शरीराचे कार्य नीट चालण्यासाठी असंख्य घटक कारणीभूत असतात. कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षरीत्या. हाडांसाठी कॅल्शिअम आवश्यक असते हे अनेकांना माहिती असते आणि त्यामुळे दूध आवश्यकही ठरते. मात्र या कॅल्शिअमचा उपयोग करण्यासाठी ‘ड’  जीवनसत्त्वाची गरज असते. ‘ड’  जीवनसत्त्वाची कमतरता ही खरे तर लहानपणापासूनच सुरू होते, पण आपल्याकडे साधारण पन्नाशीनंतर त्याचे परिणाम जाणवू लागतात. हाडे दुखणे, ठिसूळ होणे, घसरून पडल्याने हाड फ्रॅक्चर होऊन अंथरुणाला खिळणे अशा अनेक दुखण्यांचे कारण ‘ड’ जीवनसत्त्वात असते. महत्त्वाचे म्हणजे या दोन्हीसोबत हार्मोन्सही महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे हाडे दुखतात तेव्हा फक्त कॅल्शिअमची नाही तर या तिन्ही घटकांचा मेळ चुकलेला असतो.
हाडे दुखत असल्याची तक्रार घेऊन अनेकजण येतात. साधारणत: पन्नाशीनंतर हा त्रास सुरू होतो आणि त्यातही विशेषत्वाने स्त्रियांना अधिक होतो. हाडे मजबूत करण्यासाठी दूध आवश्यक आहे हे तर शाळेपासून शिकवले जाते. मात्र दुधातील कॅल्शिअम हाडांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच हाडे मजबूत करण्यासाठी इतरही काही घटक महत्त्वाचे ठरतात. हाडांच्या समस्या सुरू झाल्या की खरे तर कॅल्शिअमचे शरीरातील प्रमाण मोजायला हवे. मात्र हे प्रमाण मोजून फायदा नसतो. कारण शरीरातील प्रत्येक पेशीसाठी कॅल्शिअम आवश्यक असते. अगदी मेंदूपासून हृदयापर्यंत. हे कॅल्शिअम रक्तावाटेच सर्व पेशींपर्यंत पोहोचते. त्यामुळे जेव्हा शरीरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण होते तेव्हा मेंदू प्राधान्यक्रम ठरवतो. सर्वात जास्त आवश्यकता असलेल्या पेशींपर्यंत कॅल्शिअम पोहोचवणे गरजेचे असल्याने मग हाडांमध्ये साठवून ठेवलेले कॅल्शिअम रक्तात पुन्हा घेतले जाते व त्याद्वारे संबंधित अवयवाकडे पोहोचवले जाते. त्यामुळे रक्ताच्या चाचणीत कॅल्शिअमचे प्रमाण सामान्य दिसते, मात्र प्रत्यक्षात शरीरात कॅल्शिअमची अत्यंत कमतरता असू शकते. मग कॅल्शिअमची नेमकी किती कमतरता आहे हे तपासण्यासाठी हाडांची घनता आणि ‘ड’ जीवनसत्त्वाचे प्रमाण तपासले जाते.

