अतिरिक्त वजन कुणासाठीही वाईटच! विशेषत: गर्भारपणाला आणि रजोनिवृत्तीला सामोरे जाणाऱ्या महिलांसाठी लठ्ठपणा अनेक अडचणी निर्माण करू शकतो. गर्भवतींसाठी आणि नुकत्याच प्रसूत झालेल्या मातांसाठी अति लठ्ठपणाचे धोके कोणते असतात, इतर महिलांना लठ्ठपणामुळे कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि लठ्ठपणातून बाहेर पडण्याचे मार्ग कोणते, याबद्दलची माहिती पाहूया या लेखात-
विविध वैद्यकीय चाचण्यांमधून मधुमेह आणि लठ्ठपणा यांतील थेट संबंध समोर आला आहे. विशेषत: स्त्रियांमधील लठ्ठपणा मधुमेहाला कारणीभूत ठरण्याचा धोका अधिक असतो. गेल्या दहा वर्षांत मधुमेही स्त्रियांच्या संख्येत ३२ टक्क्य़ांनी वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका अभ्यासात लठ्ठपणा कर्करोगासाठीही कारणीभूत ठरू शकत असल्याचे उघड झाले आहे. स्त्रियांमधील कर्करोगाच्या बारा रुग्णांमागे एक रुग्ण लठ्ठ असल्याचे या अभ्यासात आढळले आहे.
शहरी भागातील ३५ वर्षांवरील स्त्रिया शहरी जीवनाबरोबर येणाऱ्या चुकीच्या जीवनशैलीला अधिक प्रमाणात बळी पडतात. यात वजन वाढवणाऱ्या अन्नाचे नेहमी सेवन करणे, व्यायामाचा अभाव आणि त्यामुळे हळूहळू शरीरातील चयापचयाच्या वेगावर परिणाम होण्याचा समावेश होतो. लहान वयातही मुली आणि स्त्रियांच्या शरीरात नैसर्गिकरित्याच स्नायू कमी आणि मेद अधिक असल्याचे आढळते. प्रसूतीनंतरही अनेक स्त्रियांना लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागतो.
गर्भारपण आणि लठ्ठपणा
स्त्रियांमधील लठ्ठपणामुळे त्यांच्या जननसंस्थेच्या आरोग्यावर होणारे परिणाम चिंता करण्याजोगे आहेत. स्त्री अति लठ्ठ असल्यास प्रसूतीनंतर तिच्या आणि तिच्या बाळाच्या आरोग्याबाबत काही गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता असते. इतकेच नव्हे तर लठ्ठपणा गर्भधारणेतही अडचणी निर्माण करू शकतो. शरीर निर्माण करत असलेल्या हॉर्मोन्सच्या पातळीवर शरीरातील मेदाच्या साठय़ांमुळे परिणाम होतो. हॉर्मोन्सची पातळी बदलल्यामुळे गर्भधारणेची प्रक्रिया अवघड बनते. गर्भवती स्त्री लठ्ठ असेल तर तिला काही गंभीर समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
प्रीइक्लॅम्पशिया
यात गर्भवती असताना उद्भवणारी उच्च रक्तदाबाची समस्या, शरीरात पाणी साठून राहणे, अंगावर सूज येणे या गोष्टींचा समावेश होतो. प्रीइक्लॅम्पशियाच्या गंभीर स्थितीत गर्भवतीच्या बाळाला होणाऱ्या रक्तपुरवठय़ात अडचणी निर्माण होऊन बाळाला धोका होण्याची शक्यता असते.
जस्टेशनल डायबेटिस (गर्भारपणातील मधुमेह)
या प्रकारच्या मधुमेहात गर्भवतीच्या अन्नातील शर्करेचे चयापचय क्रियेत ज्वलन होण्याची प्रक्रिया मंदावते. गर्भाशयाभोवती लठ्ठपणा अति वाढणे बाळासाठी धोक्याचे ठरू शकते.
सिझेरियन बाळंतपण
गर्भावस्थेत असताना ज्या स्त्रिया लठ्ठ असतात त्यांना प्रसूतीदरम्यान काही अडचणी येण्याचा धोका वाढतो.
अशा स्त्रियांना प्रसूतीपूर्वी येणाऱ्या कळा सावकाश आणि विलंबाने येणाऱ्या असतात. त्यामुळे बाळाच्या जन्मासाठी ‘सिझेरियन’ करावे लागण्याची शक्यता वाढू शकते.
पोस्टपार्टम इन्फेक्शन
गर्भावस्थेतील लठ्ठपणामुळे प्रसूतीनंतर पुन्हा पूर्ववत बरे होण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. विशेषत: ज्या स्त्रियांचे बाळंतपण सिझेरियन पद्धतीने झाले असेल त्यांना प्रसूतीपश्चात जंतूसंसर्गाचा धोका असतो.
