News Flash

मेंदूचा कर्करोग आणि रेडिओथेरपी

‘ब्रेन टय़ूमर’ हा प्रत्येक वेळी मेंदूचा कर्करोगच असतो असे नाही. पण जेव्हा झालेला ब्रेन टय़ूमर कर्करोगाचा असल्याचे निदान होते तेव्हा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या तोंडचे

| November 25, 2015 01:28 pm

मेंदूचा कर्करोग आणि रेडिओथेरपी

‘ब्रेन टय़ूमर’ हा प्रत्येक वेळी मेंदूचा कर्करोगच असतो असे नाही. पण जेव्हा झालेला ब्रेन टय़ूमर कर्करोगाचा असल्याचे निदान होते तेव्हा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या तोंडचे पाणी पळते. वास्तविक लवकरात लवकर निदान आणि अचूक व संपूर्ण उपचारांनी मेंदूचा कर्करोग बरा होऊ शकतो. याबद्दल अधिक माहिती करून घेऊन रुग्णांनी आपल्या मनातील कर्करोगाची भीती दूर करणे आवश्यक आहे.

मेंदूतील चेतासंस्था आणि मज्जारज्जूमध्ये १२० प्रकारच्या गाठी आढळू शकतात. यातल्या सगळ्याच गाठी (टय़ुमर) कर्करोगाच्या (कॅन्सरच्या) नसतात. त्यातल्या काही गाठी कर्करोगाच्या तर काही साध्या प्रकारच्या असतात. अमेरिकेतील ‘सेंट्रल ब्रेन टय़ुमर रजिस्ट्री’नुसार ३५ ते ५० टक्के गाठी साध्या प्रकारच्या असतात. कर्करोग असलेला ब्रेन टय़ुमर म्हणजे शरीरातील पेशींची अनियंत्रित व अनैसर्गिक वाढ. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी मेंदू शल्यचिकित्सक डॉ. हार्वे कुशिंग यांना मेंदूतील काही गाठी कर्करोगाच्या असतात असे, असे निरीक्षणात आले.
२००६ मध्ये झालेल्या ‘ग्लोबोकॅन’ या परिषदेच्या निष्कर्षांनुसार प्रत्येकी एक लाख लोकसंख्येत ३ ते ४ लोकांमध्ये हा आजार उद्भवतो.
दरवर्षी जगभरात साधारण १.७५ लाख जणांना ब्रेन टय़ुमर होतो. ‘कॅन्सर रजिस्ट्री’नुसार (२००६-२००८) पुण्यात हे प्रमाण लाखामागे २.३ ते ३.३ असे आहे. तर रूरल रजिस्ट्रीप्रमाणे बार्शी (सोलापूर) येथे हे प्रमाण लाखामागे ०.५ ते ०.७ इतके कमी आहे. वाढत्या वयानुपरत्वे ब्रेन टय़ुमर होण्याचे प्रमाण वाढते. ब्रेन टय़ुमर कशामुळे होतो हे अजूनही स्पष्ट नाही. परंतु एशिया पॅसिफिक जर्नल २०१२ मध्ये या आजारासाठी किरणोत्सार, केमिकल्स (रबर, पेट्रोकेमिकल, मेटल इंडस्ट्रीज इ.), अनुवांशिकता या गोष्टी कारणीभूत ठरत असल्याचा उल्लेख आढळतो.
कर्करोग असलेल्या ब्रेन टय़ुमरमध्ये ‘अ‍ॅस्ट्रोसायटोमा’ या प्रकारचा कर्करोग ६० टक्के इतक्या म्हणजे सर्वाधिक प्रमाणात आढळतो. अ‍ॅस्ट्रोसायटोमाच्या चार अवस्था सांगितल्या जातात. या अवस्थांपैकी चौथी अवस्था म्हणजे ‘ग्लायोब्लास्टोमा’ ही अवस्था अ‍ॅस्ट्रोसायटोमाच्या २१ टक्के रुग्णांत आढळते. अ‍ॅस्ट्रोसायटोमा पहिल्याच अवस्थेत असताना त्याचे निदान झाल्यास रुग्ण उपचाराने पूर्ण बरा होतो. चौथ्या अवस्थेतही रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो, परंतु या अवस्थेत पुढे ब्रेन टय़ुमरचा पुनरुद्भव होण्याची शक्यता जास्त असते.
ब्रेन टय़ुमरवर त्रिकोणी उपचारपद्धती प्रचलित आहे. यामध्ये प्रामुख्याने शल्यचिकित्सा (ऑपरेशन) आणि त्यानंतर साधारण ८० टक्के रुग्णांमध्ये रेडिओथेरपी (किरणोपचार) द्यावी लागते. रेडिओथेरपी ही उच्च दर्जाच्या क्ष-किरणांद्वारे दिली जाते. रेडिओथेरपी देताना रुग्णाला काहीही जाणवत नाही पण त्याद्वारे कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असते. किरणोपचार हा ‘लिनिअर अ‍ॅक्सलरेटर’द्वारे (लिनॅक) दिले जातात. लिनॅकद्वारे थ्री-डी सी आर टी/ आय. एम. आर. टी./ आय. जी. आर. टी. या आधुनिक तंत्रज्ञानाने किरणोपचार दिला जातो. यामध्ये कॅन्सरग्रस्त भागाला अधिकाधिक किरणोपचार आणि कॅन्सरविरहित भागाला कमीत कमी किरणोपचार देतात. यामुळे किरणोपचाराचे दुष्परिणाम (साईड इफेक्टस्) खूप कमी होतात. अ‍ॅनाप्लास्टीक अ‍ॅस्ट्रोसायटोमा किंवा ग्लायोब्लास्टोमा या प्रकारच्या ब्रेन टय़ुमरमध्ये शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी आणि औषधोपचार  (किमोथेरपी) ही त्रिकोणी उपचारपद्धती प्रभावी ठरते. लवकरात लवकर निदान आणि अचूक व संपूर्ण उपचारांनी मेंदूचा कर्करोग बरा होऊ शकतो. त्यामुळे रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्याबद्दल अधिक माहिती करून घेऊन आपल्या मनातील कर्करोगाची भीती दूर करणे आवश्यक आहे.
आरोग्य पानासाठी माहितीपर लेख पाठविण्याचा पत्ता- निवासी संपादक, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट क्र.१२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे ४११००५ अथवा sampada.sovani@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2013 12:07 pm

Web Title: brain cancer and radiotherapy
Next Stories
1 सिकल सेल अ‍ॅनिमिया
2 मॅन्निटॉल अटकाव करते कंपवाताला
3 अतिसाखर ह्रदयाला हानिकारक
Just Now!
X