या लेखिका अमृता अहलुवालिया यांनी असे म्हटले आहे, की नायट्रेटचा जास्त अंश असलेल्या पालेभाज्या किंवा बीट यांच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य टिकून राहण्यास मदत होऊ शकेल. बीटरूट रसात ०.२ ग्रॅम इतके नायट्रेट असते. इतक्या प्रमाणात हे भांडेभर लेटय़ूस व २ बीटरूटमध्ये सापडते. आपल्या शरीरात या नायट्रेटचे रूपांतर नायट्राइटमध्ये होते व नंतर त्यापासून नायट्रिक ऑक्साईड बनते. नायट्रिक ऑक्साईड हा असा वायू आहे जो रक्तवाहिन्या रुंद करून रक्तप्रवाह सुरळीत ठेवतो. हा परिणाम साधण्यासाठी फार थोडय़ा नायट्रेटची शरीराला गरज असते. ज्यांचे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर (रक्तदाब) १४० ते १५९ मि.मी. आहे, अशा आठ महिला व सात पुरुषांवर बिटाच्या रसाचा प्रयोग करण्यात आला. हे सर्व जण रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे घेत नव्हते. त्यांना २५० मि.ली. बीटचा रस व कमी नायट्रेट असलेले पाणी देण्यात आले. त्यानंतर २४ तासांत निरीक्षणे नोंदवण्यात आली. ज्यांना पाणी दिले होते त्यांच्या तुलनेत बिटाचा रस घेतलेल्या व्यक्तींचा सिस्टॉलिक व डायस्टॉलिक रक्तदाब कमी झालेला दिसला. नायट्रेटचे प्रमाण २४ तास टिकून राहिले. हे संशोधन अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या ‘हायपर टेन्शन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

बाळ रडतंय.. कडेवर घेऊन फिरवून आणा त्याला.
मूल रडत असेल तर त्याचा त्रागा न करता त्याला प्रेमभराने उचलून घेतले तर त्याचे रडणे थांबते, एवढेच नव्हे तर त्याचे वाढलेले हृदयाचे ठोकेही पुन्हा कमी होतात असे अभ्यासात दिसून आले आहे. जेव्हा आई मुलाला कडेवर घेऊन हिंडते, तेव्हा ते मूल खूपच आनंदात असते ते रडत नाही, उलट त्याला सुखाचा ठेवा प्राप्त होतो, असे जपानी वैज्ञानिकांनी म्हटले आहे.जपानमधील सायटामा येथे असलेल्या रिकेन ब्रेन सायन्स इन्स्टिटय़ूटचे वैज्ञानिक डॉ.कुमी कुरोडा यांनी सांगितले, की आईने मुलाला कडेवर घेतल्यानंतर त्याचे रडणे लगेच बंद होते व ते सुखावते. उंदराच्या पिलांमध्ये केलेल्या प्रयोगातही हेच दिसून आले आहे. ‘माय हेल्थ न्यूज डेली’ने दिलेल्या वृत्तानुसार आईने मुलाला कडेवर घेऊन फिरवून आणले, तर त्याच्या वेदनाही कमी होतात, त्यामुळे जेव्हा लस वगैरे दिली जाते, तेव्हा या लहान बाळांना असे फिरवून आणायला हरकत नाही.  एक ते सहा महिन्यांच्या १२ सुदृढ बालकांवर हा प्रयोग करण्यात आला. अगदी लहान बालकापेक्षा थोडय़ा मोठय़ा बालकांमध्ये आईने कडेवर घेतल्याचा परिणाम जास्त दिसून येतो. जेव्हा आई या लहान मुलास कडेवर घेऊन चालण्यास सुरुवात करते, तेव्हा काही प्रमाणात जोजवण्याची प्रक्रिया होऊन ते शांत होते. श्रीमती कुरोडा यांच्या मते बाळ रडायला लागले, तर त्याला काही काळ कडेवर घेऊन फिरायला न्या: त्यामुळे तुम्हाला त्याच्या रडण्याचे कारणही समजेल. मूल रडते तेव्हा आईवडिलांनाही ते बघवत नाही. ते त्याला नाना तऱ्हेने शांत करायला बघतात. कुरोडा यांच्या मते केवळ आईच नव्हे तर दाईसुद्धा बाळाला कडेवर घेऊन फिरवू लागली, तरी मूल शांत होते.दोन महिन्यांच्या खालील बाळांना त्याच्या वडिलांनी, आजीने, अपरिचित स्त्रीने कडेवर घेतले, तरी त्याचे रडणे थांबते. ‘करंट बायॉलॉजी’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

नैराश्यही सहवासजन्य आजार
जेलोक नैराश्यग्रस्त व्यक्तींच्या सहवासात राहतात त्यांनाही हळूहळू नैराश्याचा त्रास जडतो, असे नवीन अभ्यासात दिसून आले आहे. जे लोक नैराश्याने ग्रस्त असतात ते त्यांचे कुटुंबीय, मित्र यांच्या संपर्कात आल्यावर इतरांनाही नैराश्य जडते. ताणजन्य परिस्थितीत ज्यांचा प्रतिसाद नकारात्मक असतो त्यांना नैराश्याचा विकार जडण्याची शक्यता जास्त असते. गेराल्ड हेफेल व जेनिफर हेम्स या इंडियाना विद्यापीठातील डॉक्टरांनी केलेल्या संशोधनानुसार ‘कॉग्निटिव्ह व्हलनरॅबिलिटी’ हा यात महत्त्वाचा व जोखमीचा घटक आहे. ज्या व्यक्तींमध्ये कॉग्निटिव्ह व्हलनरॅबिलिटी जास्त असते ते नैराश्यग्रस्त व्यक्तींच्या सहवासात आले तर त्यांना नैराश्याचा विकार जडतो. विद्यापीठ पातळीवर शिक्षण घेणाऱ्या २०६ तरुणांवर याबाबत प्रयोग करण्यात आले. ते एकमेकांच्या सहवासात राहणारे होते. यात नैराश्यग्रस्त व्यक्ती या नकारात्मक पद्धतीने विचार करते त्याच पद्धतीने सहवासातील व्यक्तीही विचार करू लागतात व नैराश्याच्या शिकार बनतात. नैराश्यग्रस्त व्यक्तीच्या सहवासात सहा महिने राहिलात तरी तुमची वृत्ती नकारात्मक बनते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 2:52 am

Web Title: beet juce reduce blood preasure
Next Stories
1 नवजात अर्भकाला कावीळ
2 निरोगी दातांसाठी..
3 उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी
Just Now!
X