News Flash

रक्तवाहिन्यांमधील अडथळे आणि परिणाम

मागोवा मधुमेहाचा मधुमेहात हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा प्रश्न होतो, तसा इतर रक्तवाहिन्यांचाही त्रास होतो का? मधुमेह हा सगळ्याच रक्तवाहिन्यांचा शत्रू आहे. हृदयासोबतच अनेक महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांचा मार्ग बंद

| August 29, 2015 05:59 am

मागोवा मधुमेहाचा
मधुमेहात हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा प्रश्न होतो, तसा इतर रक्तवाहिन्यांचाही त्रास होतो का?
मधुमेह हा सगळ्याच रक्तवाहिन्यांचा शत्रू आहे. हृदयासोबतच अनेक महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांचा मार्ग बंद पडतो. मेंदूला रक्त पुरवणाऱ्या वाहिन्या बंद झाल्या की लकवा होतो. पायात हा प्रश्न निर्माण झाला तर पाय कापले जातात. मूत्रिपडाला रक्त मिळालं नाही की ती निकामी होतात. किंबहुना अपघात सोडला तर मधुमेह हे पाय गमावण्याचं- अपंग होण्याचं सर्वात मोठं कारण आहे असं म्हटलं जातं.
लकवा कशाने होतो?
आपल्या शरीरातल्या सगळ्या स्नायूंवर मेंदूचं नियंत्रण असतं. मेंदूकडून येणाऱ्या संदेशानुसार सगळ्या स्नायूंचं आकुंचन-प्रसरण होत असतं. स्नायूंचं नियंत्रण मेंदूच्या ज्या भागातून होतं त्या ठिकाणच्या पेशी मृत झाल्या की लकवा होतो. इतर भागातला रक्तपुरवठा कमी झाला तर त्या त्या ठिकाणी चाललेलं काम ठप्प होतं. लकव्याव्यतिरिक्त मेंदूच्या छोटय़ा रक्तवाहिन्या बंद झाल्यानं मेंदूचे अनेक लहान लहान हिस्से मृत होतात. जो पर्यंत महत्त्वाची कामं करणारा मेंदूचा भाग शाबूत आहे तोपर्यंत आपण जगू शकत असल्यानं छोटय़ाशा भागाला इजा झाली तर फारसा फरक पडत नाही. कित्येकदा ते माणसांच्या लक्षातही येत नाही.
मूत्रिपडाला कशी इजा होते?
मूत्रिपड रक्त गाळून त्यातले शरीराला नको असलेले पदार्थ बाहेर काढून टाकतं. मूत्रिपडाला रक्त पुरवणाऱ्या वाहिनीत चरबीची पुटं साचली की गाळण्यासाठी पुरेसं रक्त त्याकडं येत नाही आणि त्याचं काम ठप्प होतं. मधुमेहींना होणाऱ्या डायबेटिक नेफ़्रोपथीपेक्षा हे वेगळं आहे. तिथं रक्तातली वाढलेली ग्लुकोज त्रास देते. इथं हृदयविकाराप्रमाणं अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे चरबी साठल्यामुळं हे होतं.
पायाच्या रक्तपुरवठय़ाचं काय?
जशी इतर रक्तवाहिन्यात चरबी साठते, तशीच पायाच्या रक्तवाहिन्यातही साठते. मधुमेहात हे प्रमाण खूपच जास्त असतं. त्यात जर ती व्यक्ती धूम्रपान करत असेल तर विचारायलाच नको. पायाच्या बोटांना मिळणारं रक्तच बंद झालं तर ती मृत होतात. मग बोटं, पाय कापल्याशिवाय गत्यंतर नसतं.
याबाबतची लक्षणं काय आणि तपासण्या कुठल्या करायच्या?
प्रथम आपण पायाबद्दल बोलू. पहिलं लक्षण म्हणजे थोडं चालल्यावर मांडय़ा, गुडघ्यावरचा भाग आणि पोटऱ्यांमध्ये गोळे येणं. थोडं थांबलं, एकाच जागी उभं राहिलं तर हा गोळा नाहीसा होतो. तुम्ही पुन्हा चालू शकता. पण काही वेळानं तुम्हाला परत थांबावं लागतं. इंग्रजीत याला इंटरमिटंट क्लॉडिकेशन असं म्हणतात. गोळा येण्यापूर्वीची एक पायरी असते. त्या वेळी चालल्यावर नुसते पाय थकतात, ओढल्यासारखे होतात. याच वेळी रक्तपुरवठा साधारण ४० ते ५० टक्क्यांनी कमी झालेला असतो. ही लक्षणं दिसायला लागली तर समजावं की आपल्या पोटातल्या मुख्य रोहिणीमध्ये किंवा पायांना रक्तपुरवठा करणाऱ्या तिच्या उपवाहिन्यांमध्ये चरबी जमू लागली आहे. ती फारच वाढली तर रक्तपुरवठा इतका कमी होईल की पायाचे अवयव जगू शकणार नाहीत. याला क्रिटिकल िलब इस्केमिया म्हणतात. त्या वेळी तातडीच्या शस्त्रक्रियांना सामोरं जावं लागतं. जेव्हा गुडघ्याच्या जवळच्या रक्तवाहिन्यामध्ये चरबी जमते तेव्हा फक्त पोटऱ्या दुखतात किंवा त्यात गोळे येतात. खाटेवर बसल्यानंतर कधी कधी आपला पाय अधांतरी राहतो. असा अधांतरी असताना लालचुटूक दिसणारा पाय, झोपल्यावर आणि थोडा हवेत वर उचलल्यावर जर पांढराफट्ट पडत असेल तर हे निदान अधिकच पक्कं होतं. मूत्रिपडाच्या बाबतीत अशी वैशिष्टय़पूर्ण लक्षणं फारशी नसतात. फक्त रक्तदाब वाढलेला दिसतो. रक्तदाबाची औषधं देऊनही तो नियंत्रणात येत नाही तेव्हा मनात शंकेची पाल चुकचुकायला हवी. पायाची रक्तवाहिनी असो की मूत्रिपडाची किंवा मेंदूची, डॉपलर टेस्टमध्ये निदान होतं. अगदीच शंका असली तर अँजियोग्राफी करून घ्यावी. त्यात कुठं ब्लॉक्स आहेत, किती आहेत हे कळतं. प्रसंगी त्याच वेळी अँजियोप्लास्टी करून त्यावर उपचार करणं शक्य होतं. कधी बायपास करावी लागते. परंतु मधुमेहात कधी कधी खूपच जास्त रक्तवाहिन्या बंद झालेल्या असतात आणि त्यांची बायपास करणं शक्य होत नाही. कोणीही विचारण्याआधी एका विशिष्ट समस्येकडं लक्ष वेधलं पाहिजे. काही मंडळींच्या, विशेषत: वयस्करांच्या, जेवल्यावर पोटात दुखतं. दुखणं मंद मंद असतं, नेमकी जागा दाखवता येत नाही. सोनोग्राफीत काहीच निघत नाही. अनेकदा हे दुखणं आतडय़ांच्या रक्तवाहिन्या चोंदल्यामुळं असतं.
डॉ. सतीश नाईक dr.satishnaik.mumbai@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2015 5:59 am

Web Title: blood vein obstacles and impact
Next Stories
1 संकटांमुळे येणारे आजार
2 झोप सुखाची
3 गरज ड ची!
Just Now!
X