गर्भवती असताना लठ्ठ असणाऱ्या स्त्रियांच्या अपत्यांनाही काही आरोग्यसमस्या असू शकतात. गर्भातील वाढीच्या काळात बाळाचे वजन खूप वाढणे, बाळाच्या ‘न्यूरल टय़ूब’मध्ये काही दोष असणे, बाळाला बाल्यावस्थेतच लठ्ठपणा असणे अशा प्रकारच्या या समस्या असू शकतात.
लठ्ठपणामुळे येणाऱ्या इतर समस्या
अतिरिक्त वजनातील प्रत्येक किलो आपल्याला कुठल्या ना कुठल्या आजाराच्या दिशेने नेणारा असतो असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीनंतर लठ्ठ महिलांना स्तनांच्या कर्करोगाचा धोका वाढतो. महिलांच्या मनात अतिशय संकोच निर्माण करणारा आणखी एक आजार म्हणजे मूत्राशयावर ताबा न राहून नको असताना लघवी होणे. प्रसूतीनंतर अनेक लठ्ठ महिलांना ही तक्रार जाणवते.
लठ्ठपणा टाळण्यासाठी काय करावे?
आपण लठ्ठ आहोत म्हणजे आता आपल्याला हे सगळे आजार होणार का, अशा विचाराने घाबरून नक्कीच जाऊ नये. वेळीच घेतलेला डॉक्टरांचा सल्ला आणि मुख्य म्हणजे जगण्याला लावून घेतलेली शिस्त अशा परिस्थितीत नक्कीच उपयोगी पडेल. असे असले तरी मुळात लठ्ठपणा वाढूच न देणे आपल्या हातात आहे.
लठ्ठपणाला दूर ठेवण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे ज्यातून व्यायाम होईल अशी जी कोणती गोष्ट करायला आपल्याला आवडत असेल त्यात स्वत:ला गुंतवणे. यात आपल्या प्रकृतीनुसार चालत फिरायला जाणे, सायकल चालवणे, निसर्गसौंदर्य न्याहाळत डोंगरवाटा पालथ्या घालणे, पोहायला जाणे अशा कोणत्याही गोष्टीचा समावेश होऊ शकतो.
कामानिमित्त बराच काळ बाहेर राहणाऱ्या महिला अनेकदा वेळेअभावी तयार अन्न किंवा फास्ट फूड खाण्याचा मार्ग पत्करतात. घरी अन्न तयार करायला, एकत्र बसून जेवायला वेळ नाही ही सबब प्रयत्नपूर्वक बाजूला सारणे आवश्यक आहे. घरी बनवलेले- शिजवलेले अन्न नीट बसून प्रसन्न मनाने खाणे गरजेचे. अन्नसेवनाची पद्धत बदलल्यामुळेही अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होते.
टीव्ही पाहताना कधीच जेवू नका. टीव्हीवरचा आपला आवडता कार्यक्रम पाहताना आपण किती खातो याकडे लक्ष राहात नाही. मधल्या वेळी खाण्याच्या ‘स्नॅक्स’मध्येही भाजलेले, लो- कॅलरी पदार्थच खाणे चांगले. भरपूर साखर असलेली पेये टाळणेच इष्ट. पेयांमध्ये ‘ग्रीन- टी’ चांगला. हा चहा गरम किंवा थंड प्यायला तरी चालतो. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत ग्रीन टी मदत करत असल्याचे सांगितले जाते.
इतर उपाय कोणते?
लठ्ठपणा इतर कोणत्याही आजारासारखाच असतो. आरोग्याच्या दृष्टीने त्यामुळे लठ्ठपणाबाबत ‘चलता हैं’ अशी भूमिका ठेवू नये. लठ्ठपणाच्या रुग्णाला जीवनशैलीत सकारात्मक बदल करून, ते नियमित पाळूनही काहीच फरक पडला नाही तर अशा रुग्णाला बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरीचा पर्याय डॉक्टरांकडून सुचवला जाऊ शकतो. ‘एशियन कन्सेन्सस मीटिंग ऑन मेटॅबोलिक सर्जरी’ या परिषदेच्या निष्कर्षांनुसार आशिया खंडीतील लठ्ठ महिला बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी- त्यातही ‘स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी’ ही शस्त्रक्रिया करून घेण्यास पसंती देत असल्याचे दिसून आले आहे.
शब्दांकन- संपदा सोवनी

Google New App Photomath let you take a picture of a math equation and help you solve it step by step
गूगलकडे आहे ‘असा’ एक ॲप; विद्यार्थ्यांची गणितं सोडवली जातील मिनिटांत, जाणून घ्या
Pillow and sleeping
Pillow and sleeping : झोपताना पायामध्ये उशी ठेवल्यास महिलांना आरोग्यासाठी मिळतील ‘हे’ फायदे
Saima ubaid First female powerlifter from Kashmir
सायमा ओबेद… कश्मिरमधील पहिली महिला पॉवरलिफ्टर
AJIT PAWAR AND BUDGET
सौर कृषीपंप ते कृषी महाविद्यालयास मान्यता, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय? वाचा…