’ मानेच्या गाठीत पसरलेल्या स्तनाच्या कॅन्सरसाठी शस्त्रकर्म, केमोथेरॅपी व रेडिओथेरॅपी घेऊन १९९६ मध्ये सौ. अलकाताई आमच्या कॅन्सर सेंटरमध्ये आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी आल्या. अलकाताईंचा कॅन्सर मुळातच गंभीर स्वरूपाचा असल्याने १९९८ व १९९९ मध्ये पुन्हा खांद्यावरील व मानेवरील गाठींमध्ये कॅन्सरचा पुनरुद्भव झाला व त्यासाठी पुन्हा केमोथेरॅपी व रेडिओथेरॅपी घ्यावी लागली. या वेळी मात्र रेडिओथेरॅपी व केमोथेरॅपीबरोबर आयुर्वेदीय औषधे चालू असल्याने अलकाताईंना त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागले नाहीतच, याशिवाय आजतागायत म्हणजे वयाच्या ८० व्या वर्षांपर्यंत कॅन्सरचा पुनरुद्भव झालेला नाही. नियमित आयुर्वेदिक औषधे, पथ्यपालन, व्यायाम व सकारात्मक दृष्टिकोन ही आपल्या सुदृढ आयुष्याची चतु:सूत्री असल्याचे सांगत त्या इतर रुग्णांचे मनोधर्य वाढवीत आहेत.
’ कुटुंबवत्सल गृहिणी आशाताईंना दोन मुलांच्या जन्मानंतर अवघ्या ३२ व्या वर्षीच २००६ मध्ये दुसऱ्या स्टेजमधील ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले. आशाताईंची आई, मावशी व आजी यांनाही स्तन व बीजकोशाचा कॅन्सर झाल्याचा इतिहास असल्याने कॅन्सरने उग्र स्वरूप धारण करू नये म्हणून त्यांनी शस्त्रकर्म, केमोथेरॅपी व रेडिओथेरॅपीबरोबरच आमच्या प्रकल्पात आयुर्वेदिक चिकित्सा सुरू केली. शमन व रसायन चिकित्सेच्या जोडीला दरवर्षी वमन व बस्ति या पंचकर्म चिकित्सा घेतल्याचा अपेक्षित लाभ झाला व आशाताईंना आजपर्यंत कॅन्सरचा पुनरुद्भव व प्रसार झाला नाही. स्तनाचा कॅन्सर झालेल्या रुग्णांची अशी अनेक बोलकी उदाहरणे कॅन्सर चिकित्सेत अ‍ॅलोपॅथी चिकित्सेइतकेच आयुर्वेदिक चिकित्सेचे महत्त्व स्पष्ट करतात.  
 स्तनांच्या कॅन्सरमध्ये आयुर्वेदीय चिकित्सा अशा प्रकारे केली जाते. रुग्णाचे बल चांगले असल्यास पंचकर्म तज्ज्ञांच्या देखरेखीखाली प्राधान्याने विधिवत वमन व बस्ति चिकित्सा या पंचकर्म चिकित्सा केल्यास प्रामुख्याने रस व शुक्र धातूंची तसेच स्तन या अवयवाची शुद्धी होते. धातूंची व अवयवाची शुद्धी झाल्याने कॅन्सरचा पुनरुद्भव होण्याची शक्यता कमी होते. स्तनांच्या कॅन्सरमध्ये आनुवंशिकता अधिक आढळत असल्याने ज्या स्त्रियांच्या कुटुंबात कॅन्सरच्या आनुवंशिकतेचा इतिहास आहे त्यांनी दरवर्षी वसंत ऋतूत वमन व वर्षां ऋतूत बस्ति चिकित्सा घेतल्यास कॅन्सर प्रतिबंधास साहाय्य होते. पंचकर्मानंतर तसेच ज्या रुग्णांमध्ये पंचकर्म करणे योग्य नाही अशांमध्ये दीर्घकाळ शतावरी, सारिवा, कुमारी, कमल, हरिद्रा, त्रिफळा, कांचनार अशा औषधांपासून तयार केलेली चूर्ण, वटी, सिद्ध घृत, शर्करायुक्त कल्प, आसवारिष्ट यांच्या साहाय्याने शमन चिकित्सा चालू ठेवावी लागते. त्या जोडीला रसादी ७ धातू व त्यांचे अग्नी यांचे बल वर्धन करणारी व पर्यायाने सफ्तधातूपोषक रसायन चिकित्सा अविभाज्य आहे. यात दूध-तूप-साळीचा भात यांसारखा सात्त्विक आहार, शतावरी- गोक्षुर अश्वगंधा- कुष्मांड- सुवर्णभस्म यांसारखी रसायन औषधे व मनाची शुचिता वाढविणारे आचार रसायन म्हणजेच शुद्ध आचरण यांचा समावेश होतो. तसेच कॅन्सरची आहारातील संभाव्य कारणे वज्र्य करणे व साठेसाळीच्या तांदळाचा भात, दूध, तूप, मुगाचे-मसूर डाळीचे वरण, दुधी-पडवळ- सुरण-भेंडी-तांदुळजा-दोडका अशा भाज्या, गोड ताजे ताक, फुलका, भाकरी, हळद-आवळ्याचे लोणचे, साळीच्या-राजगिऱ्याच्या लाह्य़ा, नाचणीचे-गव्हाचे सत्त्व, मुगाचे- तांदळाचे-रव्याचे धिरडे, मुगाचे-कणकेचे- नाचणीचे लाडू असा पचनास हलका परंतू पोषक आहार पथ्यकर ठरतो. सद्वृत्ताचे पालन, सकाळी लवकर उठणे, मल-मूत्रादींचे विसर्जन करणे, योग्य व्यायाम करणे असा पथ्यकर विहार हा कॅन्सर चिकित्सेतील महत्त्वाचा भाग आहे. शरीराचे स्वास्थ्य हे मनाच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते. त्यातही स्तनाच्या कॅन्सरमध्ये चिंता, शोक, राग यांसारखे मानस हेतू अधिक प्रमाणात आढळतात. चरकाचार्यानी अतिचिंता हे रसधातूच्या दुष्टीचे महत्त्वाचे कारण सांगितले आहे. त्यामुळे मानस चिकित्सेला या कॅन्सरच्या चिकित्सेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. स्तनाच्या कॅन्सरचे निदान झाल्यावर व कॅन्सरची चिकित्सा चालू असता त्या स्त्रियांचे मानसिक संतुलन राखण्यासाठी त्यांना वाचन-संगीत यांसारख्या त्यांच्या आवडीच्या छंदात गुंतवून ठेवणे, यशस्वीपणे कॅन्सरशी लढा दिलेल्या अन्य रुग्णांशी त्यांचा संवाद साधून देणे आवश्यक असते. शिरोधारा, नस्य या चिकित्सा पद्धतीही मन:शांतीसाठी लाभदायी ठरतात. उपरोक्त आयुर्वेदीय चिकित्सा पद्धतींमुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते तसेच कॅन्सर व त्याच्या चिकित्सा पद्धतींकडे सकारात्मक नजरेने पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण होतो. केमोथेरॅपी व रेडिओथेरॅपीमुळे उद्भवणाऱ्या दुष्परिणामांची तीव्रताही कमी होते.