‘ड’ जीवनसत्त्वाचा कॅल्शिअमशी संबंध
‘ड’ जीवनसत्त्व हे कॅल्शिअमचा पोलीस आहे. संरक्षणकर्ता. हाडांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी कॅल्शिअम आवश्यक आहे. कॅल्शिअमचा मुख्य स्रोत म्हणजे दूध. याशिवाय दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आदीमधून ते शरीरात जात असते. मात्र रक्तात असलेल्या कॅल्शिअमचा हाडांना फारसा उपयोग नसतो.  कारण हे कॅल्शिअम हाडांमध्ये शोषले जात नाही. हे कॅल्शिअम हाडांना योग्य त्या प्रकारे शोषता यावे यासाठी जो घटक महत्त्वाची भूमिका बजावतो तो म्हणजे ‘ड’ जीवनसत्त्व. दूध किंवा तत्सम पदार्थामधून मोठय़ा प्रमाणावर कॅल्शिअम शरीरात गेले आणि शरीरात ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव असेल तर मग या कॅल्शिअमचा म्हणावा तेवढा उपयोग होत नाही. त्यातच कॅल्शिअमसाठी किमान दुधासारखा महत्त्वाचा स्रोत आहे मात्र ‘ड’ जीवनसत्त्वासाठी सकाळच्या साधारण आठ ते नऊ वाजताच्या कोवळ्या उन्हाव्यतिरिक्त इतर चांगला स्रोत नाही. नाही म्हणायला काही मासे,  कॉर्डलिव्हर ऑइल, अंडी यातून ‘ड’ जीवनसत्त्व मिळते, मात्र अत्यल्प प्रमाणात. त्यामुळे सर्व भार सकाळच्या उन्हावरच. त्यामुळे शरीरात ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता आढळली की त्याच्या सप्लीमेंट्स घ्याव्या लागतात.

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
What should be carefully considered while taking a car loan
Money Mantra: वाहन कर्ज घेताना कोणत्या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावं ?
Shirol Talathi revenue assistant arrested in case of accepting bribe
लाच स्वीकारल्या प्रकरणी शिरोळ तलाठी,महसूल सहाय्यक जाळ्यात

सूर्यकिरणांशी संबंध?
भारतीयांच्या त्वचेमध्ये सूर्यकिरणांपासून ‘ड’ जीवनसत्त्व तयार करण्याची क्षमता नाही, असा ग्रह आहे. मात्र तो तितकासा खरा नाही. त्वचेला काळा रंग देणारे मेलेनिन घटक जेवढे जास्त तेवढे ‘ड’ जीवनसत्त्व तयार करण्याची क्षमता कमी हा गरसमज आहे. असे असते तर आफ्रिकेतील लोकांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व तयारच झाले नसते आणि युरोप-अमेरिकेत वर्षांतील अनेक दिवस सूर्यकिरणेच दिसत नसल्याने समस्या निर्माण झाल्या असत्या. आजूबाजूच्या वातावरणाला आपले शरीर जुळवून घेत असते आणि त्या प्रमाणात शरीराच्या क्षमता विकसित होत असतात. त्यामुळे ढगाळ वातावरणातही ‘ड’ जीवनसत्त्व तयार करण्याचे काम शरीराकडून सुरू राहते.

हार्मोन्सही महत्त्वाचे
कॅल्शिअम आणि ‘ड’ जीवनसत्त्व या दोन्हींसोबत हार्मोन्सही महत्त्वाचे ठरतात. घशामधील थॉयरॉइड ग्रंथींमधून पाझरणाऱ्या पॅराथॉरमॉनसारखे हार्मोन्स रक्तातील कॅल्शिअमची पातळी नियंत्रित करत असतात. मासिक पाळी बंद झाल्यानंतर शरीरातील काही हार्मोन्सचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे स्त्रियांमध्ये हाडे ठिसूळ होणे, सांधेदुखीचे प्रमाण वाढते. याव्यतिरिक्त लहानपणापासून शरीराची होत असलेली हालचालही हाडांच्या वाढीमध्ये व मजबुतीसाठी निर्णायक ठरते. शरीराची हालचाल मंद असेल तर मेंदूला तसे संकेत दिले जातात व हाडांच्या मजबुतीला साहजिकच प्राध्यान मिळत नाही. याउलट खेळाडूंची हालचाल खूप अधिक होते, त्यांच्या आहारानुसार आणि व्यायामानुसार हाडे अधिक मजबूत होतात. अर्थात एका विशिष्ट वयानंतर शरीराची मर्यादेपेक्षा अधिक हालचाल धोकादायक ठरू शकते. त्यामुळे योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम करावेत.
डॉ. प्रदीप आवटे अस्थिव्यंगतज्ज्ञ, नानावटी रुग्णालय