 स्तनाच्या कॅन्सरसाठी आवश्यक असलेल्या आधुनिक चिकित्सा पद्धतींमुळे उद्भवणारे विशिष्ट उपद्रव ही अनेक कॅन्सरग्रस्त रुग्णांची महत्त्वाची समस्या आहे. स्तननिर्हरण शस्त्रक्रियेमध्ये सामान्यत: कक्षा म्हणजे काखेतील लसिकाग्रंथींचेही निर्हरण केले जाते, त्यामुळे त्या बाजूच्या हातातील लसिकेचे वहन होत नाही व काही काळाने हाताला सूज येणे, हाताची त्वचा लाल होणे, जडपणा जाणवणे ही लक्षणे दिसतात. हे उपद्रव टाळण्यासाठी हाताचे विशिष्ट प्रकारचे व्यायाम उपयुक्त ठरतात. तसेच नियमितपणे तिळतेल किंवा दशमूळ तेल लावून बोटांकडून काखेपर्यंत कोमट तेल हळुवार चोळणे लाभदायक ठरते. दही, केळे, पेरू, काकडी, फ्रिजमधील पदार्थ असे सूज निर्माण करणारे कफकारक पदार्थ अशा अवस्थेत टाळणे हितकर ठरते.
 इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या स्त्रियांच्या हॉर्मोनचे रिसेफ्टर पॉझिटिव्ह असलेल्या स्तनांच्या कॅन्सरग्रस्त रुग्णांमध्ये रोगाचा पुनरुद्भव होऊ नये म्हणून दीर्घकाळासाठी हॉर्मोन्सच्या गोळ्या दिल्या जातात. या चिकित्सेचा दुष्परिणाम म्हणून ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडे ठिसूळ होणे, दुखणे, सांधे दुखणे, गर्भाशयाच्या अंतपुटाची जाडी वाढणे, अशक्तपणा अशी लक्षणे आढळतात. यासाठी आहारात गाईचे दूध, तूप, राजगिऱ्याचा लाडू/ वडी, राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी/ पुरी, नाचणीची भाकरी, नाचणीचे सत्त्व/ लाडू, तिळाची चटणी, खारकेची पूड घातलेली खीर/ लाडू, िडक-खोबऱ्याचा साजूक तुपातील लाडू, गव्हाची पोळी/ फुलका, उपमा, शिरा, दलिया, शेवया असे गव्हाचे पदार्थ, उडदाचे सूप, उडदाच्या डाळीची उसळ असा आहार असावा. लसूण, कढीपत्ता यांचा आहारात अधिक वापर करावा. आठवडय़ातून एकदा तरी संपूर्ण शरीरास चंदनबलालाक्षादी तेलाने मसाज करावा व दरवर्षी पावसाळ्यात वैद्यांकरवी तिक्तक्षीरबस्ति म्हणजे कडू रसांच्या औषधी वनस्पतींनी सिद्ध केलेल्या दुधाचे बस्ति घ्यावे.
स्तनांचा कॅन्सर प्रामुख्याने यकृत, अस्थी, फुफ्फुसे व मेंदू या अवयवांत पसरण्याची (मेटास्टेसिस) शक्यता असते. याच्या प्रतिबंधासाठी रुग्णाचे बल उत्तम असल्यास दरवर्षी प्रकृती व लक्षणांचा विचार करून ऋतूला अनुसरून पंचकर्म चिकित्सा, पथ्यकर आहारविहाराचे पालन, नियमित व्यायाम करणे निश्चितच हितकारक ठरते. याशिवाय शरीरातील रस रक्तादी सर्व धातू व अवयवांवर रसायन कार्य करणाऱ्या सुवर्णभस्माच्या विशिष्ट कल्पांचे सेवन अधिक उपकारक ठरते. या सर्वाबरोबर नियमित वैद्यकीय तपासणी करणे हे प्राथमिक अवस्थेत व्याधीचे निदान होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.   

thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Nagpur Woman Harassed and Intimidated by accused to not give testimony Against him
नागपुरात महिलेने न्यायालयात साक्ष देऊ नये म्हणून विनयभंग.. आरोपीने अश्लिल…
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…